मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नातवाने, डॉ. भीमराव यशवंत आंबेडकर यांनी नुकतीच त्यांच्या आजोबांच्या शाळेला, म्हणजेच मुंबईतील एल्फिन्स्टन हायस्कूलला भेट दिली. 2 जुलै 2025 रोजी ही भेट झाली. 1907 साली याच शाळेतून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मॅट्रिकची परीक्षा पास केली होती, ज्यामुळे त्यांच्या ज्ञानाच्या आणि सामाजिक क्रांतीच्या प्रवासाची सुरुवात झाली.
या भेटीचे आयोजन शाळेच्या 1970च्या माजी विद्यार्थ्यांच्या विनंतीवरून करण्यात आले होते. या भेटीदरम्यान, डॉ. भीमराव आंबेडकर यांनी त्या ठिकाणी उभे राहून बाबासाहेबांच्या महान इतिहासाला उजाळा दिला.
शाळेत ‘संविधान मंदिर’ नावाचे एक विशेष स्थान तयार करण्यात आले आहे. येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो लावण्यात आले आहेत आणि संविधानाची प्रास्ताविका (Preamble) प्रदर्शित करण्यात आली आहे.
डॉ. भीमराव आंबेडकर यांनी शाळेच्या प्रशासनाला अशी सूचना केली की, शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारावर दर्शनी भागात एक फलक लावून ‘या शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिकले होते’ हे स्पष्टपणे नमूद करावे. यामुळे नवीन पिढीला प्रेरणा मिळेल.