गेल्या अनेक वर्षांपासून दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी अकोला क्रिकेट क्लब मैदानावर सोहळा होतो. या सोहळ्याचे मुख्य आकर्षण आणि मुख्य वक्ते असतात प्रकाश आंबेडकर. शिवसेनेत ‘शिवतीर्था’वरच्या दसरा मेळाव्याचं जे स्थान आहे, तेच प्रकाश आंबेडकरांच्या राजकीय प्रवासात या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचं स्थान आहे. प्रकाश आंबेडकरांच्या वर्षभरातल्या राजकीय वाटचालीची बीजं आणि मार्ग या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मेळाव्यातील भाषणावरून ठरवला जात असतो. या मेळाव्याचा इतिहास आणि प्रकाश आंबेडकरांची राजकीय भूमिका या ठिकाणी ठरते.
अनेक वर्षे अकोला जिल्ह्यात धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा अखंडपणे सुरु आहे. एकच नेता, विशाल मिरवणूक, प्रचंड प्रतिसाद,ओसंडून वाहणारा उत्साह, आखाडे, लेझीम पथके, आकर्षक देखावे, विविध झाक्या, हजारोचा स्वंयशिस्त समूह, कमालीचे आज्ञाधारी कार्यकर्ते, वर्षागणिक वाढत जाणारी गर्दी, भारतीय बौद्ध महासभेचे शिस्तबद्ध आयोजन आणि महाराष्ट्राला राजकीय सामाजिक दिशा देणारी जाहीर सभा असा दरवर्षीचा शिरस्ता…पूर्वीचा भारिप बहुजन महासंघ (आताची वंचित बहुजन आघाडी) आणि भारतीय बौद्ध महासभेच्या संयुक्त परिश्रमाने दरवर्षी आयोजन असते. ॲड. बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर ‘अकोला पॅटर्न’ गतिमान करण्यात ह्या ‘विशाल मिरवणूक व जाहीर सभांचा’ सिंहाचा वाटा राहिला आहे.
अकोला जिल्ह्याला भारावून टाकणारा एक प्रसंग घडला होता तो अगदी पहिल्याच सोहळ्यात. या सोहळ्यात मीराताई आंबेडकर ह्या भाषणासाठी उभ्या राहिल्या. त्यांनी यावेळी केलेल्या भावनिक भाषणानं सभेतील लोक पार हेलावून गेले होते. मीराताई म्हणाल्या होत्या की, “बाबासाहेबांनी आपल्या हयातीत जे काही कमवलं ते सर्व समाजाला देवून टाकलं, माझ्याकडे बाबासाहेबांनी कमाविलेल्या संपत्तीतलं काहीही नाही. परंतु, आज समाज आंबेडकर कुटुंबांकडे प्रचंड आशेने पाहतो आहे. माझ्याकडे बाबासाहेबांची संपत्ती नसली तरी माझ्याकडे बाबासाहेबांचा नातू आहे आणि तो मी आज समाजाच्या ओटीत टाकते आहे”…. ह्या वाक्याने सभा स्तब्ध झाली… मीराताईंच्या भाषणाने उपस्थित समूहाच्या काळजाचा वेध घेतला… जनतेच्या डोळ्यात अश्रू तरळले… अन टाळ्यांचा कडकडाटात बाळासाहेबांच्या नेतृत्वाचा स्वीकार केला गेला.आणि नेता, पक्ष, संघटना फिनिक्स पक्षाप्रमाणे झेपावली. पुढच्या काळात ’बहुजन सारे एक होवू, सत्ता आपल्या हाती घेऊ‘ हा नारा देत सत्ताबाह्य समूहाला सत्ताधारी होण्याचा राजमार्ग प्रशस्त करणा-या ‘बहुजन पॅटर्नने’ जन्म घेतला. पुढे हाच पॅटर्न महाराष्ट्रात ‘अकोला पॅटर्न’ नावाने ओळखला गेला.
प्रकाश आंबेडकर यांना समाजाच्या ओटीत टाकून मीराताई आंबेडकर यांनी बाबासाहेबांचा वसा आणि वैचारिक वारसा जपला आहे. देशभर फिरून तथागत गौतम बुद्ध यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार केला आहे. भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या कामाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. अशा या दूरदृष्टी असलेल्या माऊलीला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा..!