आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या विशिष्ट ध्येय्याने झपाटलेले दोन-चार तरुण जरी एकत्र आले, तरीही चळवळ जन्माला येते. एकेक करत कार्यकर्ते जोडत जाते आणि फोफावतेही. ते तरुण समाजाची आशा बनतात. कित्येकांचे प्रेरणास्रोत ठरतात .उमेदीच्या वयात अशाच झपाटलेल्या तरुणांपैकी एक तरुण म्हणजे, प्रा. एस.के. जोगदंड उर्फ आबा. दलित युवक आघाडीच्या संस्थापकांपैकी एक धुरंधर नेते. आबा म्हणजे, चळवळीचा चालता-बोलता विश्वकोश. आबा म्हणजे, चळवळीचे संचित! आबांनी पंच्याहत्तरी ओलांडली आहे. तरीही तीच बांधिलकी आणि तीच तगमग त्यांच्या ठायी दिसून येते. दलित युवक आघाडीची स्थापना असो की आबांनी ठरवून केलेला आंतरजातीय विवाह, एक गाव एक पाणवठ्याची चळवळ असो की अतिक्रमित गायरान जमिनीचे पट्टे नियमित करण्यासाठीचे आंदोलन असो, आबांनी अनेक आंदोलने केली. ती करत असताना, अनेकदा बाका प्रसंगही उद्भवले. तरीही आबा डगमगले नाही. आबांनी जे ठरवलं, अनुभवलं, फलद्रूप केलं आणि सोसलं-भोगलं ते चळवळीचे संचित वर्तमान आणि भविष्यातील पिढ्यांसाठीही प्रेरक संजीवनी ठरते. कसं? आबांना बोलते करून त्यांच्याच शब्दांत मांडण्याचा हा प्रयत्न…
मुलाखतः सुरेश पाटील, मुख्य संपादक, न्यूजटाऊन, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद).
प्रश्न : दलित युवक आघाडी स्थापन करण्यामागे त्या काळात तुमची नेमकी काय भूमिका होती? तुम्ही दोन-चार तरुणांनी एकत्र येऊन ही संघटना स्थापन केली. तुम्हाला असे का वाटले की, दलित युवकांचे एक स्वतंत्र संघटन असले पाहिजे?
आबा : मिलींद महाविद्यालयात असताना कुठे दलितांवर अन्याय-अत्याचार झाले की, आम्ही काही समविचारी मित्र मोर्चे, धरणे यासारखी आंदोलने करत असू किंवा अशा आंदोलनात सहभाग घेत असू. महाविद्यालयातून तत्कालीन मराठवाडा विद्यापीठात एम.ए.साठी गेल्यानंतरही ही आंदोलने सुरूच राहिली. आम्ही विद्यापीठात गेल्यानंतर तिथे मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची दरमहा अग्रीम अर्धीच देणे आणि तीही उशिरा देणे असे प्रकार ध्यानात आले. मग आम्ही त्याविरोधात आंदोलन केले आणि नागसेनवनातील महाविद्यालयात ज्याप्रमाणे शिष्यवृत्तीची पूर्ण अग्रीम महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात मिळायची तशी व्यवस्था करून घेतली.
ही आंदोलने करताना आमच्या मनात असा विचार आला की, विद्यार्थी असताना हे ठिक आहे पण, त्यानंतरसुद्धा बाहेर समाजात हे काम कायमस्वरुपी सुरू ठेवण्यासाठी आपल्या विचाराचे एक संघटन असले पाहिजे. म्हणून मी, माधव मोरे, अविनाश डोळस, मधुकर इंगोले इत्यादींनी मिळून ६ डिसेंबर १९७१ रोजी मिलींद महाविद्यालयाच्या एका हॉलमध्ये बैठक घेऊन दलित युवक आघाडीची (दयुआ) स्थापना केली. दलित पँथरची स्थापना नंतर झाली.
प्रश्न : तुम्ही औरंगाबादमध्ये नोकरी न करता अंबाजोगाईसारख्या ठिकाणाचीच का निवड केली?
आबा : दलित युवक आघाडीच्या मूळ संस्थापकांपैकी आमची ब-याच जणांची बॅकग्राऊंड ही ग्रामीण भागातील होती. त्यामुळे आम्हाला ग्रामीण जनतेची मूळ परिस्थिती, त्यांच्या अडचणी, दुःखे अनुभवाने माहीत होती. त्यामुळे ग्रामीण भागातच शक्य होईल तेवढे सामाजिक-आर्थिक-राजकीय क्षेत्रात काम करण्याकडे आमचा कल होता. माझ्याबाबतीत बोलायचे तर मला त्याकाळात औरंगाबाद, जालना व अंबाजोगाई अशा तिन्ही ठिकाणच्या कॉलेजमध्ये नोकरीची संधी होती. त्यातून मी अंबाजोगाईची निवड केली व १९७२ मध्ये स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयात इंग्रजी विषयाचा प्राध्यापक म्हणून रुजू झालो. तिथे माझ्या अगोदर समाजशास्त्राचे प्रा. विजय भटकर व ग्रंथपाल म्हणून डी.जी. धाकडे कार्यरत होते. माझ्यानंतर मधुकर इंगोले स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयात आले. त्यानंतर मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या महाविद्यालयात (आताचे यशवंतराव चव्हाण महाविद्यालय) १९७३ मध्ये इंग्रजी विषयाची जागा निघाल्यावर माधव मोरेंना मी बोलावून घेतले. त्यावेळी ते सचिवालयात कक्ष अधिकारी पदावर कार्यरत होते. परंतु, त्यांचा मूळ पींड अधिका-यापेक्षा कार्यकर्त्याचा असल्याने क्षणाचाही विचार न करता ते शासकीय अधिका-याची नोकरी सोडून अंबाजोगाईला येवून रुजू झाले. माधवराव अंबाजोगाईला आल्यानंतर आमची जी चळवळ सुरू होती, तिला अधिक वेग आला.
प्रश्न : तुम्ही अंबाजोगाईला रुजू झाल्यानंतर आंदोलने, चळवळीची पायाभरणी कशी केली?
आबा : मोरे सरांचे एक वैशिष्ट्य होते की, त्यांना प्रभावीपणे आंदोलन कसे, कुठे करायचे हे नेमकेपणाने कुणाहीपेक्षा अगोदर चटकन ध्यानात यायचे. तसे ते आंदोलन या विषयाचे तंत्रज्ञच होते. त्यामुळे आंदोलनाला वेग यायचा. सुरुवातीच्या काळात आम्ही शासकीय वसतिगृहाबाहेर राहणा-या विद्यार्थ्यांचे प्रश्न (उदा. त्यांना केरोसीन, शासकीय अन्नधान्य मिळणे इत्यादी) हाताळले. त्यात यश आल्यामुळे आमच्याभोवती विद्यार्थी वर्ग एकवटला. त्याचवेळी महाराष्ट्रात बाबा आढाव यांची ‘एक गाव, एक पाणवठा’ ही चळवळ सुरू होती. ती चळवळ बीड जिल्ह्यात प्रामुख्याने दयुआच्या सहभागातून यशस्वी झाली.
याचकाळात आम्ही विविध शासकीय कार्यालयात मागासवर्गीयांच्या रिक्त जागा भरण्यासाठी प्रामुख्याने त्या कार्यालयाला घेराव, मोर्चे अशी आंदोलने केली. दयुआच्या या आंदोलनांमुळे महसूल (तलाठी भरती), पाटबंधारे, अंबाजोगाई येथे नवेच चालू झालेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील राखीव जागा भरल्या गेल्या व अनेक मागासवर्गीय मुले तिथे नोकरीला लागली.
प्रश्न : शिक्षण क्षेत्रातीलही राखीव जागा भरण्याची चळवळ तुम्ही चालवली?
याचकाळात आम्ही विविध शासकीय कार्यालयात मागासवर्गीयांच्या रिक्त जागा भरण्यासाठी प्रामुख्याने त्या कार्यालयाला घेराव, मोर्चे अशी आंदोलने केली. दयुआच्या या आंदोलनांमुळे महसूल (तलाठी भरती), पाटबंधारे, अंबाजोगाई येथे नवेच चालू झालेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील राखीव जागा भरल्या गेल्या व अनेक मागासवर्गीय मुले तिथे नोकरीला लागली.
प्रश्न : शिक्षण क्षेत्रातीलही राखीव जागा भरण्याची चळवळ तुम्ही चालवली?
याच सुरुवातीच्या काळातील एक महत्त्वाचे प्रकरण म्हणजे, खळवट निमगावचे दलितांवरील अत्याचार व बहिष्काराचे प्रकरण. या प्रकरणाचे मूळ कशात होते? तर नदीच्या प्रवाहाच्या वरच्या बाजूला सवर्णांनी पाणी भरायचे आणि खालच्या बाजूला अस्पृश्यांनी पाणी भरायचे या जुन्या प्रथेत होते. श्याम तांगडे व माधव मोरे या त्या गावातील दोन तरुणांनी या प्रथेला आव्हान दिले व सवर्णांच्या झ-यावर पाणी भरले. या प्रकरणात सवर्णांनी मारहाण, बहिष्कार यासारखे प्रकार केले आणि यातील गुन्हेगारांवर कारवाई होऊ नये म्हणून त्यांची सर्व राजकीय, आर्थिक, सामाजिक, शासकीय शक्ती वापरली. परंतु, दयुआने त्यांच्याशी तेवढ्याच हिरीरीने दीर्घकाळ लढत दिली व त्यांच्याविरुद्धचा लढा यशस्वी केला. यातून दयुआला शाम तांगडे, माधव मोरे हे खंदे कार्यकर्ते काहीकाळ लाभले.
प्रश्न : आता थोडेसे तुमच्या वैयक्तिक जीवनाबद्दल…बालपण व शालेय शिक्षण काळातील काही आठवणी?
आबा : मी चौथीपर्यंत गावीच शिकलो. त्यानंतर पाचवीला आमच्या धाकट्या मामांनी (अॅड. नारायणराव सरवदे) मला अंबाजोगाईच्या योगेश्वरी नूतन शाळेत (ते तिथलेच माजी विद्यार्थी होते) प्रवेश देण्यासाठी नेले. परंतु, आम्हाला जायला उशीर झाल्याने तेथील प्रवेश बंद झाले होते. म्हणून माझा प्रवेश आमच्या गावाजवळच असलेल्या बनसारोळा येथील महाराष्ट्र विद्यालय या शाळेत केला. माझे पाचवी ते मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण याच महाराष्ट्र विद्यालयात झाले. त्या शिक्षण संस्थेचे मुख्य आधारस्तंभ नारायणरावदादा काळदाते हे होते. हे नारायणराव दादा संत प्रवृत्तीचे होते व त्यांनी चालवलेल्या शाळा, होस्टेल्स उत्कृष्ट असत. त्यांच्या शिक्षण संस्थेत शिक्षण घेतलेले ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी उच्च पदावर पोहोचले. नारायणरावदादांची ग्रामीण शिक्षणाबाबतची तळमळ, निष्ठा पाहून कुणीही माणूस प्रभावित झाल्याशिवाय रहात नाही. दादांचे व माझे संबंध जन्मभर राहिले. या काळात जवळबनमध्ये आमच्या वस्तीतले ‘प्रबुद्ध भारत’चे समूह वाचन, वस्तीत ढोर मांस (Beef) व मृतमांस सोडण्याच्या तसेच देवदेवता पूजन सोडण्याच्या सर्व वस्तीने घेतलेल्या शपथा. या त्या काळातील माझ्या ठळक आठवणी आहेत. मी लहान असताना आजोळी आजा- आजी, दोन्ही मामा, मावशी यांचा मी खूप लाडका असे. मला ताटात घेऊन जेवण्याची जणू त्यांच्यात चढाओढ असायची…. आजोळी थोरल्या मामांनी (विठ्ठलराव सरवदे, फौजदार) आणलेली पुस्तके, मासिके वाचनाचीही आठवण आहे.
प्रश्न : शिक्षण संपवून तुम्ही अंबाजोगाईत प्राध्यापकाची नोकरी स्वीकारल्यानंतर १९७५ मध्ये तुमचा आंतरजातीय विवाह झाला.
आबा : होय. हा आंतरजातीय विवाह ठरवून झालेला विवाह होता. माझी आंतरजातीय विवाहासंबंधीची मते स्पष्ट होती. कॉलेजला असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘Annihilation of Caste’ (जातीव्यवस्थेचे निर्मूलन) हा ग्रंथ मी बारकाईने वाचला होता. त्यात सांगितल्यानुसार आंतरजातीय विवाह हा जाती निर्मूलनाचा एक महत्त्वाचा मार्ग असल्याचे मला पटले होते. त्यात हा योग जुळून आला. त्यावेळी आमच्या कॉलेजमध्ये शिंदे नावाचे प्राध्यापक होते.
ते उदगीरकडचे आणि हिच्या (सुधाताई जोगदंड) कुटुंबाच्या चांगल्या ओळखीचे होते. ही तिच्या आईला घेऊन अंबाजोगाईच्या दवाखान्यात आली. त्यावेळी शिंदे सरांनी ही कल्पना काढली. मी, माझे कुटुंबीय आणि हिचे कुटुंबीयही तयार झाले व हा विवाह निश्चित झाला. हिचे सर्व कुटुंबीय पँथरच्या चळवळीत कार्यरत होते. त्यामुळे त्यांच्याकडून विरोधाचा फारसा प्रश्नच आला नाही.
प्रश्न : या विवाहाला तुमच्या बाजूने काही सामाजिक विरोध वगैरे…?
आबा : माझे आईवडील लौकिक अर्थाने अशिक्षित असले तरी त्यांचे बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचे सामाजिक/राजकीय भान उच्च दर्जाचे होते. त्यांच्याकडून काहीही विरोध झाला नाही. एवढेच नाही तर त्यांनी मला भक्कम पाठिंबा दिला. माझ्या जवळच्या नातेवाईकांत माझ्या दोन्ही मामांनी मला पाठिंबा दिला. आणखी एक नातेवाईक प्रा. बी.जी. रोकडे हेसुद्धा माझ्या बाजूने होते. असा नातेवाईकांतील प्रतिष्ठितांचा जोरदार पाठिंबा असल्याने समाजातूनही याला कोणीच विरोध केला नाही. उलट, समाजाला या विवाहाचे अप्रुपच वाटले.
प्रश्न : तुमच्या या आंतरजातीय विवाहाबद्दल लोकांना कुतूहलही वाटले असेल, काय माहोल होता त्यावेळी?
आबा : असा आंतरजातीय विवाह ठरवून कसा होऊ शकतो, याबाबत लोकांमध्ये फार उत्सुकता होती. त्यामुळे पंचक्रोशीतील सर्वसामान्य लोकही विवाहाला आले. सर्व नातेवाईक मंडळी झाडूनपुसून आग्रहाने उपस्थित राहिली. मोठी गर्दी जमली होती. आमच्या गावच्या (जवळबन) प्राथमिक शाळेपुढच्या मोठ्या मैदानावर हा कार्यक्रम झाला. या विवाह समारंभास दलित युवक आघाडीची सर्व मंडळी तर होतीच पण, त्यावेळी डॉ. द्वारकादास लोहिया, पन्नालाल सुराणा इत्यादी समाजवादी मित्रमंडळीसुद्धा हजर होती. या समारंभाचे माझ्या स्मरणात राहिलेले वैशिष्ट्ये म्हणजे,माझे एक आदर्श असलेले नारायणरावदादा काळदाते यांनी या समारंभाच्या भोजनाची व्यवस्था स्वेच्छेने आग्रहपूर्वक आपल्या अंगावर घेतली व पार पाडली.
प्रश्न : तुम्ही दलित युवक आघाडीच्या माध्यमातून बीड जिल्ह्यात गावोगावी आंबेडकर जयंती साजरी करण्याचा उपक्रम राबवला, गायरान जमिनीवरची अतिक्रमणे नियमित करण्यासाठी आंदोलने केली.
आबा : थांबा, थांबा. मला पहिल्यांदा हे स्पष्ट केले पाहिजे की, गावोगावी आंबेडकर जयंती साजरी करण्याची पद्धत बीड जिल्ह्यात प्रथम व्ही. जे. आराक या शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनच्या नेत्याने आमच्या अगोदर फारपूर्वी सुरू केली होती. आम्ही ती फक्त पुढे चालू ठेवली एवढेच. आंबेडकर जयंती साजरी करणे हे सामाजिक, राजकीय, धार्मिक प्रबोधनाचे फार प्रभावी माध्यम आहे. बाबासाहेब आंबेडकरांना मराठवाड्याचा व्यवस्थित अभ्यास होता. व्ही. जे. आराक हे खान्देशातील भुसावळ येथे चळवळीत कार्यरत होते. शिक्षणानंतर चांगली शासकीय नोकरी सोडून ते भुसावळ येथे आंबेडकरी राजकारणात उतरले. बाबासाहेबांच्या सूचनेवरून ते अंबाजोगाईला आले. येथे आल्यावर शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनच्या माध्यमातून त्यांनी बीड जिल्ह्यात राजकीय व सामाजिक चळवळीची मुहूर्तमेढ रोवली. त्यांच्या स्वतंत्र व स्वाभिमानी वंचितांच्या राजकारणाची जनमानसात आणखीही आठवण आहे. हेच राजकारण- समाजकारण आम्ही पुढे चालवले.
दयुआच्या माध्यमातून आम्ही जी कामे सुरू केली. त्यात वेळोवेळी दलित अत्याचारांच्या विरुद्ध लढे व दलित-वंचितांच्या रोजीरोटीचा प्रश्न सोडवणे हे प्रमुख विषय होते. तसे तर दयुआच्या माध्यमातून आम्ही प्रौढ साक्षरता अभियान राबवले, अंबाजोगाई येथे ग्रंथालयाची स्थापना, कला विभागामार्फत आंबेडकरी गीत गायन, वगनाट्य, नाटक सादरीकरण या माध्यमातून दलित-वंचितांचे प्रबोधन याही चळवळी चालवल्या. परंतु, रोजीरोटीचे प्रश्न सोडवण्यावर आमचा अधिकचा भर राहिला. आम्ही गायरान जमिनीवर अतिक्रमणे करण्यासाठी दलितांसह सर्व वंचितांना प्रोत्साहित केले. या कालावधीत १९७८ व १९९१ अशा दोन वेळा महाराष्ट्र शासनाने गायरान जमिनीवरील अतिक्रमणांचे नियमितीकरण करण्याबाबतचे निर्णय घेतले. या निर्णयांनुसार अतिक्रमित गायरान जमिनी नियमित करण्यासाठी आम्ही मोर्चे, घेराव या विविध मार्गांनी प्रशासनावर दबाव आणत राहिलो. याचा परिणाम म्हणून बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर गायरान जमिनीवरील अतिक्रमणे नियमित झाली व दलित-वंचितांच्या रोजीरोटीचा प्रश्न काही प्रमाणात तरी मिटला, याचे आम्हा सर्वांना कमालीचे समाधान वाटते. शासनाच्या विविध विभागातील मागासवर्गीयांच्या राखीव जागा भरण्याच्या आमच्या चळवळीलाही यश मिळाले.
प्रश्न : १९७५ मध्ये तुम्ही गायरान अतिक्रमणे नियमित करण्याच्या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आंदोलन केले होते.
आबा : होय. १९७५ साली महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण हे अंबाजोगाईला नवीनच निघालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासंबंधी कुठल्याशा उद्घाटनाला येणार होते. त्याकाळात माजलगाव तालुक्यात गायरान अतिक्रमण केल्यामुळे तेथील धनदांडग्या व उच्चपदस्थ राजकीय लागेबांधे असणा-या सरपंचाने तेथील दलितांवर अत्याचार केला होता. खरे तर गायरानावर अतिक्रमण केले, तर त्या प्रकरणी कायदेशीर कार्यवाहीची तरतूद आहे. लागल्यास त्याप्रमाणे कार्यवाही व्हायला पाहिजे. त्याऐवजी सदरील सरपंचाने कायदा हातात घेऊन अत्याचार केला. परंतु, त्याच्या राजकीय संबंधांमुळे त्याच्या विरोधात तक्रारसुद्धा नोंदवून घ्यायला पोलीस तयार नव्हते. याप्रकरणी आम्ही मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम होऊ देणार नाही, असे जाहीर केले. त्यावर संबंधित अधिका-याने आमची याप्रकरणी मुख्यमंत्र्यांशी भेट घालून देतो, असा शब्द दिला. त्याप्रमाणे आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी आमच्यासमोरच पोलीस अधीक्षकांना बोलावून घेऊन याप्रकरणात निष्पक्ष व कडक कार्यवाही करण्याचे बजावले. व त्याप्रमाणे कार्यवाही सुरू झाली. याचा परिणाम असा झाला की, त्यानंतर गायरान अतिक्रमणधारकांवर अत्याचार करण्याचे प्रमाण नगण्य झाले. या सर्व प्रकरणात त्या परिसरातील रहिवासी असलेले तरुण कार्यकर्ते बाबुराव तिडके (नंतर ते न्यायाधीश झाले) व आमचे प्राचार्य सबनीस हे दयुआच्यासोबत होते. (अपूर्ण)
(साभार: सम्यक पांथस्थ, प्रा. एस. के. जोगदंड गौरव ग्रंथ, चेतन प्रकाशन, पहिली आवृत्ती, नोव्हेंबर २०२४, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)…पान क्र.: १५ ते २०)
-सुरेश पाटील