पुणे : महामानव, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात बदनामीकारक आणि आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करणाऱ्या काही फेसबुक युजर्सविरुद्ध अखेर पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून राजकारण विदर्भाचे, महाराष्ट्राचा विश्वास, अकोला संवाद, वर्धा लाईव्ह यांसारख्या फेसबुक पेजेसवरून RSS आणि भाजपच्या विचारसरणीशी संबंधित असलेल्या व्यक्तींनी आक्षेपार्ह व्हिडिओ शेअर केले होते. या प्रकरणी वंचित बहुजन आघाडी पुणे शहराध्यक्ष ॲड. अरविंद तायडे यांच्या फिर्यादीवरून समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर प्रकरणात खालील कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे —
१) भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 कलम 196
२) भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 कलम 356 (2)
३) भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 कलम 353(1)(C)
४) भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 कलम 3 (5)
या प्रकरणी पुणे शहराध्यक्ष ॲड. अरविंद तायडे यांच्यासह ॲड. शिवाजी गायकवाड, उपाध्यक्ष जॉर्ज मदनकर, धर्मराज कदम, तुषार भोसले, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे शहराध्यक्ष चैतन्य इंगळे, अभिजीत बनसोडे, ओंकार कांबळे, प्रवीण बागुल, बाळू शिरसाट, अभिराज कांबळे, प्रज्योत गायकवाड, रोहित भोसले, विपुल सोनवणे, तसेच कार्यकर्ते स्वप्नील आल्हाट आणि हर्षल शिंदे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
या सर्वांनी ३१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजल्यापासून ते १ नोव्हेंबर पहाटे २.३० वाजेपर्यंत समर्थ पोलीस ठाण्यात ठाण मांडले होते. “गुन्हा दाखल होईपर्यंत पोलीस स्टेशन सोडणार नाही,” अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली होती. तब्बल ७ ते ८ तासांच्या सततच्या प्रयत्नानंतर अखेर गुन्हा दाखल करण्यात यश आले.वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या प्रकरणातील आरोपींचा लवकरात लवकर शोध घेऊन कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.




