भाजप यावेळी उत्तरप्रदेश राज्यात सत्ता स्थापनेसाठी अपयशी ठरेल एकंदरीत हे सर्वांचं मत होतं. अनेकांनी भविष्यात गरज पडल्यास सपा (समाजवादी पार्टी) आणि बसपा (बहुजन समाज पार्टी) मिळून सत्ता स्थापनेचा विचार करू शकते, असे अनुमान देखील मांडले होते. महाराष्ट्राच्या राजकारणाचा आधार घेत प्रादेशिक पक्षांच्या भूमिकेबाबत अशी खूप सारी राजकीय गणितं पुढे येत होती; परंतु सर्व अनुमान सपशेल फेल ठरत भाजप सत्तेत बसते हे प्रत्येकाला अचंबित करणार ठरलं. मध्यंतरी राहुल गांधींच्या प्रधानमंत्री होण्याबाबत बाळासाहेब आंबेडकरांना प्रश्न विचारल्यावर ‘मायावती या प्रधानमंत्री झाल्यावर आनंद वाटेल’ अस वक्तव्य त्यांनी केलं होतं, तर आजच्या उत्तर प्रदेश निकालानंतर आपल्या घसरत्या टक्केवारीच चिंतन होणे गरजेचं आहे, असं बसपाच्या सर्वेसर्वा मायावती म्हणाल्या. आंबेडकरी कार्यकर्त्या म्हणून राजकीय चळवळीचा भाग असताना या दोन्ही विधानांच्या विरोधाभासाच्या टोकापर्यंत जाणे फार गरजेचं मी मानतो. कारण, राजकीय मतभेदांपेक्षा आंबेडकरी चळवळीची दशा हा फार गांभीर्याचा विषय आहे.
आपण राजकीय चळवळीचा भाग असताना यावेळी बसपाची भूमिका संभ्रमित राहिली. जो बसपा १९९६ मध्ये ८ व्या क्रमाकांचा तर १९९८ मध्ये चौथ्या क्रमाकांचा राष्ट्रीय पक्ष बनला त्याची या निकालात दुर्दशा झालेली जाणवते. कांशीरामांनी ज्या समूहाकडे दुर्लक्ष केले त्यांच्यावर आता विश्वास ठेवला गेला. बसपाने प्रतिनिधित्व हा मुद्दा सातत्याने मांडत असताना पक्षाच्या महासचिवपदी बसवलेला सवर्ण नेता आणि त्याच्या भूमिका लक्षात घेता अपयशाला आणि संभ्रमतेला कारण बनले. कारण, बसपाने प्रचारादरम्यान उत्तरप्रदेशात ब्राम्हणांच्या सभेवर फोकस केलं, जेव्हा त्यांना स्वतःच्या मजबूत मतदारांकडे प्रामुख्याने लक्ष देण्याची गरज होती.
रिपब्लिकन पक्षाच्या विश्वासहार्यतेचा मुद्दा पुढे आल्यानंतर महाराष्ट्रात ‘दलित पँथर’ला भूमिका घ्यावी लागली होती. उत्तरप्रदेशात ही आझाद समाज पार्टीचा उदय ही त्याच पद्धतीने झाला. परंतु, यावेळेस ही बसपाने विश्वास न ठेवता मतांचे विभाजन झाले. ब्राम्हणांचे १०% मतदान आणि जाटवांच्या १०% मतदानाच्या पॉलिसीला भुलून हे सर्व अपयश ओढावून घेतले गेले. आणि त्याचमुळे चौथ्या क्रमांकावर असलेला पक्ष, प्रधानमंत्री पदासाठी दावेदार असणारा चेहरा हे तयार केलेलं उपद्रव मूल्य ढासळलं गेलं.
बसपाच्या कार्यकर्त्यांनी आणी नेत्यांनीही ज्येष्ठांनी सुपीक करून ठेवलेल्या जमिनीला मशागतीची गरज नसल्यागत भूमिका घेतली. बहुजन, मुस्लीम आदींच्या अत्याचारात होणारी वाढ, सामाजिक प्रश्नांचे आंदोलन आदी निर्माण होणाऱ्या समस्यांच्या वेळी आझाद समाज पार्टी इतकी सक्रिय भूमिका घेतली नाही. परिणामी, युवकांची सर्वाधिक संख्या चंद्रशेखर आझाद यांच्यासोबत दिसली. दूरदृष्टी बाळासाहेब आंबेडकरांनी निवडणुकीआधी समाजवादी पक्षाला मतदान करण्यासाठी आवाहन केले होते. यामागे बसपाची प्रचारादरम्यान न दिसणारी सक्रियता ही कारणे होती. त्यामागे बसपाची स्वतःची काही कारणे असतील; परंतु हे वक्तव्य पुढे चुकीच्या पद्धतीने आणत वादग्रस्त ठरवलं गेलं होतं. पंरतु, त्या विधानामागील गांभीर्याची प्रचिती आता येत आहे, असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती ठरू नये. कारण, निवडणुकात जातींना प्राधान्य मिळत असलं, तरीदेखील स्वजातीय राजकारणाच्या विश्वासावर यश अवलंबून नसतं, ही बाब देखील येथे दुर्लक्षित राहिली आहे.
निष्ठावंत होणे आणि प्रशिक्षित होणे या दोन गोष्टीत फरक आहे. निष्ठा ही भावनिक आणि वैचारिकतेतून येत असते. यातील एका गोष्टीचा ही समतोल ढासळला तर आपली गणितं चुकतात. केडर कार्यकर्ता प्रबोधनाच्या नावात असाच गुरफटला गेला याचं उत्तर म्हणजे १२% मतदानात झालेली घट आहे. तसेच पे बॅक टु सोसायटीच्या बाबत ही तेच झालं आहे. प्रबळ असा एलाईट वर्ग बसपाकडे असतांना त्याचा उपयोग सामान्यांसाठी न करता फक्त पक्षीय राजकारणासाठी व्यर्थ केला गेला.
बसपाचे दलित मतदान विभागले गेले. ते बसपा आझाद समाज पार्टी पुरते विभागले गेले नसून, त्याचा फायदा समाजवादी पक्षाला ही झाला. याला बसपा ही जबाबदार आहे. मायावतींनी निकालानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुस्लीम मते समाजवादी पक्षाकडे वळल्याचे म्हटले. त्याची नीटशी कारणे तपासली तर आजच्या घडीला दूषणे लावण्यापेक्षा त्यांना सामावून घेण्याची भूमिका आणि त्यांच्यातील संभ्रमतेला दूर करण्यासाठी योग्य ते प्रयत्न झाले नाही.
स्वतःच्या चुका दुर्लक्षित ठेवणे हा मानवी स्वभाव आहे. परंतु, आत्मटीका आणि चिंतन हे मानवी उन्नतीसाठी प्रमुख जबाबदारी निभावत असतात. बसपाच्या चुकांची यादी फार आहे यातला भाग नाही. परंतु यामुळे आंबेडकरी कार्यकर्त्यांमध्ये नैराश्य निर्माण होऊ नये म्हणून मायावतींनी ही तातडीने याकडे लक्ष देत भूमिका जाहीर केली आहे. तसेच भाजप हा पुन्हा सत्तेत आला हे किती ही सकारात्मक मांडलं गेलं असलं, तरी ही आंबेडकरी चळवळीचे राजकीय विश्लेषक भास्कर भोजने यांनी ‘भाजपची किंवा मोदीची लाट वगैरे काही नाही, सत्य समजून घ्या देशातील ४१३९ आमदारांपैकी भाजपकडे फक्त १५१६ आमदार आहेत, ६६% आमदार विरोधी पक्षाकडे आहेत…!’ असे मत मांडून प्रसारमाध्यमे याकडे दुर्लक्ष करत आहेत, असे सूचक मत मांडले आहे. यावर ही जाणीवपूर्वक लक्ष देत आंबेडकरी चळवळीला दिशा देण्यासाठी काम करणे गरजेचे आहे.
– संविधान गांगुर्डे