विविध जाती धर्माच्या पोस्टर्सने वेधले अनेकांचे लक्ष
पुणे : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पुण्यातील एसएसपीएमएस मैदानावर आयोजित सत्ता परिवर्तन महासभेला पुणे आणि परिसरातून लाखोंचा जनसागर उसळला आहे. या महासभेला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर मार्गदर्शन करणार असल्याने मैदानावर नागरिकांची तुफान गर्दी झाली आहे. सभेसाठी विविध जाती धर्माचे लोक मोठ्या संख्येने उपस्थित असून, त्यांच्या हातातील विविध पोस्टर्सने अनेकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
नागरिकांच्या हातातील पोस्टरवर मी गरीब मराठा, ओबीसी, मी ख्रिश्चन, मी माळी, मी मुस्लीम, मी धनगर, मी मतदार, मी विद्यार्थी, मी शेतकरी, मी हिंदू, मी आदिवासी, मी वंजारी आणि मी कुणबी असा मजकूर दिसून आला. तसेच, प्रकाश आंबेडकर यांचं नाव असलेले पोस्टरही झळकले त्यावर भटक्या विमुक्तांना पहिल्यांदा उमेदवारी देणारे बाळासाहेब, झुकेगा नही सर साथ है अम्बेडकर, मंडलाचा लढा देणारे बाळासाहेब, ओबीसींच्या लढ्याची सुरुवात करणारे बाळासाहेब आंबेडकर असा मजकूर दिसून आला.
याशिवाय पोस्टर्सवर समाजातील लोकांनी आपापल्या समस्या मांडल्या होत्या. यामुळे प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत विविध जाती धर्मातील सर्वसामान्य जनता मोठ्या प्रमाणात असल्याचेही पाहायला मिळत आहे.