तुकारामजी डोंगरे अगदी सामान्य माणूस, मात्र आंबेडकरी निष्ठा ठासून भरलेली. शेड्युल्ड कास्ट फेडरेशन चे कार्यकर्ते, डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रबुद्ध भारत चे वर्गणीदार, १९६४ साली बाबासाहेबांच्या स्मारका साठी हातरुण येथुन ९ रुपयाची मनिऑर्डर पाठविणारे, बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण नंतर स्थापन झालेल्या रिपब्लिकन पक्षाचे हातरुण ग्राम शाखा अध्यक्ष, अशी बावनकशी निष्ठावंत म्हणून ओळख असलेल्या बाळापुर तालुक्यातील हातरुण येथील बाबासाहेबांच्या चळवळीत योगदान देणा-या भिमसैनिकाने काल जगातून एक्झिट घेतली. भारिप पासून कार्यरत दिलीप डोंगरे ह्या बाळासाहेब आंबेडकर ह्यांच्या जुन्या कार्यकर्त्याचे तुकारामजी वडिल होते. हातरुण तसे अकोला जिल्ह्यातील आडवळणाचे गांव. मात्र ह्या गावात परमपुज्य बोधीसत्व डॉ. बाबासाहेबांना मुंबई येथील सभेत प्रत्यक्ष पाहणारे आणि शेड्युल्ड कास्ट फेडरेशन च्या काळा पासुन आंबेडकरी चळवळीत एकनिष्ठेने कार्यरत तुकारामजी डोंगरे राहत होते. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणा नंतर स्थापन झालेल्या रिपब्लीकन पक्षाच्या ग्राम शाखा अध्यक्ष म्हणून त्यांच्याकडे स्वत:च्या पदाचा रबरी शिक्का होता. १९५६ नंतर त्या काळातील पक्ष बांधणीची साक्ष देते. सोबतच बाबासाहेबांनी दिलेल्या प्रत्येक आदेशा बरहुकूम काम करणारे निष्ठावंत आपल्या गरिबी वर मात करून पक्ष चालवत असल्याचे हे मूर्तिमंत उदाहरण आहे.
बाळापुर तालुक्यातील हातरुण येथील बाबासाहेबांच्या शेडुल्ड कास्ट फेडरेशन च्या काळा पासुन आंबेडकरी चळवळीत एकनिष्ठेने कार्यरत होते. त्यांचे कडे रिपब्लिकन पक्षाच्या हातरुण शाखा अध्यक्ष पदाची जबाबदारी होती. तुकारामजी डोंगरे हे प्रबुध्द भारत चे वार्षिक वर्गणीदार होते. प्रबुद्ध भारत साठी त्यांना प्रत्यक्ष बाबासाहेबांनी प्रबुध्द भारत सभासद वर्गणीची पोच दिली आहे. प्रबुद्ध भारत चे अंकाचा हा अनमोल ठेवा त्यांनी सात लोखंडी पेट्यात त्यांनी जपून ठेवला होता.
भय्यासाहेब आंबेडकर ह्यांनी चैत्यभूमी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्यांचे स्मारक लोकवर्गणीतून उभारण्याचा मानस व्यक्त करीत महू ते मुंबई अशी भिम ज्योत काढली होती. भय्यासाहेब आंबेडकर ह्यांचे आवाहना नुसार तुकारामजी डोंगरे ह्यांनी सन १९६४ मध्ये बाबासाहेबांच्या चैत्यभूमी वरील स्मारका साठी ९ रुपयाची मनिऑर्डर पाठवली होती. ७ मे १९६४ हातरुन येथील पोस्ट कार्यालयातुन केलेली ही मनिओर्डर भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने भैय्यासाहेब आंबेडकरांनीच स्विकारली होती. Y.B.Ambedkar असे नाव लिहुन भैय्यासाहेबांनी स्वाक्षरी केलेली पोहचपावती त्यांच्या कडे आहे. मनिऑर्डर पोचपावती वर भैय्यासाहेब आंबेडकरांच्या स्वाक्षरी सोबत भारतीय बौध्दमहासभा चा शिक्का आहे.
घरात अठरा विश्व दारिद्य्र असतांना देखील बाबासाहेबांच्या स्मारकासाठी स्वत:च्या कमाईतुन त्या काळी ९ रुपये पाठवून ‘दानत’ उपाधीला लाजविणारी ही पिढी होती. आपल्या तुटपुंज्या कमाईचा हिस्सा आपल्या उद्धारकर्त्याच्या स्मारकासाठी द्यावा ही भावना आणि समर्पण अतुलनीय आहे. ही भावना जपत आपले अमूल्य योगदान देणारे तुकारामजी खरेच ग्रेट आणि ग्रेटच होते….२०१५ मध्ये मी युवा आघाडी अमरावती विभागीय अध्यक्ष असतांना त्यांची भेट घेऊन त्यांच्या त्याग आणि निष्ठेची माहिती समाज माध्यमातून आणि वर्तमानपत्रा मधून सार्वजनिक केली होती. त्यांच्या कडून माहिती घेताना मन अगदी भारावुन गेले होते, प्रबुद्ध भारत अंक आणि मनिऑर्डर पोचपावती पाहुन. खरंच अश्या अनेक दखल न घेतलेल्या सैनिकांनीच आंबेडकरी चळवळीतील सामाजिक राजकीय क्रांतीलढा त्यांच्या निष्ठावान खांद्यावर पेलला आहे. तुकारामजी तुमच्या कर्तुत्वाला मानाचा, सन्मानाचा क्रांतिकारी जयभिम.
राजेन्द्र पातोडे,
प्रदेश महासचिव, वंचित बहुजन युवा आघाडी,
महाराष्ट्र प्रदेश.