मुंबई : 2024 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सायंकाळी 6 नंतर ’76 लाख गूढ मते’ (mysterious votes) वाढली आहेत. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आपल्यासोबत यावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसला केले आहे. ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेचे कौतुक केले. पण त्याचवेळी काँग्रेसने वंचितसोबत या ‘मत’ प्रकरणावर एकत्र काम केले असते, तर निवडणुकीतील अनियमितता खूप आधीच समोर आली असती, असेही म्हटले आहे.
ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, मी काल तुमची (राहुल गांधी) पत्रकार परिषद पाहिली आणि तुम्ही चांगले काम केले. पण, जर तुम्ही आणि तुमच्या काँग्रेस पक्षाने, माझ्यासोबत आणि वंचित बहुजन आघाडीसोबत, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सायंकाळी 6 नंतर पडलेल्या 76 लाख रहस्यमय मतांच्या अनोख्या प्रकरणाचा पर्दाफाश करण्यासाठी एकत्र काम केले असते, तर निवडणुकीतील अनियमितता खूप आधीच उघड झाली असती. आणि कदाचित, भविष्यातील कोणत्याही निवडणुकीत, बिहारमधील आगामी निवडणुकांसहित, असे काही घडण्याची शक्यताच राहिली नसती.
याच ट्विटमध्ये त्यांनी काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीने दाखल केलेल्या याचिकेत एक पक्ष म्हणून सहभागी होण्याची आशा व्यक्त केली आहे. वंचित बहुजन आघाडीचे मुंबई अध्यक्ष चेतन अहिरे यांनी निवडणूक आयोगाविरुद्ध दाखल केलेल्या रिट याचिकेत काँग्रेसने एक पक्ष म्हणून तरी सहभागी व्हावे, असे म्हटले आहे. ही याचिका महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील कथित गैरप्रकारांशी संबंधित आहे. त्यामुळे या प्रकरणात काँग्रेसने सहभाग घेतल्यास, त्याची व्याप्ती वाढू शकते आणि या प्रकरणाला अधिक महत्त्व मिळू शकते, असे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.