धर्मांधता व दहशतवाद या दोन समस्यांचा बिमोड करण्यासाठी संपुर्ण जगात आज चर्चा व प्रयत्न चालू असले, तरी धार्मिक दहशतवाद पुन्हा पुन्हा डोके वर काढताना दिसत आहे. त्याचे ताजे उदाहरण म्हणजे तालिबान्यांनी बंदुकीच्या जोरावर २० वर्षानंतर पुन्हा एकदा अफगाणिस्तानवर मिळवलेला ताबा !
तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर ताबा मिळवताच आम्ही ‘शरियत’ नुसार इस्लामिक पध्दतीचे कायदे लागू करू व राज्यकारभार चालवू असे जाहिर केले आहे. त्यामुळे अफगाणिस्तानातील सर्वसामान्य नागरिक, महिला व लहान मुले भयभीत होऊन, तलिबान पुर्वीप्रमाणेच अमानुष राजवटसुरू करेल या भितीने अनेकजण देश सोडून जात आहेत व जे उरले आहेत त्यांचे हाल हाल होताना सारे जग पाहत आहे. दररोज येणाऱ्या बातम्या व व्हायरल होणारे व्हिडिओ पाहून अफगाणिस्तान पुन्हा एकदा स्मशान होण्याच्या मार्गावर चालला आहे. याचे मुख्य कारण म्हणजे दहशतवाद व धार्मिक कट्टरता हे आहे. कोणताही देश संविधानानुसार चालला नाही, तर त्या देशाचे काय हाल होतात, याचे ताजे उदाहरण म्हणजे अफगाणिस्तान आहे. बंदुकीच्या जोरावर हुकूमशाहीने मिळवलेली सत्ता गुलामीला जन्म देते. मानवी हक्क, महिलांचे अधिकार अफगाणिस्तानात संपुष्टात आले आहेत. नवीन गुलामगिरीला तेथे सुरूवात झाली आहे. ही जगाला व विशेषता भारताला धोक्याची घंटा आहे.
भारतातही राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या स्थापनेपासून हिंदू धर्म, हिंदुंचे संघटन, हिंदुराष्ट्र, हिंदु संस्कृती, हिंदुंचा इतिहास हे परवलीचे शब्द झालेले आहेत. हिंदू राष्ट्र निर्मिती हे संघाचे अंतिम उद्दिष्ट आहे. भारतीय संविधान हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हिंदू राष्ट्र निर्मितीतील सर्वात मोठा अडसर आहे. संघाला भारतीय संविधान खऱ्या अर्थाने मान्य नाही. ते भंगार झाले आहे. असे त्यांचे स्वंयसेवक जाहिरपणे बोलतात. दिल्लीमध्ये संविधानाच्या प्रती जाळणे हे संघाच्या मुशीतून तयार झालेल्या लोकांचे काम आहे व त्यांना संघप्रणित सत्तारूढ झालेल्या भाजपा सरकारचा उघडपणे पाठींबा आहे. आधुनिक लोकशाही, स्वातंत्र्य, समता, विज्ञाननिष्ठा, इहवाद या संकल्पना व मुल्ये संघाला मान्य नाहीत. संघाला संविधान मान्य नाही. देशाचा राष्ट्रधव्ज मान्य नाही. संघाला भगवा धव्ज अभिप्रेत आहे. शाळा, महाविद्यालयापासून सर्वच क्षेत्रात त्यांचे ‘भगवेकरणाचे’ काम चालू आहे. इतिहासाचे, पाठ्यपुस्तकांचे पुर्नलेखन चालू आहे. संघ शाखांवर लाखो स्वंयसेवकांच्या माध्यमातून हे काम अविरतपणे चालू आहे. संघाला सामाजिक समता मान्य नाही. सामाजिक समरसता हा शब्दप्रयोग ते करतात व तसे कार्यक्रम घेतात. संविधानातील धर्मनिरपेक्षता संघाला नकली वाटते, तर समाजवादाशी त्यांचे हाडवैर आहे. संघ धर्मांध आहे, संघ धार्मिक दहशतवाद जोपासतो पण तो छुपा! संघाला साधनसुचिता मान्य नाही. हिंसाही त्यांना वर्ज्य नाही. भारतात धार्मिक दंगली घडवल्या जातात, त्यात संघ व त्याची अपत्य असणाऱ्या असंख्य संघटनांचा सहभाग असतो. संघ यामध्ये उघडपणे सहभाग घेत नाही, छुप्या पध्दतीने तो काम करतो व करवून घेतो. आज विविध क्षेत्रात संघाची अपत्य असणाऱ्या संघटना काम करतात, त्यात विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, सनातन संस्था, हिंदू महासभा, पतित पावन संघटना, भाजप, अभाविप, जनता युवा, विवेकानंद सोसायटी, राष्ट्र सेविका समिती, गोरक्षा समिती अशा एक नव्हे अनेक संघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अधिपत्याखाली काम करतात व त्या सर्वांचे अंतिम उद्दीष्ठ ‘हिंदुराष्ट्र’ हे आहे.
भारतात संघप्रणित भाजपाचे अटलबिहारी बाजपेयी व मोदी सरकार सत्तारूढ झाल्यापासून किंबहुना त्याच्याही अगोदर संघाने विविध क्षेत्रात पाय पसरवण्यास सुरूवात केली. शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ, शैक्षणिक संस्था, बॅंका, साहित्य क्षेत्र, वृत्तपत्रे, समाजमाध्यम, उद्योगक्षेत्र, सरकारी यंत्रणा, कायदेमंडळ, न्यायसंस्था, अशा मोक्याच्या ठिकाणी संघाच्या मुशीत तयार झालेली स्वत:ची माणसं पेरली गेली व तेथे हिंदुराष्ट्र निर्मितीचे जे संघाचे अंतिम उद्दीष्ठ आहे, ते पुर्ण करण्यास सुरूवात केली. तालिबान उघडपणे बंदुकीच्या जोरावर धार्मिक दहशतवाद पसरवतो, तर संघ छुप्या पध्दतीने धार्मिक दहशतवाद जोपासतो ! आता तर संघाने नवीन खेळी सुरू केली आहे. संविधानाला मानायचे नाही परंतु, संविधानाच्या माध्यमातून सत्तारूढ होऊन सत्ता हस्तगत करून हिंदुराष्ट्र निर्मितीचा आपला अजेंडा राबवायचा, हे धोरण संघाने आखले आहे. त्यासाठी त्यांनी सर्वसामान्य लोकांची बुध्दिभेद करण्याचा डाव समाजमाध्यमातून सुरू केला आहे. ‘संघ बदलतो आहे’, ‘आम्ही सहिष्णू आहोत’ असे खोटे बोलायचे पण रेटून बोलायचे ही हिटलरी गोबेल्स नीती वापरून सामान्य जनतेची फसवणूक करण्याचे मोठे षडयंत्र देशात सध्या चालू आहे.
राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचा हा धोका ओळखून डॉ. बाबा आढाव यांनी ‘संघाची ढोंगबाजी’(१९७७) व ‘संघापासून सावध’(१९७९) या पुस्तिका लिहिल्या होत्या. आणीबाणीतील स्थानबध्दतेच्या काळात येरवडा कारागृहात एकत्र राहिल्याने संघाचे तात्कालीन सरसंघचालक बाळासाहेब देवरस व त्यांचे संघजन व पदाधिकारी यांना जवळून पाहता आले, त्या काळातील संघ व संघ नेतृत्वाचे वर्तन, वक्तव्य, त्यांचा सरकारशी गुपीत पत्रव्यवहार, छुपा अजेंडा, माफीनामा, अंडरटेकिंग, देवरसांचे लोटांगण याचा प्रत्यक्ष आलेला अनुभव याच्या आधारे डॉ. बाबा आढाव यांनी प्रस्तुत पुस्तिका लिहिल्या आहेत.
आजचे संघाचे व सत्तारूढ झालेल्या भाजपाचे वास्तव स्वरूप पाहता ४०/४५ वर्षांपूर्वी डॉ. बाबा आढाव यांनी संघाचे केलेले निरिक्षण, दिलेले इशारे आजही तंतोतंत जुळणारे आहेत. आज भारताला व दुनियेला धर्मांधता व सशस्त्र दहशतवादाने ग्रासले आहे. त्याला उत्तर धर्मांधतेने देऊन चालणार नाही. त्याला धर्मनिरपेक्षतेनेच उत्तर देता येईल. भारतात संसदीय लोकशाही धर्मनिरपेक्ष पायावर रूजली आहे. धर्मनिरपेक्षता रूजली तर भारताचा प्रगतीचा वेग वाढेल. भारताला धर्मराष्ट्र बनवण्याचा संघाचा उद्योग थांबविला पाहिजे. धर्मांधता व दहशतवादाशी वेळीच मुकाबला केला पाहिजे. त्यासाठी डॅा. बाबा आढाव यांनी लिहिलेली व दिग्नाग प्रकाशनाने पुर्नमुद्रण केलेली ही पुस्तिका महत्वाची आहे.
– विलास टेकाळे
ढोंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघापासून सावधान!
लेखक : डॉ बाबा आढाव
प्रकाशन : दिग्नाग प्रकाशन
सेवामुल्य : ३०/- रुपये