giorgio armani : जगप्रसिद्ध फॅशन ब्रँड अरमानीचे संस्थापक जॉर्जिओ अरमानी यांचे गुरुवारी (4 सप्टेंबर) वयाच्या 91 व्या वर्षी निधन झाले. आलिशान जीवनशैली आणि श्रीमंतीचे प्रतीक मानला जाणारा त्यांचा फॅशन ब्रँड जगभर लोकप्रिय आहे. अरमानी यांच्या जाण्याने फॅशन उद्योगात शोककळा पसरली आहे. त्यांनी साकारलेले डिझाईन्स आजही फॅशन रसिकांसाठी प्रेरणादायी ठरतात.
अरमानी यांनी वैद्यकीय शिक्षण अर्धवट सोडून सैन्यात थोडा काळ सेवा बजावली. त्यानंतर त्यांनी विंडो ड्रेसर म्हणून नोकरी केली आणि नंतर निनो सेरुटी यांच्यासाठी कपडे डिझाईन केले. शेवटी 1970 च्या दशकात सहकारी सर्जियो गॅलोटी यांच्या मदतीने त्यांनी स्वतःचा ब्रँड सुरू केला.
1980 मध्ये गिगोला या हॉलिवूड चित्रपटासाठी रिचर्ड गियरची वॉर्डरोब डिझाईन करण्याची संधी मिळाली आणि त्यानंतर अरमानी यांची लोकप्रियता प्रचंड वाढली. फॅशन डिझाईनपासून सुरुवात करून त्यांनी परफ्यूम, मेकअप, स्पोर्ट्सवेअर, इंटिरियर डिझाईन, रिअल इस्टेट, रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्स अशा अनेक क्षेत्रांत पाऊल टाकले.
त्यांनी अरमानीऑलिम्पिया मिलानो हा बास्केटबॉल क्लब विकत घेतला होता, तसेच इटलीच्या ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक संघांसाठी जर्सीही डिझाईन केल्या. फोर्ब्सनुसार, अरमानी यांची संपत्ती 12.1 अब्ज डॉलर्स म्हणजेच जवळपास 10 लाख कोटी रुपये होती.