मुंबई : वंचित बहुजन आघाडी, मुंबई प्रदेशतर्फे १३ ऑगस्ट २०२५ रोजी एसआरए प्राधिकरण, मुंबई येथे रखडलेल्या प्रकल्पांविरोधात भव्य जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी एसआरए आयुक्तांनी लवकरच यासंदर्भात भेटून तोडगा काढण्याची विनंती केली होती. त्यानुसार आज एसआरए अधिकारी मिटकर आणि वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाची बैठक पार पडली.
बैठकीत आघाडीने मुंबईतील रखडलेल्या तब्बल ४७ प्रकल्पांची यादी सादर केली. अनेक ठिकाणी विविध कारणांमुळे काम ठप्प असल्याचे निदर्शनास आणून देत प्रलंबित प्रकल्प तात्काळ मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली.
यावर एसआरए अधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेतली असून पुढील आठवड्यात एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आणि वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाची स्वतंत्र बैठक घेण्यात येणार असल्याचे आश्वासन देण्यात आले.
या बैठकीस वंचित बहुजन आघाडी मुंबई प्रदेशाध्यक्ष चेतन अहिरे, महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा स्नेहल सोहनी, युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष सागर गवई, तसेच सतीश राजगुरू, विश्वास सरदार आणि संतोष अंबुलगे उपस्थित होते.