बार्शी टाकळी : अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी नगरपरिषदेवर वंचित बहुजन आघाडीने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. नवनिर्वाचित नगराध्यक्षा अख्तर खातून अलीमुद्दीन यांनी आज वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पदभार स्वीकारला.
या पदग्रहण सोहळ्यानिमित्त बार्शी टाकळी शहरात वंचित बहुजन आघाडीने मोठे शक्तिप्रदर्शन केले आहे.

बार्शी टाकळी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी अख्तर खातून अलीमुद्दीन यांच्या निवडीमुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. आज झालेल्या पदग्रहण सोहळ्यासाठी सुजात आंबेडकर यांनी विशेष उपस्थिती लावली.
यावेळी नगराध्यक्षांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. नगरपरिषदेच्या माध्यमातून शहराचा विकास आणि वंचित घटकांना न्याय देण्याची भूमिका यावेळी मांडण्यात आली.

या सोहळ्याला वंचित बहुजन युवा आघाडीचे
राजेंद्र पातोडे (प्रदेश महासचिव, वंचित बहुजन युवा आघाडी), प्रमोद देंडवे (अकोला जिल्हाध्यक्ष), श्रीकांत घोगरे (युवा जिल्हाध्यक्ष) यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नगराध्यक्षा अख्तर खातून यांनी पदभार स्वीकारल्यानंतर शहराच्या मूलभूत समस्या सोडवण्याला आणि पारदर्शक प्रशासनाला प्राधान्य देणार असल्याचे सांगितले. सुजात आंबेडकर यांच्या दौऱ्यामुळे अकोला जिल्ह्यात कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून महानगरपालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी मोठी आघाडी घेईल असे चित्र आहे.






