काँग्रेस व अकाली दलाने गैरहजर राहणे पसंत केले.
चंदीगड : येथील महानगरपालिकेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष भाजपला धक्का देत सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून आला. आप ला एकूण १४ जागा मिळाल्या, तर भाजप २१ वरून १२ वर घसरला. काँग्रेस पक्षाला ८ आणी अकाली दलाला १ जागा मिळाली.
सर्वात मोठा पक्ष असल्यामुळे ‘आप’ला महापौर बनवण्याची अपेक्षा होती. परंतु, काँग्रेसच्या एका नागरसेविकेने भाजपसोबत हातमिळवणी केली, तर इतर सात गैरहजर राहिले. चंदीगडच्या खासदारांनाही एक मत असल्याने खासदार किरण खेर यांचेही एक मत भाजपला मिळाले. अशाप्रकारे १४ मतं भाजपला मिळाली, तर ‘आप’चे १४ पैकी एक मत बाद ठरवण्यात आले.
या सगळ्या प्रकारानंतर ‘आप’च्या नगरसेवकांनी संतप्त होत काही काळ गोंधळ घातला. भाजप व आप चे नगरसेवक आमने सामने आले. यामुळे चंदीगड पोलिसांना बोलावण्यात आले.
“काँग्रेसला मत म्हणजे भाजपला मत”
काँग्रेसला मत म्हणजे भाजपला मत हे पुन्हा एकदा सिद्ध झाले, असा आरोप आप कडून करण्यात आला. विधानसभा निवडणुकांआधी हा जनतेला इशारा असल्याचे आप कडून सांगण्यात आले. भाजपला हरवण्यापेक्षा काँग्रेसने गैरहजर राहणे पसंत केल्याने त्यांच्यावर भाजपला मदत केल्याचा आरोप होत आहे.