अहमदनगर : कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केलेल्या नेवासा तालुक्यातील वडगाव येथील शेतकरी कुटुंबाला तातडीने मदत द्यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे. या संदर्भात वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.
या निवेदनात, आत्महत्याग्रस्त शेतकरी बाबासाहेब सुभाष सरोदे यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले आणि आई-वडील असा परिवार आहे. त्यांची मुलगी किरण सरोदे ही बीएससी ॲग्रीचे शिक्षण घेत असून, तिचा शैक्षणिक खर्च सरकारने उचलावा, अशीही मागणी करण्यात आली आहे.
तसेच, सरोदे यांच्या पत्नी अर्चना बाबासाहेब सरोदे यांचे शिक्षण एमएससी, डीएड झालेले असल्याने त्यांना कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी शासकीय सेवेत रुजू करून घेण्याची मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.
या भेटीदरम्यान, शासकीय जागेवरील अतिक्रमण नियमाकुल करण्यासंदर्भात १ ऑगस्ट २०२५ रोजी जाहीर झालेल्या शासन निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणीही वंचित बहुजन आघाडीने केली.
सर्वांसाठी घरे प्रधानमंत्री आवास योजनाअंतर्गत, वापरात नसलेले रस्ते किंवा इतर सार्वजनिक जागांवरची अतिक्रमणे नियमानुसार नियमित करावीत, असे या निवेदनात म्हटले आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्य महासचिव प्रा. किसन चव्हाण, जिल्हाध्यक्ष योगेश साठे, युवा शहर अध्यक्ष ॲड. योगेश गुंजाळ यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.