उस्मानाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या माध्यमातून बुद्ध व डॉ. आंबेडकर यांच्या विचारधारा गावागावांत पोहोचविण्याचे कार्य सुरू आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून उमरगा तालुक्यातील कदेर व कसगी शाखांचे नामफलक उद्घाटन दि. 20 सप्टेंबर 2025 रोजी संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष अॅड. एस. के. भंडारे यांच्या हस्ते संपन्न झाले.
या वेळी अॅड. भंडारे यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना मंडळे व बुद्धविहारांच्या माध्यमातून धम्म प्रसाराची जबाबदारी पार पाडावी, विहारे संस्कार केंद्र बनवावीत असे आवाहन केले.
कार्यक्रमाला जिल्हा अध्यक्षा राजश्रीताई कदम, सरचिटणीस विजय बनसोडे, दीपक सोनकांबळे, समता सैनिक दलाचे सचिन दिलपाक, प्रा. सुधीर कांबळे, ब्रह्मानंद गायकवाड, विद्याताई कांबळे, तसेच उमरगा तालुक्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते. शाखा स्थापन करण्यासाठी ब्रह्मानंद गायकवाड यांनी विशेष परिश्रम घेतले.
यानंतर अॅड. भंडारे यांनी तेर गावातील ऐतिहासिक बुद्ध लेणी व चैत्यांना भेट देऊन माहिती घेतली. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई यांच्या पुतळ्याला अभिवादन करून त्यांचा समता सैनिक दलाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
भंडारे यांनी पुढे उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रसिद्ध नळदुर्ग किल्ल्याला भेट देऊन त्याचे ऐतिहासिक महत्त्व जाणून घेतले. तसेच जिल्हा पदाधिकारींसह संघटक एस. टी. गायकवाड यांच्या अकाली निधनानिमित्त पुण्यानुमोदन विधीला उपस्थित राहून श्रद्धांजली वाहिली. या कार्यक्रमामुळे धाराशिव जिल्ह्यात धम्म प्रसाराच्या कार्याला नवी दिशा मिळाल्याचे मान्यवरांनी मत व्यक्त केले.