मनुष्य आपल्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी आयुष्यभर पळत असतो. या धावपळीच्या जीवनामध्ये जणू काही तो स्वतःला विसरून जातो, आपल्याला काय आवडतं? आपले छंद काय आहेत, याचा तो विचारच करत नाही, असे म्हणण्यापेक्षा हा विचार मनात यायला त्याला सवडच नसते. खरंच यालाच आयुष्य जगणं असं म्हणतात का? हा प्रश्न नेहमीच माझ्यासमोर उभा राहतो. आपल्या आवडीनिवडी, छंद याला आपल्या जीवनामध्ये खूप महत्त्वाचे स्थान आहे.त्यासाठी आपण आवर्जून वेळ काढला पाहिजे. कारण, आपण सजीव मानव आहोत, निर्जीव यंत्रे नाहीत. यंत्रे ही काम करतात: पण त्यांना भावना कुठे असतात. आपले मात्र तसं नाही, मनुष्य समाजशील प्राणी आहे, तो भावनाप्रधान आहे. त्यामुळे माझे असे प्रामाणिक मत आहे की, मनुष्याने थोड्याफार प्रमाणात का होईना, आपले छंद जोपासावे. त्यातून आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होण्यास नक्कीच हातभार लागतो, हे मानणाऱ्यापैकी मी सुद्धा एक आहे. असेच आपली लिखाणाची आवड जोपासणारे कैलास कांबळे यांचे “मनातील कवडसे” हे पुस्तक नुकतेच माझ्या वाचण्यात आले. ते स्वतः उच्चशिक्षित असून, बँकेतील नोकरीच्या मोठ्या हुद्द्यावरून सेवानिवृत्त झालेले आहेत. बँकेतील नोकरी करत करत सोबतच त्यांनी आपल्या लिखाणाचा छंदही जोपासला आहे. रोजच्या जीवनामध्ये त्यांना जे अनुभव आले, ज्या लोकांशी ते भेटले, संवाद झाला, त्याआधारे त्यांनी छोटे-छोटे असे एकूण ७८ लेख या पुस्तकात लिहिलेले आहेत. प्रत्येक लेखाचा विषय हा वेगवेगळा आहे. काही लेख विनोदी, काही व्यक्ति चित्रावर आधारित, काही अंधश्रद्धेवर आधारित, तर काही गंभीर विषय अशा स्वरूपाचे लेख आहेत. त्यांची निरीक्षण शक्ती आणि संवाद कौशल्य प्रचंड आहे, हे प्रत्येक लेख वाचताना मला जाणवले. कारण त्याशिवाय अशा विविध विषयावर लिखाण करणे तसे फार अवघड काम आहे.
शिक्षणाशिवाय तुमचा विकास होणार नाही. याला कोणताही शॉर्टकट नाही, हाच संदेश शिक्षणाचे महत्त्व हा लेख आपल्याला देतो. सध्या एकत्र कुटुंब पद्धती लयाला चाललेली आहे. छोटे कुटुंब, त्रिकोणी कुटुंब ही संकल्पना उदयास येत आहे. त्यामुळे मुलांना आजी-आजोबा यांचे प्रेम मिळत नाही या प्रेमावर प्रकाश टाकणारा आजी-आजोबा नावाचा लेख या पुस्तकात मला वाचला मिळाला.
आपण एकविसाव्या शतकात, विज्ञान युगात वावरतो आहोत. स्वतःला खूप प्रगतिशील समजतो इ.अशा मोठ्या गप्पा नेहमीच मारत असतो आणि दुसऱ्या बाजूला, अंधश्रद्धा ही मोठ्या प्रमाणात पाळत असतो. लोक आपल्या अज्ञानाचा कसा फायदा घेतात हा डोळे उघडणारा नारळ नावाचा लेख या पुस्तकात आहे,तो मला विशेष करून आवडला. आजच्या जीव घेण्या स्पर्धेच्या युगामध्ये आपल्याला थोडं जरी अपयश आलं, तरी लगेच आपण खचून जातो. हार मानतो, आपल्याला नैराश्य येते, नको ते विचार मनामध्ये यायला लागतात. अशा लोकांना आत्मविश्वास देण्याचे काम ‘कुबड्या’ नावाचा लेख करतो. हे पुस्तक म्हणजे, आपली आवड कशी जोपासावी आणि त्यातून खरा आनंद कसा मिळवावा याचा उत्तम नमुना म्हणून मी याकडे पाहतो. लोक काय म्हणतील? हे पारंपरिक कारण दूर सारून लेखकाने मुक्तपणे आपल्या भावना,आपले विचार या पुस्तकात मांडले आहेत. आता हे पुस्तक नक्की कोणत्या विषयात किंवा कोणत्या श्रेणीत येईल, हे मी वाचकांवर सोडतो.
पुस्तकाचे नाव : मनातील कवडसे
लेखक : कैलास कांबळे
किंमत : १८० रुपये मात्र
पाने : १२८ सुशील म्हसदे
मो. 9921241024