प्रयागराज : प्रयागराजमध्ये गंगा आणि यमुना नद्यांनी रौद्र रूप धारण केलं आहे. वाढत्या पाण्याच्या पातळीमुळे जनजीवन विस्कळीत झालं असून, पूरग्रस्तांच्या वेदना समोर येत आहेत. असाच एक हृदयद्रावक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक पिता आपल्या लहान मुलाला पुराच्या पाण्यातून सुरक्षित ठिकाणी घेऊन जाण्यासाठी धडपडत आहे.
एकीकडे गुडघ्यापर्यंत वाढलेलं पाणी आणि दुसरीकडे निरागसपणे सर्व काही पाहत असलेला चिमुकला… हतबल झालेल्या वडिलांसाठी प्रत्येक क्षण कसोटीचा ठरत आहे. आपल्या मुलाला खांद्यावर घेऊन तो एका सुरक्षित ठिकाणाकडे मार्ग काढताना दिसतो. हे दृश्य पाहून अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे.
ही केवळ एका कुटुंबाची नाही, तर प्रयागराजमधील शेकडो पूरग्रस्तांची व्यथा आहे, जे आपल्या घरादारासह सर्वस्व सोडून सुरक्षित आश्रयासाठी संघर्ष करत आहेत.सध्या गंगा आणि यमुना नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत, ज्यामुळे शहराच्या सात भागांमधील सुमारे २०० गावांना पुराचा फटका बसला आहे.