अकोला : आगामी अकोला महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी (VBA) यांच्यात युती होणार असल्याच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. काँग्रेसकडून कोणताही सकारात्मक प्रस्ताव न आल्याने अखेर वंचित बहुजन आघाडीने स्वबळावर लढण्याचा पवित्रा घेत आपल्या पाच उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.
आज अकोल्यातील यशवंत भवन येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठी घोषणा वंचित बहुजन आघाडीकडून करण्यात आले. १५ जानेवारी २०२५ रोजी मतदान आणि १६ जानेवारी रोजी मतमोजणी होणार असल्याने वंचितने प्रचारात आघाडी घेण्यासाठी ही पावले उचलली आहेत.
घोषित उमेदवारांची यादी :
वंचितने आपल्या पहिल्या यादीत सामाजिक समीकरणे साधत प्रामुख्याने प्रभाग क्र. ७ आणि ९ मधील उमेदवारांची घोषणा केली आहे:
प्रभाग ७ (अ): किरण डोंगरे
प्रभाग ७ (ड): महेंद्र देविदास डोंगरे
प्रभाग ९ (अ): चंदू दादा शिरसाट
प्रभाग ९ (ब): नाज परवीन शेख वसीम
प्रभाग ९ (क): शामिम परवीन कलीम खान पठाण
उमेदवारांचे मुख्य संकल्प:
उमेदवारी जाहीर होताच सर्व उमेदवारांनी आपापल्या प्रभागातील समस्या सोडवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
चंदू दादा शिरसाट: प्रभागातील नाल्यांची दुरवस्था आणि रस्त्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावणे हे त्यांचे प्राथमिक ध्येय आहे.
महेंद्र डोंगरे: “बाळासाहेब आंबेडकरांनी दिलेला विश्वास सार्थ ठरवू. प्रभागातील रखडलेला विकास पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
शिक्षण व्यवस्थेवर भर : प्रभाग ९ मधील उमेदवाराने स्वतः शिक्षण घेतलेल्या महानगरपालिकेच्या शाळेची दुरवस्था पाहून, निवडून आल्यावर शाळांचा कायापालट करण्याचे आश्वासन दिले आहे.
राजकीय चुरस वाढली –
अकोल्यात तिरंगी किंवा चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात वंचितने तगडी टीम उतरवल्याने ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार आहे. उमेदवारांनी आजपासूनच जनसंपर्क वाढवण्यावर भर दिला असून, “वंचितची टीम हीच सर्वात तगडी टीम आहे,” असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.






