कल्याण : स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने एक अनोखे आंदोलन केले. वालधुनी परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील खड्डेमय रस्त्यांमध्ये झाडे लावून महापालिकेचा निषेध नोंदवण्यात आला. अनेक दिवसांपासून खड्ड्यांच्या समस्येकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला.
गेल्या अनेक दिवसांपासून वालधुनी येथील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. या संदर्भात वंचित बहुजन आघाडीने वारंवार पत्रव्यवहार आणि पाठपुरावा करूनही परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही. याचा निषेध म्हणून, १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिन साजरा करताना आघाडीच्या कार्यकर्त्यांनी खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण केले.
या आंदोलनातून महानगरपालिका आयुक्त, शहर अभियंता, बांधकाम विभाग, स्थानिक खासदार आणि आमदारांचा जाहीर निषेध नोंदवण्यात आला. यावेळी बोलताना कार्यकर्त्यांनी प्रशासनाच्या उदासीनतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली.
या अनोख्या स्वातंत्र्यदिन आंदोलनावेळी कल्याण-डोंबिवली महानगर सचिव नितीन वानखेडे, प्रमोद खरे, संघटक अमोल पंडित, हिरामण निकम, सम्यक विद्यार्थी आंदोलन महाराष्ट्र मिडिया प्रमुख रोहित डोळस, पुष्पा डोळस, अस्लम खान, अरुण दोंदे, किशोर म्हस्के आणि स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.