बुलढाणा : आयआयटी मुंबईच्या एनर्जी सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागातील द्वितीय वर्षाचा विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या मृत्यू प्रकरणाची निष्पक्ष आणि उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, तसेच दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी वंचित बहुजन युवा आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी, खामगाव शहर यांच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात गृह मंत्रालय, महाराष्ट्र राज्य यांना सविस्तर मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष गिरीश उमाळे यांनी हे निवेदन सादर केले. साहिल वाकोडेच्या मृत्यूची कोणतीही दिरंगाई न करता CBI किंवा विशेष तपास पथकामार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. तसेच साहिलला मानसिक आणि जातीयवाचक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप असलेल्या आयआयटी प्रशासनातील संबंधित प्राध्यापक व दोषी अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशीही मागणी करण्यात आली.
नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये मागासवर्गीय, बहुजन आणि वंचित घटकांतील विद्यार्थ्यांवरील कथित छळवणूक तसेच संस्थात्मक जातीय भेदभाव रोखण्यासाठी कडक नियमावली (SOP) लागू करावी, अशी मागणीही करण्यात आली. या प्रकरणाशी संबंधित सर्व CCTV फुटेज आणि डिजिटल पुरावे सुरक्षित ठेवून तपास पारदर्शक पद्धतीने करण्यात यावा, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, साहिल वाकोडे याला न्याय मिळावा आणि या प्रकरणाचा निषेध नोंदवण्यासाठी ३० सप्टेंबर २०२६ रोजी खामगाव येथे कॅंडल मार्च काढण्यात आला. सायंकाळी ७ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून सुरू झालेला हा मार्च उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला.
यावेळी बोलताना गिरीश उमाळे यांनी, “साहिलचा मृत्यू ही केवळ आत्महत्या नसून हा एक संस्थात्मक बळी आहे. जोपर्यंत या प्रकरणातील दोषींना अटक होत नाही आणि साहिलच्या कुटुंबाला न्याय मिळत नाही, तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील,” असा इशारा दिला.
या वेळी वंचित बहुजन आघाडी खामगाव शहर अध्यक्ष आकाश सरदार, महासचिव प्रशिक उमाळे, अमित फुलारे, उपाध्यक्ष शुभम सुरडकर, संघपाल वाकोडे, मंगेश कजबे, ॲड. विश्वंभर गवई, स्वप्नील तायडे, विद्यार्थी नेते प्रज्योत उमाळे, योगेश साळवे, तुषार सोनोने, आकाश जावळे, मीहुल हिवराळे, आदित्य सलूरकर, दीप भोजने, शेख आरिफ यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.






