दोषी अधिका-यावर कारवाई करण्याचे लेखी आश्वासन
मुंबई:वंचित बहुजन आघाडीचे कुर्ला मुंबई येथील संपर्क कार्यालय BMC च्या एल वाॅर्डने विनानोटीस पाडले होते.अंगणवाडीचा वर्ग सुरू असताना बीएमसीने कारवाई केल्याने लहान मुले जखमी झाली होती. या प्रकाराचा निषेध करण्यासाठी बुधवारी एल विभागातील कार्यालयावर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. वंचितच्या आंदोलनानंतर बीएमसी प्रशासन नरमले असून, संबंधित जबाबदार अधिका-यावर कारवाई करण्याचे आश्वासन बीएमसीने दिले असून, या भागात पाहणी करण्यात येईल, असे म्हटले आहे.
मुंबई प्रदेश अध्यक्ष अबुल हसन खान यांच्या नेतृत्वाखाली हा जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या वेळी शिष्टमंडळाने सहाय्यक आयुक्तांशी चर्चा केली. चर्चेमध्ये संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे लेखी पत्र प्रशासनाने दिले आहे. वंचितचे कार्यालय पाडण्याआधी नोटीस का पाठवली नाही, असा सवाल संबंधित अधिकाऱ्याला विचारला. मात्र, अधिकाऱ्यांना उत्तरे देता आली नाहीत. ही कारवाई नियमाला धरुन झाली नसल्याचे शिष्टमंडळाने सांगितल्यानंतर प्रशासनाने नमती भूमिका घेतली. संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करुन प्रश्न तातडीने सोडवला जाईल, असे आश्वासन प्रशासनाने दिले.
या वेळी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी संबंधित अधिकाऱ्याची वागणूक आणि तो स्थानिक आमदाराच्या मागे -पुढे करुन वंचितांना त्रास देतो, असे सांगून त्याची पोलखोल केली. तसेच, ज्या आमदाराच्या वरदहस्तामुळे फक्त वंचितचे कार्यालय पाडले गेले, ते पुराव्यासहीत दाखवून दिले. हे फक्त कार्यालय किंवा अंगणवाडी नसून, आमचं रक्त आटवून, पैसे टाकून बांधलेलं घर असल्याची भावना तालुकाध्यक्ष स्वप्निल दरेकर यांनी व्यक्त केली. तसेच, संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करण्याची मागणी करून जाणीवपूर्वक कुणी त्रास देण्याचा प्रयत्न केला, तर अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशानुसार तीव्र निदर्शने करण्यात येतील, असा इशाराही त्यांनी दिला. लेखी आश्वासनानंतर शिष्टमंडळाने बाहेर आल्यावर एल विभागाच्या प्रवेशद्वारावर सभा घेऊन आंदोलन स्थगित केले.
या शिष्टमंडळात मुंबई अध्यक्ष अबुल हसन खान ,सुनिता गायकवाड, जिल्हा अध्यक्ष संतोष अबुलगे, कुर्ला तालुका अध्यक्ष स्वप्नील जवळगेकर, योगेश निकम ,दत्ता निकम, संध्या पगारे यांचा समावेश होता.