पुणे : पुण्यातील वाडिया कॉलेज परिसरात (ABVP) अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसह आणि आंबेडकरवादी विचारधारेच्या विद्यार्थी संघटनेवर बहिष्कार टाकणारी पोस्टर्स लावल्याने वादंग निर्माण झाला आहे. या मनुवादी आणि भेदभावपूर्ण कृत्याचा वंचित बहुजन युवा आघाडी, पुणे शहर तर्फे तीव्र निषेध करण्यात आला आहे.
या प्रकरणी वंचित बहुजन युवा आघाडीचे अध्यक्ष सागर नामदेव आल्हाट यांनी म्हटले आहे की, “RSS-BJP प्रणीत ABVP या मनुवादी विकृत मानसिकतेच्या संघटनेच्या विकृत प्रवृत्तीचा पर्दाफाश झाला आहे. अशा विचारसरणीच्या मनोरुग्णांचे कान आता हाणण्याची वेळ आली आहे.”
या घटनेविरोधात वंचित बहुजन युवा आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन येथे जाऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना भेटून लेखी तक्रार अर्ज दिला आणि संबंधितांवर कायदेशीर कारवाई करून गुन्हा नोंदविण्याची मागणी केली.
यावेळी सागर नामदेव आल्हाट, अध्यक्ष, वंचित बहुजन युवा आघाडी, पुणे शहर, विपुल सोनवणे, शिवा ढावरे, किशोरी रिकीबे, आकाश कासले, अमर मेगडंबर, चंद्रकांत कांबळे आदी उपस्थित होते.
वंचित बहुजन युवा आघाडीने स्पष्ट केले की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर, त्यांच्या प्रतिमेवर किंवा आंबेडकरवादी संघटनांवर कुणीही अशा प्रकारे बहिष्कार टाकू शकत नाही. हे लोकशाहीविरोधी कृत्य असून, आम्ही अशा मनुवादी प्रवृत्तीविरोधात रस्त्यावर उतरू.”