अकोला : अकोला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या प्रभाग रचनेबाबत वंचित बहुजन आघाडीने घेतलेल्या आक्षेपांवर आणि हरकतींवर अमरावती येथे विभागीय आयुक्तांसमोर सुनावणी घेण्यात आली. विभागीय आयुक्त श्वेता सिंगल यांनी या हरकतींवर ११ ऑगस्ट रोजी निर्णय देणार असल्याचे सांगितले असून, १८ ऑगस्टला अंतिम प्रभाग रचना जाहीर केली जाणार आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी अकोला, पातुर, बाळापूर, तेल्हारा आणि अकोट येथील प्रभाग रचनेवर विविध आक्षेप घेतले आहेत. ही प्रभाग रचना राजकीय दबावाखाली तयार करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्याचबरोबर, अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) यांची लोकसंख्या हेतुपुरस्सर कमी दाखवल्यामुळे आरक्षणावर थेट परिणाम होणार असल्याचा मुद्दाही त्यांनी मांडला.
या सुनावणीदरम्यान वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे उपस्थित होते. ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. संतोष रहाटे आणि ॲड. सुबोध डोंगरे यांनी विभागीय आयुक्तांसमोर हरकतींची बाजू मांडली. या हरकती घेणाऱ्यांमध्ये माजी जि.प. उपाध्यक्ष सुनील फाटकर, तालुकाध्यक्ष अशोक दारोकार, माजी पं.स. सभापती सुनिता टप्पे,
माजी जि.प. सदस्य विनोद देशमुख, गोपाल कोल्हे, महिला आघाडी तालुकाध्यक्ष अर्चना डाबेराव,माजी उपसभापती किशोर मुंदडा, उपसभापती इम्रान खान, अर्जुन टप्पे, प्रदीप पळसपगार, विष्णू डाबेराव, पंकज दामोदर, संजय किर्तक आणि दिनेश धांडे यांचा समावेश होता. विभागीय आयुक्त त्यांच्याकडे आलेल्या योग्य हरकती आणि आक्षेपांवर ११ ऑगस्ट रोजी निर्णय देतील, त्यानंतर १८ ऑगस्ट रोजी अंतिम प्रभाग रचना यादी प्रसिद्ध केली जाईल.