ठाणे : उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, ठाणे महानगरपालिकेने शहरातील ना विकास आणि हरित क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांचे सर्वेक्षण पूर्ण केले आहे. या सर्वेक्षणानुसार, शहरात एकूण ७३७२ बेकायदा बांधकामे आढळून आली आहेत. यापैकी सर्वाधिक बांधकामे कळवा आणि दिवा परिसरात आहेत, तर वागळे इस्टेट आणि लोकमान्यनगरमध्ये एकही अनधिकृत बांधकाम आढळले नाही, अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली.
उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सर्वेक्षण
शीळ येथील २१ बेकायदा इमारतींच्या प्रकरणात दाखल झालेल्या याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने ठाणे महापालिकेला ना विकास आणि हरित क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांचे सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. या आदेशानंतर महापालिकेच्या शहर विकास विभागाने १४ अधिकाऱ्यांचे एक विशेष पथक स्थापन केले. या पथकाने केलेल्या सर्वेक्षणानुसार शहरात ७३७२ बेकायदा बांधकामे असल्याचं समोर आलं आहे. ही बांधकामे ३० ते ४० वर्षांपूर्वीची किंवा १० ते २० वर्षांपूर्वीची असू शकतात, आणि यात हजारो कुटुंबे राहत आहेत.
विभागानुसार बांधकामांची स्थिती
• कळवा : येथे सर्वाधिक म्हणजेच ४,३६५ अनधिकृत बांधकामे आहेत.
• दिवा : येथे १,८२८ बांधकामे आहेत.
• वागळे इस्टेट आणि लोकमान्यनगर: या भागात एकही अनधिकृत बांधकाम आढळलेले नाही.
महापालिकेनेची कारवाईची तयारी
महापालिकेने आतापर्यंत केलेल्या सर्वेक्षणात ९०९ बेकायदा बांधकामे आढळून आली आहेत, त्यापैकी २२७ बांधकामे पाडण्यात आली आहेत. उर्वरित ६८२ बांधकामांवर गणेशोत्सवानंतर कारवाई केली जाईल. सण-उत्सवामुळे पोलीस यंत्रणा व्यस्त असल्याने ही कारवाई पुढे ढकलण्यात आली आहे.
या बांधकामांवर कारवाई करण्यापूर्वी, त्यांचा वीज आणि पाणीपुरवठा खंडित करण्याची तसेच नोटीस देण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. दिवा आणि मुंब्रा येथील अनधिकृत बांधकामांना रोखण्यासाठी महापालिकेने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे एक विशेष पथकही तयार केले आहे. गणेशोत्सवाच्या काळात रहिवासी बांधकामांवर कारवाई होणार नाही, मात्र व्यावसायिक आणि नवीन बांधकाम सुरू असलेल्या अनधिकृत इमारतींवर कारवाई सुरूच राहील, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे.