– अमरदीप शामराव वानखडे
भारताचे गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल सभागृहात केलेल्या वक्त्व्याचा संपुर्ण देशभरामध्ये प्रचंड विरोध झाला, आंदोलने झाली, न्यूज चॅनलवर चर्चा झाल्या, यानंतर भारतीय जनता पक्ष व आरएसएसचा आंबेडकरद्वेष संपुर्ण देशाने पाहिला. शहा यांनी याप्रकरणी माफी मागितली, त्यानंतर प्रकरण शांत झाले. हे झाले भारताच्या गृह मंत्र्यांचे. भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला बोलण्याचा, लिहिण्याचा आणि आपले विचार मांडण्याचा पूर्ण अधिकार दिला आहे. घटनाकारांनी त्यावेळी स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे या शब्दांत या स्वातंत्र्याचा अर्थ नमूद केला आहे. म्हणजे याचाच अर्थ आम्ही स्वैरपणे काहीही बोलावे असा होत नाही.
तसे केल्यास आपणास शिक्षा होण्याची तरतूद संविधानात नमूद आहे. कायदे म्हणजे सुसंस्कृत राष्ट्र निर्माण करण्यासाठी तयार करण्यात आलेली नियमावली व नैतिकता म्हणजे समाजाने घालून दिलेले व आपल्या सद्सद् विवेकबुद्धीमत्तेला मान्य व पटत असलेले नियम हे पहिल्यांदा आपण समजून घेतले पाहिजे. वंचित बहुजन आघाडी या राजकीय पक्षाने फुले-आंबेडकरी चळवळीला अपेक्षित असलेल्या समताधिष्ठित समाजव्यवस्थेची निर्मिती करू पाहणार्या राजकारणाचा पाया रचला आहे. अलिकडे आपली एक मानसिकता झालेली आहे की राजकीय पक्ष म्हणजे सत्ता मिळवणे. या मानसिकतेतुन बाहेर पडल्याशिवाय आपल्याला आंबेडकर समजून घेता येणार नाही.
सामाजिक परिवर्तन असे जेव्हा आम्ही म्हणतो तेव्हा त्याचा व्यापक अर्थ आम्हाला समजून घ्यावा लागेल. खासकरून बौद्ध समाजामध्ये अशी एक मानसिकता तयार झालेली आहे की, कुठेही अन्याय अत्याचाराची प्रकरणे झाली तर आंबेडकर उभे राहिले पाहिजे. परंतु जेव्हा मतदानाची वेळ येते तेव्हा हाच समूह नकली पुरोगामी विचारांचा बुरखा चढवलेल्यांना मतदान करतो व आम्ही लोकशाही आणि संविधान वाचविण्यासाठी मोठे काम केले असल्याचा आविर्भाव आणतो तेव्हा आमची नैतिकता ठिकाणावर आहे का, याचाही विचार करणे गरजेचे आहे. इथल्या असलेल्या लेखक, साहित्यिक आणि विचारवंतांनी फुले-आंबेडकरी चळवळीची मांडणी करतांना कायम बाळासाहेब आंबेडकर यांना उपेक्षित ठेवण्याचे काम केले आहे, नव्हे त्यांची ही कृती आंबेडकरद्वेषी असल्याचे माझे वैयक्तिक मत आहे.
ज्यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व इतर पक्ष यांनी वंचित ही भाजपाची बी टीम आहे असे आरोप केले होते, त्यावेळी स्वताला फुले-आंबेडकरवादी म्हणून मिरवणार्यांनी का भुमिका घेवून मांडणी केली नाही. काँग्रेस राष्ट्रवादीच्या स्टेजवर जावून फुले-आंबेडकरी चळवळीची मांडणी करण्यात धन्यता मानणार्या साहित्यिक विचारवंतांना मिळणारे मानधन व पॅकेज वंचित बहुजन आघाडी देवू शकत नाही म्हणुन किती दिवस तुम्ही स्वतची आणि समाजाची दिशाभूल करणार आहात. इथल्या साहित्यिक विचारवंतांना माझे आवाहन आहे की, आपण महाराष्ट्राला आंबेडकरवादी म्हणजे कोण, ते मोजण्याचे कोणते नियम आहेत आणि आपण आंबेडकरी साहित्यिक विचारवंत म्हणुन आजवर केलेली एकुण आंबेडकरी चळवळीसाठी केलेली कामगीरी यावर प्रकाश टाकावा. कोणतीही मांडणी हवेत होत नसते, त्याला इतिहासाची झालर असते.
केवळ गप्पा मारल्याने, श्वास न घेता बोलण्याने, ओरडुन ओरडुन घसा कोरडा केल्याने चळवळीचा इतिहास तुम्हाला पुसता येणार नाही. सर्वात आधी आपल्याला चळवळ समजून घ्यावी लागेल. काँग्रेस, राष्ट्रवादी मध्ये सामिल होवून बाबासाहेब आंबेडकरांची स्वाभीमानी चळवळ खरच बळकट करता येईल का. हा नैतिक प्रश्न खर्य अर्थाने आंबेडकरी राजकारणावर भाष्य करणार्यांनी स्वतला विचारावे व त्याचे उत्तर समाजाला द्यावे. प्रचंड त्याग आणि समर्पण देवून बाबासाहेबांनी उभ्या केलेल्या चळवळीला बाळासाहेब पुढे नेताहेत परंतु त्यांना याकामी हातभार लावणे तर सोडाच परंतु त्यांचे व त्यांच्यासोबत काम करणार्या कार्यकर्त्याचे खच्चीकरण कसे करता येईल, यासाठी आमच्यातील काहीची शक्ती आणि वेळ खर्च होतो आहे, ही अत्यंत खेदाची बाब आहे.
आमचा राजकीय इतिहास हा पराभवाचा आहे हे जसे आपण मान्य करतो तसे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांपासून ते बाळासाहेबांपर्यंत इथल्या प्रस्तापित पक्षांपेक्षा आपल्यातील काही गद्दार, हरीजनांनी आंबेडकरी राजकीय चळवळीचे वाटोळे केले हा इतिहास आम्ही केव्हा स्वीकारणार आहोत, केवळ बाळासाहेबांनी काँग्रेसबरोबर समझोता केला पाहिजे होता, असे एसीमध्ये बसून तत्वज्ञान पाजळणार्या अधिकारी व चळवळीच्या धुरंधरांना माझा प्रश्न आहे की आपले आंबेडकरी चळवळीच्या एकुण वाटचालीमध्ये आपले कोणते योगदान आहे. धम्मदीक्षेनंतर बौद्धांची एस्सीमध्ये नोंद करून त्यांना सवलती देणारे बाळासाहेब मला वाटते आजही आरक्षणाचा लाभ घेवून उच्च पदावर बसलेल्यांना अजूनही समजू शकले नाही.
बाबासाहेबांचा अपमान झाला म्हणुन संपुर्ण देशामध्ये गृहमंत्र्यांचा आम्ही निषेध केला, इथे रोजच बाबासाहेबांची विचारधारा पायदळी तुडवली जातेय तेव्हा आमच्यातील आंबेडकरी निळे रक्त आणि निळाभडक जयभीम कडक कुठे जातो, बाबासाहेब म्हणाले होते की, हा समतेचा रथ मी इथवर आणला आहे, शक्य झाले तर याला पुढे न्या पण मागे आणू नका, आम्ही काय केले, बाळासाहेबांना शह देण्यासाठी, ते संसदेमध्ये पोहचू नयेत यासाठी गल्ली बोळात राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष स्थापन करून त्यांच्याआधीच काँग्रेस, राष्ट्रवादीबरोबर बिनशर्त युती करायला सुरूवात केली. आपल्या या कृतीमुळे बाळासाहेबांना अत्यंत खेदाने माझ्या आधी तुम्ही तिथे जावून पोहचता, मग माझे काय काम आहे, असे खेदाने म्हणावे लागले आहे, याचाच अर्थ आम्हाला व्ही.पी. सिंगाबरोबर बाळासाहेबांनी केलेला समझोता आजही समजला नाही, असा होतो.
काहींचा मग प्रश्न असतो की, बाळासाहेबांचे समर्थन केले तर आंबेडकरवादी आणि विरोध केला तर हरीजन, हरीभाऊ, सतरंजी उचले ही वंचित बहुजन आघाडीची भूमिका आहे का, तर होय हीच वंचितची भूमिका आहे व राहील कारण समर्थन करणे हे ज्याच्या त्याच्या स्वातंत्र्याचा भाग असला तरी आपण चळवळीच्या दृष्टीने बाळासाहेबांकडे का पाहत नाहीत, हा मला कायम प्रश्न पडतो. काही लोक हे चळवळीचे ठेकेदार झालेले आहेत, तसे जर बाळासाहेब ठेकेदार होऊन बसले असते तर ते कायम सत्तेत बसले असते परंतु त्यांना समताधिष्ठित समाजव्यवस्थेच्या निर्मिती करावयाची आहे. समता ही बोलण्यातुन येणार नाही तर तुम्हाला ती कृतीतुन दाखवून द्यावी लागेल आणि नेमके तेच बाळासाहेब करताहेत.
ज्या भटक्यांच्या पालावर कधी सरकार पोहचू शकले नाही, जो कधी सत्तेत नव्हता व नाही ज्याला स्वातंत्र्यातही पारतंत्र्य जगावे लागत होते त्याला राजकीय पाठबळ बाळासाहेब आंबेडकरांनी दिले, पारलिंगी समूहाला सामाजिक व राजकीय मुख्य प्रवाहात आणले, बाळासाहेबांनी पारलिंगी समूहाच्या न्याय हक्काचा लढा बळकट करण्यासाठी, त्यांना मान-सन्मानाची वागणूक मिळावी यासाठी पहिल्यांदा एका राजकीय पक्षाच्या मुख्य कार्यकारिणीमध्ये समावेश करून घेतला, त्यानंतर अनेक पक्षांनी त्यांचे अनुकरण केले. सर्वांत महत्त्वाची घटना म्हणजे ईव्हीएम घोटाळा. काँग्रेसकडे आता ना जनाधार उरला आहे ना गांधीवादी विचारधारा.
कारण स्वातंत्र्यानंतरच्या सर्व भ्रष्ट्राचारामध्ये काँग्रेस अडकलेली असल्यामुळे त्यांना विरोधी पक्षासारखी मते मांडता येत नाहीत, विधाने करता येत नाही, भूमिका घेता येत नाही. कारण जर भूमिका घेतली तर ईडीची भीती त्यांना आहे. अशा परिस्थितीमध्ये बाळासाहेब आंबेडकर यांनी ज्या-ज्या भुमिका घेतल्या त्या-त्या भुमिका, मुद्दे काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना सारख्या पक्षांनी चोरले आहे. एवढेच नाही तर संविधान धोक्यात आहे हा बाळासाहेबांचा अजेंडासुद्धा काँग्रेसला चोरावा लागतो यापेक्षा काँग्रेसचे मोठे दुर्दव नाही, आणि मग आपले काही साहित्यिक/विचारवंत काही लोक आता काँग्रेस कसे संविधान वाचविणार यावर लेख लिहू लागले, भाषणे ठोकू लागले, अशा महाभागांना परभणी प्रकरण, सुप्रिया सुळे यांचे विधान, कश्मिर येथील घटना एवढेच नाही तर मतचोरी प्रकरणी काँग्रेस कोर्टात का जात नाही, याचेही उत्तर माहित नसेल तर तुम्ही स्वतची व समाजाची दिशाभूल करून आंबेडकरी राजकारण संपविण्याची सुपारी घेतली आहे का, की केवळ आंबेडकरद्वेषी मानसिकतेतुन हा विरोध होतो आहे, असा प्रश्न निर्माण होतो.
आपल्याला राजकीय हेतू साध्य करावयाचा असेल तर सांस्कृतिक चळवळ उभी करावी लागणार आहे. आपल्या प्रतिकांचे सामाजिकीकरण करता आले पाहिजे. आपल्या स्वातंत्र्यानंतरच्या 69 वर्षात जे आपल्याला जमले नाही, ते बाळासाहेब आंबेडकर यांनी करून दाखविले आहे. ते म्हणजे आपल्यामध्ये स्वाभीमान निर्माण केला, आम्ही लोकशाही मानणारे आहोत, आम्हाला निवडणुकांमध्ये सहभागी होण्याचा अधिकार आहे, उमेदवार उभे करण्याचा अधिकार आहे, तुम्ही आम्हाला 2 जागा देतो, 3 जागा देतो म्हणणारे कोण, तुमची इथल्या राजकारणावर मक्तेदारी आहे का, आम्ही या देशाचे मालक आहोत, तुम्हाला आमच्या शिवाय पर्याय नाही, आम्ही समझोता करायला तयार आहोत परंतु आम्हाला सन्मानजनक जागा द्या, एवढीच मागणी बाळासाहेबांची काँग्रेसकडे होती, काँग्रेसने काय केले हे आपणा सर्वांना माहिती आहे.
आणि मग सुरू झाली एकच कोल्हेकुई वंचित ही भाजपाची बी टीम आहे, अरे जा आम्हाला तुमची गरज नाही, फुले-आंबेडकरी चळवळ ही कुणाच्या असण्याने चालली नाही किंवा कुणाच्या नसल्याने थांबली नाही, लोकशाहीचे सामाजिकीकरण करण्याचा, समताधिष्ठित समाजव्यवस्थेचा जो वसा बाळासाहेबांनी घेतलेला आहे त्याला तुमच्या कपटी पाठींबा व स्वार्थी मदतीची गरज नाही, बाळासाहेब एकटेच निघालेत, बाबासाहेबांचा रथ स्वताच्या खांद्यावर घेवून आता आपल्याला ठरवावे लागेल की, बाळासाहेबांचे खांदेकरी व्हायचे आहे की, हा रथ पुढे नेण्यामध्ये अडथळा निर्माण करायचा आहे.
आता वंचित पक्ष हा एमआयएम बरोबर युतीमध्ये नसला तरी बॅ. ओवीसी यांचे एक वाक्य आजही मनाचा थरकाप उठवणारे आहे, क्या तुम इनके मरनें के बाद पछताओगे, अशी आपली गत होवू नये. आंबेडकरी चळवळ ही एकजातीय चळवळ नाही, हे जेव्हा आम्हाला समजेल तेव्हा आम्हाला बाळासाहेब समजायला वेळ लागणार नाही. तेव्हाच बाळासाहेबांनी पंढरपुर मंदीराचे आंदोलन का केले, हेही समजेल. दि. 4 फेब्रुवारी 1956 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जनता या पाक्षिकाचे नामांतर करून प्रबुद्घ भारत हे पाक्षिक नव्याने सुरू केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वानंतर भय्यासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात नुकताच बौद्ध धम्मा स्विकारलेल्या जनतेला ज्या पद्धतीने धम्माविषयी जागृत करण्याचे काम भारतीय बौद्ध महासभेने केले त्याचपद्धतीने जनतेला सामाजिक, राजकीय, आर्थिक व शैक्षणिकदृष्ट्या डोळस करण्याचे काम प्रबुद्ध भारत पाक्षिकाने केले आहे. आणि स्वातंत्र्याच्या 69 वर्षानंतरही बाळासाहेबांना तेच काम करावे लागणार असेल तर आम्ही आमची समिक्षा करणार आहोत की नाही, या प्रश्नाचे उत्तर प्रत्येकाने स्वता मध्ये शोधण्याची गरज आहे. तेव्हाच आम्ही बाबासाहेबांना अभिप्रेत असलेली समताधिष्ठित समाज व्यवस्था, लोकशाहीचे सामाजिकीकरण निर्माण करू शकू.
औरंगाबाद मो.नं. 9595892542 (लेखक ‘प्रबुद्ध भारत मधील प्रकाश आंबेडकर यांची पत्रकारिता’ या विषयावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथे पीएच.डी संशोधक विद्यार्थी आहेत.)