भारत जोडो न्याय यात्रा समापन सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद होता. बाहेरगावावरून आलेले अनेक लोक उपस्थित होते. मात्र यात शिवसेना, काही प्रमाणात धारावीमधील जनता आणि वंचित समर्थकच बहुसंख्येने होते, असं तिथं उपस्थित असणाऱ्या आमच्या प्रतिनिधीने कळवले आहे. मात्र, मी आज उगाच टीका करणार नाही. सर्वपक्षीय नेत्यांनी चांगले मुद्दे मांडले.
राहुल गांधी यांनी नाव न घेता अशोक चव्हाण यांच्याबद्दल गौप्यस्फोट केला की महाराष्ट्रातील एक बडा नेता माझ्या आईला (सोनिया गांधी) फोन करून रडत सांगत होता. सोनियाजी मला लाज वाटते, माझ्यात यांच्याशी लढण्याची ताकद नाही. मला जेलमध्ये जायचं नाही, अशा शब्दात राहुल गांधी यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर काल हल्लाबोल केला. तसेच असे हजारो लोक आहेत जे घाबरले आहेत असेही म्हटले. या शिवाय ईव्हीएमसंदर्भात त्यांनी महत्वाचे विधान केले की देशाच्या निवडणूक आयोगाला आम्ही ईव्हीएम मशीन दाखवण्याची मागणी केली तर त्यांनी ही मागणी मान्य केली नाही. राजाचा आत्मा ईव्हीएममध्ये आहे. नरेंद्र मोदी हे मास्क आहेत, मुखवटा आहेत. जसं बॉलीवूडच्या कलाकारांना सूचना दिल्या जातात. तसे ते अभिनय करतात तसेच नरेंद्र मोदी अभिनय करतात, त्यांना चालवणारी एक शक्ती आहे. आम्ही त्या शक्तीच्या विरोधात लढत आहोत. शिवसेना आणि राष्ट्रवादीचे लोकं असेच भाजपमध्ये गेलेले नाहीत. ज्या शक्तीचा मी उल्लेख करत आहे त्यांनी या लोकांचे गळा पकडून त्यांना भाजपमध्ये घेतलं आहे. त्यामुळे हे सगळेच लोक घाबरून भाजपसोबत गेले आहेत. एकटे राहुल गांधी सोडले तर प्रत्येकाला केवळ 5 मिनिटे बोलण्याचा वेळ देण्यात आला होता. मात्र प्रत्येकाने त्यावर महत्वाचे मुद्दे मांडले.
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर ईव्हीएमच्या संदर्भात महत्वाचे मुद्दे मांडले. 2004 पासून आपण ईव्हीएमविरोधात लढत असल्याचे त्यांनी म्हटले, ईव्हीएम मशीन या अमेरिकेतून आयात केल्या जातात. मात्र या मशीनमध्ये जी चीप वापरली जाते ती 20 ते 25 रुपयांमध्ये आपल्याकडे बाजारात मिळते. त्यामुळे यामध्ये फेरफार केला जाऊ शकतो, अशी धक्कादायक माहिती यावेळी त्यांनी दिली. तसेच इलेक्ट्रोल बाँड संदर्भात भाष्य करताना ते म्हणाले की, एक फ्युचर गेमिंग कंपनी आहे, या कंपनीचा फायदा 200 कोटी आहे, तर 1300 कोटीचे बाँड या कंपनीने कुठून घेतले असा सवाल करत आंबेडकर म्हणाले, मी अशा अनेक कंपन्यांची नावे सांगू शकतो. मग मोदींना या कंपन्यांना सवाल विचारला पाहिजे का नाही. लोकांनी विचारलं पाहिजे. ईडीने या कंपन्यांना विचारलं पाहिजे. पण कुणीच काही बोलत नाही.
हिंदू धर्मातील कुटुंब संकल्पनेबद्दल बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी नरेंद्र मोदी यांच्या पत्नीचा उल्लेख केला आणि तो भाजपासारख्या पक्षांना जखमी करणारा आहे. कारण, उठसुठ हिंदू धर्म हिंदुत्ववाद यावर राजकारण करणाऱ्या भाजपची ही दुटप्पी दुतोंडी भूमिका स्पष्ट होते. याच मुद्यावरून मागे लालू प्रसाद यादव यांनीही नरेंद्र मोदीवर टीका केली होती की मोदी यांनी त्यांना मातृशोक झाल्यावर मुंडन का केले नाही. हिंदू धर्मात तर मुंडन करणे अपरिहार्य प्रथा आहे. हे मुद्दे अवघड जागेचे दुखणे आहे, जगाला हिंदू धर्माच्या नावाखाली ट्रोल करणे टीका करणे टोमणे मारणे असले उद्योग करणारे स्वत:मात्र अशा पद्धतीने वागत असल्याचे चित्रं जनतेसमोर मांडण्यात आले. हे काम प्रकाश आंबेडकर यांनी काल केले. यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर असेही म्हणाले की, हा व्यक्तिगत मुद्दा आहे. मान्य आहे. पण या चर्चांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सुरुवात केली आहे. नॅशनल कल्चरबद्दल तेच बोलले होते, पण आता ते विसरले आहेत. त्यामुळे आता आपणच याचा प्रसार केला पाहिजे, असेही आंबेडकर म्हणाले. याचा अर्थ असा की जे धर्माच्या नावाने राजकारण करतात, संस्कृती अमुक ढमुक नियम वगैरे बोलत असतात. त्यांच्या प्रत्यक्ष कथनी अन् करणीत हा जो काही विरोधाभास आहे तो ठळकपणे वेगळा आहे.
उद्धव ठाकरे यांनी भाजपवर थेट हल्ला करत हा फुगा आम्हीच फुगवला अशा शब्दांत सुरुवात केली. संपूर्ण भारतात यांचे दोन खासदार होते. आम्ही त्यात हवा भरली, आता मात्र त्यांच्या डोक्यात हवा गेली. भाजप ४०० पार म्हणतात हे काय फर्निचरचे दुकान आहे का?, असा टोला देखील उद्धव ठाकरे यांनी लगावला. मोदींच्या कुटुंबात ते आणि त्यांची खुर्चीच आहे. तोच मोदींचा परिवार आहे. घटना बदलण्यासाठी भाजपला ४०० पार हवे आहेत. भाजपाचे अनंतकुमार हेगडे यानीच असं म्हटलं होतं, असा आरोप ठाकरेंनी यावेळी केला. अबकी बार भाजप तडीपार, असा नारा उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला.
तेजस्वी यादव म्हणाले की, या देशाचे संविधान आणि बंधुता वाचवण्यासाठी आपण सर्वजण एकत्र आलो आहोत. आमचा लढा वैयक्तिकरित्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदींविरुद्ध नाही तर त्यांच्या विचारसरणीविरुद्ध आहे. ज्यांचा देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात योगदान नाही, ज्यांनी कधी स्वत:च्या कार्यालयावर तिरंगाध्वज फडकावला नाही ते लोक आज मोठे देशभक्त म्हणून मिरवत आहेत. ते म्हणाले, “देशाचा सर्वात मोठा शत्रू महागाई आणि बेरोजगारी आहे. ” शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करून दोन कोटी रोजगार निर्माण करण्याच्या आश्वासनावर आम्ही प्रश्न विचारतो तेव्हा भाजपचे काही लोक एनर्जी ड्रिंक्स पितात आणि शिवीगाळ करतात.
कालच्या सभेच्या अन्वयार्थ लावायचा तर भाजपाच्या गोटात कमालीची अस्वस्थता दिसून येते आहे. कालची सभा आणि देशात फुटलेला इलेक्ट्रोल बाँड या दोन गोष्टी भाजपला बऱ्यापैकी डॅमेज करणाऱ्या ठरल्या आहेत, असे बोलले जात आहे. सोशल मीडियातसुद्धा अशीच चर्चा आहे. या सभेमुळे राज्यातील अन् देशातील जनतेच्याही अपेक्षा उंचवल्या आहेत असे एकूण चित्र आहे. कारण, सगळेच भाजपाविरोधी पक्ष एकाच मंचावर असलेले पाहून जनताही आश्वस्त झाली आहे. मात्र ही एकी प्रत्यक्ष निवडणुकांपर्यंत टिकते की नाही हे येत्या काळात स्पष्ट होईलच. परंतु, जर ही एकी राखता आली नाही तर मात्र भाजपाचा पराभव करणे मुश्किल ठरणार आहे.