प्रभाग क्र. ४ मधील उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत उमटला परिवर्तनाचा सूर
औरंगाबाद: महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराने आता वेग घेतला आहे. औरंगाबाद प्रचारासाठी वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या प्रा. अंजली आंबेडकर यांच्या उपस्थितीत जाहीर सभा उत्साहात संपन्न झाली.
शहरातील प्रभाग क्रमांक ४ मधील वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार वर्षा अभिनव जाधव, आशा गोकुळ भुजबळ आणि दादाराव लोखंडे यांच्या प्रचारार्थ या सभेचे आयोजन करण्यात आले होते.

सभेला संबोधित करताना प्रा. अंजली आंबेडकर यांनी औरंगाबाद शहराच्या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष वेधले. त्या म्हणाल्या की, “गेल्या अनेक वर्षांपासून औरंगाबादचा नागरिक रस्ते, पाणी आणि नागरी सुविधांसाठी संघर्ष करत आहे. शहराचा सर्वांगीण आणि स्थानिक विकास साधायचा असेल, तर महापालिकेत वंचित बहुजन आघाडीचे प्रतिनिधी असणे आवश्यक आहे. नागरी सोयी-सुविधांच्या पूर्ततेसाठी ‘वंचित’च्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा.”

वंचित-शोषितांच्या हक्काची लढाई
यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य अरुंधती शिरसाठ यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. वंचित बहुजन आघाडी हा समाजातील शेवटच्या घटकाचा आवाज असून, शोषितांच्या हक्कासाठी आणि शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठी नागरिकांनी एकजुटीने मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन त्यांनी केले.

प्रभाग क्र. ४ मध्ये झालेल्या या सभेला स्थानिक नागरिकांची, विशेषतः महिलांची मोठी उपस्थिती होती. “वंचित बहुजन आघाडीचा विजय असो”, “बाळासाहेब आंबेडकर यांचा विजय असो” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.






