आंबेडकरच आमचे भाग्यविधाते : वाढदिवसाला जमलले पैसे दिले वंचितला
अकोला : राजकारणात खोक्यांची आणि पेट्यांची संस्कृती वाढत असताना अजूनही काही मोजके लोक सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी राबणाऱ्या कष्टकरी माणसांच्या पाठबळावर आजही राजकारणात खंबीरपणे आणि स्वाभिमानाने विकासाचे राजकारण करीत आहेत. त्यात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे नाव आघाडीवर आहे. याचाच प्रत्यय आज अकोला जिल्ह्यातील टाकळी येथे आला. अल्पभूधारक मराठा कुटुंबातील चिमुकल्या मुलीने तिच्या वाढदिवसाला जमलेल्या पैशांची भेट बाळासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या लढ्यात उपयोगी यावी म्हणून दिली आहे. विश्वासघातकी काळात हा प्रसंग वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवणारा आहे. प्रत्येकजण समाजाच्या जडणघडणीत आपलं योगदान देत असतो. पण, त्यासाठी त्याला आयुष्याची काही वर्षे खर्ची घालावी लागतात. तेव्हाच त्याला या गोष्टी सुचतात. मात्र, एका चिमुकलीला एवढ्या कमी वयात ही गोष्ट सुचणं कौतुकास्पद असल्याची चर्चा असून सर्वच स्तरातून तिचे कौतुक होत आहे.
अकोला जिल्ह्यातील टाकळी निम येथे राहणाऱ्या वैभव सदाशिव रसाळ आणि त्यांची पत्नी आरती रसाळ यांची मुलगी सईच्या वाढदिवसाचे निमित्त होते. या प्रसंगी सईने वाढदिवसाला जमलेले पैसे यशवंत भवन येथील कार्यक्रमात भेट म्हणून प्रकाश आंबेडकर यांच्याकडे दिले. या प्रसंगाने उपस्थित भारावून गेले. या वेळी रसाळ दाम्पत्य म्हणाले की, प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आरक्षणाला सर्वांत आधी पाठिंबा दिला. एवढंच नाहीतर सध्याच्या परिस्थितीत वंचित मराठ्यांना न्याय मिळवून देण्याची धमक फक्त प्रकाश आंबेडकर यांच्यामध्येच आहे. तसेच, गरीब मराठा समाजाच्या मुलांच्या भविष्यासाठी मराठ्यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या पाठीशी ताकदीने उभे राहून मराठा समाजाचा लढा मजबूत करण्यासाठी त्यांनाच मत दिले पाहिजे, असे आवाहनही रसाळ यांनी मराठा बांधवांना केले आहे.
सध्या सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्राचं राजकीय वातावरण गढूळ केलं असून मराठा समाजाला आरक्षणाच्या मुद्द्यावर अधांतरी सोडलं आहे. पण, प्रकाश आंबेडकर मराठ्यांची लढाई मोठ्या ताकदीने लढत असून, माझ्या मुलीचे भविष्यही तेच सुरक्षित करु शकतात, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. त्यामुळे येत्या काळात टिकावू मराठा आरक्षण मिळवण्यासाठी आजची खरी जबाबदारी ओळखून येणाऱ्या निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांनाच जनता निवडून देईल अशी भावना रसाळ यांनी व्यक्त केली.
आंबेडकरांनी स्वीकारली चिमुकलीची भेट –
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सईने दिलेली भेट स्वीकारली. मात्र, यावेळी त्यांनी निश्चय केला की, जोपर्यंत निवडणुकीत विजयी होणार नाही. तोपर्यंत या चिमुकलीच्या भेटीला हात लावणार नाही. त्यामुळे सईने वाढदिवसाला जमलेले पैसे मातीच्या गल्ल्यासह दिलेली भेट वंचितच्या कार्यालयात ठेवून दिली आहे.