देश मनुस्मृतीने नाही, तर बाबासाहेबांच्या संविधानाने चालेल!
मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर तीव्र शब्दांत निशाणा साधत तीन थेट प्रश्न विचारले आहेत.
आरएसएसची भूमिका, संविधानविरोधी विचारसरणी आणि राष्ट्रीय ध्वजाबाबतचा इतिहास या विषयांवर त्यांनी भागवत यांना सार्वजनिक उत्तर देण्याचे आव्हान दिले आहे.
अॅड. आंबेडकर म्हणाले की, “मोहन भागवत, इकड-तिकडच्या गप्पा करणे थांबवा! धाडस असेल तर माझ्या तीन प्रश्नांची उत्तरे द्या.”
१. आरएसएस ही नोंदणीकृत संघटना आहे का?
२. आरएसएसने भारतीय ध्वज स्वीकारला नाही हे खरे नाही का?
३. गोळवलकर आणि सावरकर यांनी बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान नाकारले नाही का?
आंबेडकर पुढे म्हणाले, “वंचित बहुजन आघाडी आणि तिचे सर्व कार्यकर्ते आता आरएसएस आणि मनुवादी शक्तींना तोंड देण्यासाठी एकत्र आले आहेत. तुम्ही आणि तुमच्या हाफ चड्डीच्या टोळीने हे लक्षात ठेवावे की, हा देश मनुस्मृतीने नाही, तर बाबासाहेबांनी दिलेल्या भारतीय संविधानाने चालेल.”
वंचित बहुजन आघाडीने नुकताच आरएसएसच्या औरंगाबाद येथील कार्यलयावर मोर्चा काढला होता.
मोहन भागवत यांनी माध्यमांशी बोलतांना म्हटले होते की, संघाची स्थापना १९२५ मध्ये ब्रिटिश काळात झाली होती, आम्ही ब्रिटिशांकडे कशी नोंदणी करणार? असा उलटा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. या विधानामुळे पुन्हा एकदा आरएसएस विरुद्ध संविधानवादी विचारसरणीचा संघर्ष चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.






