पुणे : कोथरूड पोलिसांनी तीन सामाजिक कार्यकर्त्या तरुणींना बेकायदेशीरपणे ताब्यात घेऊन मारहाण केल्याप्रकरणी वंचित बहुजन आघाडीने (VBA) आज पुणे पोलिस आयुक्तालयाबाहेर तीव्र आंदोलन केले. राष्ट्रीय नेत्या अंजलीताई आंबेडकर आणि युवा नेते सुजात आंबेडकर यांनी स्वतः आयुक्तालयात जाऊन दोषी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
पोलिसांनी जातीवाचक शिवीगाळ, अश्लील भाषा वापरली आणि मारहाणही केली, असा दावा पीडित तरुणींनी केला आहे. या गंभीर प्रकारानंतरही पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली.वंचित बहुजन आघाडीचे आंदोलनपोलिसांकडून गुन्हा नोंदवला जात नसल्यामुळे, पीडित महिला व तरुणींसह वंचित बहुजन आघाडीचे पुणे शहरातील पदाधिकारी सकाळपासून पोलिस आयुक्तालयाबाहेर ठिय्या मांडून बसले होते.
या घटनेची माहिती मिळताच वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजलीताई आंबेडकर आणि सुजात आंबेडकर यांनी तातडीने पुणे गाठले. त्यांनी थेट पोलिस आयुक्तालयात जाऊन पीडित तरुणींशी संवाद साधला आणि या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत संबंधित पोलिसांवर तातडीने गुन्हा दाखल करण्याची जोरदार मागणी केली.
यावेळी, वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आयुक्तालयाबाहेर निदर्शने केली. जोपर्यंत दोषी पोलिसांवर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.