कॅलिफोर्निया : जात ही एक दिवस जागतिक समस्या होईल असे बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते. भारताचा “जातीय” समाज जसजसा जगभरात पसरेल, तसा तो जातीची समस्या सगळीकडे पसरवेल असे त्यांचे म्हणणे होते. भारतातून विदेशात सथाईक झालेल्या लोकांनी भारतातली जातही विदेशात नेली. त्याबरोबर जातीय वर्चस्वाची भावना आणी जाती आधारित भेदभावाची संस्कृती ही नेली. याचाच परिणाम म्हणून आता विविध देशातल्या शासन-प्रशासनाला या समस्येविरोधात उपाययोजना कराव्या लागत आहेत.
अमेरिकेतील कॅलिफोर्निया स्टेट युनिव्हर्सिटी सिस्टिम मध्ये आता भेदभावविरोधी धोरणात जातीचा समावेश करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे तेथे शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या लढ्याला मोठे यश मिळाल्याची भावना आहे. भारतासह दक्षिण आशियातील देशांमधून आलेल्या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर जातीय भेदभावला सामोरे जावे लागत असल्याचे निदर्शनास आल्याने हे पाऊल उचलले गेले.
Equality Labs या नॉन प्रॉफिट संस्थेने २०१६ साली एक सर्वेक्षण केले. त्यात प्रत्येकी ३ पैकी १ दलित विद्यार्थ्याने जातीय भेदभावाचा सामना करावा लागला असल्याचे सांगितले. तर प्रत्येकी ३ पैकी २ दलित कर्मचार्यांनी कामाच्या ठिकाणी अन्याय्य वागणुक दिली जात असल्याचे सांगितले.
कॅलिफोर्निया विद्यापीठाने घेतलेल्या या निर्णयाचे विविध स्तरातून स्वागत केले जात आहे. तसेच अमेरिकेतील इतर विद्यापीठे ही यातून प्रेरणा घेऊन असाच निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे.