औरंगाबाद : महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत वंचित बहुजन आघाडीने आपला प्रचाराचा वेग वाढवला आहे. आज वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी औरंगाबाद येथे जाहीर सभा घेतली. या सभेनंतर वंचित बहुजन आघाडी निवडणुकीत जोरदार मुसंडी मारणार असल्याचे कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.
उस्मानपुरा परिसरातील प्रभाग क्रमांक २८ च्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी या सभेमधून स्थानिक प्रश्नांवरून प्रशासनावर हल्लाबोल केला.

प्रभाग २८ च्या उमेदवारांसाठी शक्तिप्रदर्शन
उस्मानपुरा येथील राहुल नगर, कबीर नगर आणि फुले नगर या भागात ही सभा पार पडली. प्रभाग २८ चे अधिकृत उमेदवार लता निकाळजे, अय्युबखान जब्बार खान पठाण, वर्षा काळे आणि पंकज बनसोडे यांच्या प्रचारासाठी ही सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी परिसरातील नागरिकांनी ‘वंचित’च्या नेत्यांचे जंगी स्वागत केले.

उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना प्रा. अंजलीताई आंबेडकर म्हणाल्या की, “महानगरपालिकेत सत्ता भोगणाऱ्यांनी सामान्यांच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष केले आहे. औरंगाबाद शहराचा स्थानिक विकास आणि नागरी सोयीसुविधांसाठी वंचित बहुजन आघाडी एक सक्षम पर्याय आहे. आम्ही केवळ राजकारण करत नाही, तर स्थानिक समस्यांवर रस्त्यावर उतरून लढत आहोत.”

यावेळी त्यांनी प्रभाग २८ मधील पाणी, रस्ते आणि स्वच्छतेच्या प्रश्नांवर भाष्य करत वंचितच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले.
वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य अरुंधती शिरसाठ यांनीही यावेळी उपस्थितांना संबोधित केले. त्या म्हणाल्या की, प्रस्थापित पक्षांनी गरीब व मध्यमवर्गीय वस्त्यांचा विकास थांबवला आहे. या जाहीर सभेत अरुंधती शिरसाठ यांनीही वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना मत करण्याचे आवाहन केले.

या जाहीर सभेला उस्मानपुरा परिसरातील नागरिक, महिला, तरुण आणि वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेमुळे राहुल नगर आणि कबीर नगर परिसरात उत्साहाचे वातावरण दिसून आले. महापालिका निवडणुकीच्या या प्रचार सभेने उस्मानपुऱ्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची चर्चा आता रंगू लागली आहे.






