अकोला : भारतीय बौद्ध महासभा, तीक्ष्णगत मल्टीपर्पज वेल्फेअर सोसायटी आणि विस्डम अकॅडमी, अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच एका भव्य रोजगार व करिअर मार्गदर्शन मेळाव्याचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या मेळाव्याचा मुख्य उद्देश तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, त्यांच्यात रोजगारक्षमतेचा विकास करणे तसेच सुशिक्षित व कौशल्यसंपन्न युवकांना योग्य मार्गदर्शन व संधी प्रदान करणे हा होता.
या महत्त्वपूर्ण मेळाव्याचे उद्घाटन वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर यांच्या हस्ते संपन्न झाले.
आजच्या स्पर्धात्मक युगात सुशिक्षित व प्रशिक्षित तरुणांना नोकरीच्या संधी सहज उपलब्ध व्हाव्यात, त्यांना योग्य करिअर निवडीसाठी मार्गदर्शन मिळावे आणि त्यांच्या अंगभूत कौशल्यांचा विकास व्हावा, या उद्देशाने हा मेळावा आयोजित करण्यात आला होता.
या मेळाव्यात विविध कंपन्यांचे प्रतिनिधी आणि करिअर तज्ज्ञ सहभागी झाले होते. तसेच या मेळाव्यामुळे अकोला परिसरातील हजारो तरुण-तरुणींना एकाच छताखाली रोजगार आणि करिअर संबंधित महत्त्वपूर्ण माहिती व संधी प्राप्त झाल्या. आयोजकांनी यशस्वीरित्या तरुणांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक उपयुक्त मंच उपलब्ध करून दिला.