लेखाचे शीर्षक वाचून अनेकांना वाटू शकते की, ही अतिशयोक्ती आहे. बौद्ध आणि धोक्यात ? छे… छे… त्यांना कुठं काय झालंय? असा प्रश्न आपल्या डोक्यात येऊ शकतो. पण, थांबा….! या भ्रमातून बाहेर या. आपल्या आजूबाजूला अनेक दृश्य – अदृश्य घटना घडत आहेत. बौद्ध धम्म, तथागत गौतम बुद्ध आणि बौद्धांवर दृश्य- अदृश्य हल्ले सुरू आहेत.
देशभरात वेगवेगळ्या घटना सतत सुरू आहेत. सुरुवात झाली ती बिहारमधील बोधगया येथून. बोधगया येथील महाबोधी महाविहार हे ब्राह्मण्यवाद्यांच्या ताब्यातून मुक्त करून ती बौद्धांच्या ताब्यात द्यावे. बोधगया हे भारतातील नव्हे तर जगभरातील बौद्धांसाठी महत्त्वाचे स्थान आहे. येथेच तथागत गौतम बुद्ध यांना बोधी वृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली. हे बुद्धविहार युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे. जगभरातील बौद्ध राष्ट्र यासाठी आर्थिक मदतही करत असतात. हे महाबोधी महाविहार मुक्त करून बौद्धांच्या ताब्यात द्यावे, बीटी ऍक्ट १९४९ रद्द करावा, यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून बौद्ध भिक्खू शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहेत. हा मुद्दा जागतिक पातळीवर देखील आता चर्चिला जात आहे. तरीही केंद्र सरकार, बिहार राज्य सरकार आणि विरोधी पक्ष पूर्णपणे गप्प आहेत. बौद्ध भिक्खूना मारहाण झाली. पोलिसांनी हे आंदोलन दडपण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडीने याविषयी महाराष्ट्रभर आंदोलन केले. बिहारमध्ये जाऊन स्वतः ॲड. प्रकाश आंबेडकर, भीमराव आंबेडकर आणि सुजात आंबेडकर यांनी आंदोलने केली. तेथील भिक्खुंना धीर दिला. खोट्या आरोपाखाली अडकवलेल्या भिक्खूना जेलमधून बाहेर काढायला कायदेशीर मदत देखील केली.
तर दुसरीकडे महाराष्ट्रात विनायक दामोदर सावरकर लिखित ‘संन्यस्त खड्ग’ या नाटकाचे प्रयोग सुरू झालेत. हे काल्पनिक नाटक सावरकर यांनी १९३१ मध्ये लिहिले. नाटक गौतम बुद्धांच्या काळात घडते. शाक्य वंशाचा सेनापती विक्रमसिंह, बुद्धांच्या उपदेशाने शस्त्रत्याग करून संन्यासी होतो, अशी एकंदरीत स्टोरी आहे. या नाटकाला महाराष्ट्रात सर्वात आधी आक्रमक विरोध वंचित बहुजन आघाडीने केला! विरोध का केला? हे समजून घेऊया.
नाटकाच्या विरोधात वंचित बहुजन आघाडी का आहे ? हे नाटक बौद्ध धम्मावर हल्ला आहे, असे का म्हटले जातेय? हा खूप मोठा प्रश्न आहे. विनायक सावरकर लिखित ‘संन्यस्त खड्ग’ या नाटकात खालील वाक्य आहेत. पुरावे म्हणून त्याचे व्हिडीओ देखील युट्युबवर, सोशल मीडियावर उपलब्ध आहेत.
१. “एकदा का बुद्ध धर्मात गेलात तर खायला, प्यायला भरपूर, भिक्षा भरपूर आणि वेळेला भिक्षुणीही भरपूर…”
२. गौतम बुद्ध यांचे वडील राजा शुद्धोधन यांच्या मुखी बुद्धांबद्दलचे गलिच्छ संवाद ― “माझा पुत्र महाराज शुद्धोधनाचा तनय,या शाक्य राष्ट्राचा युवराज अस्पृश्यांच्या गल्यांतून तुकडे वेचीत हिंडतोय. कोण बुद्ध? कुठला बुद्ध?? कसला बुद्ध???
कुठाय तो सिद्धार्थ, राजकुलाला कलंक लावणारा तो भिकारी कुठय.?
३. “तथागत गौतम बुद्ध हा अडाण्यांचा आचार्य”
४. काय रे भिक्कु – तुला भिक्षा मागताना लाज वाटत नाही का? भिक्कु घाणेरड्या, निघ इथून.
ही अशी अनेक वाक्य या नाटकात आहेत. वंचित बहुजन आघाडीने हे नाटक पुन्हा सुरू झाल्यावर पुणे, मुंबईत याविरोधात आंदोलन केली. त्यावेळी या नाटकाच्या आयोजकांनी सांगितले की, भाजपच्या भाई गिरकर नावाच्या माणसाने या नाटकाला परवानगी दिली व सांगितले की नाटकात आक्षेपार्ह काहीच नाही! आता भाजपचे लोकं ठरवतील का आक्षेपार्ह काय आहे काय नाही ते? हे बौद्ध विरोधी नाटकाला सरकारकडून जाणीवपूर्वक प्रोत्साहन दिले जात आहे.
एका मिनिटासाठी असे गृहीत धरू की, तथागत गौतम बुद्ध, बौद्ध धम्म आणि बौद्ध समूहाचे अपमान करणारे वाक्य हटवली तरी या नाटकावर आक्षेप आहेच. या नाटकाच्या आडून चित्पावन ब्राह्मण विनायक सावरकर बौद्ध भिक्कु, भिक्कु संघ आणि तथागत गौतम बुद्ध यांच्या विषयी कुत्सितपणे संपूर्ण नाटकात लेखन केले आहे. त्याचे आजचे बगलबच्चे तोच भाव घेऊन हे नाटक सुरू ठेवले आहे. हा बौद्ध धम्मावर थेट हल्ला आहे. या नाटकाला महायुतीच्या आमदार, खासदार यांच्याकडून याचे समर्थन होतेय. ते हे नाटक बघायला पुढे येत आहेत, या कारस्थानामध्ये सहभागी आहेत. महाविकास आघाडीतील राजकीय पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना उबाठा यांचा या नाटकाला मूक पाठिंबा आहे. शिवसेना उबाठा तर सावरकर प्रेमी आहे. ते उघडपणे याचे समर्थन करतात. यावरूनच समजते की, त्यांचा या नाटकाला उघड पाठिंबा आहे.
वैदिक हिंदुत्ववादी बौद्ध धम्माविरोधात, गौतम बुद्ध विरोधात जे अनेक कट कारस्थान रचत आहेत त्यापैकी हे नाटक एक कारस्थान आहे. या नाटकाला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उबाठा यांचा छुपा पाठिंबा आहे. एरवी छोट्या छोट्या गोष्टींवर माध्यमांच्या समोर आकांडतांडव करणारे यांचे हे पुढारी तथागत गौतम बुद्ध, बुद्ध धम्माचा अपमान होत असताना गप्प आहेत. यांची चुप्पी हे समर्थन आहे. महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनला दाबणे, बोधगयेत बौद्ध भिक्षूंवर हल्ला करणे, आरएसएसच्या नकली भिक्कुच्या माध्यमातून मुंबईतील बुद्ध विहारांवर ताबा मिळवणे, या सर्व गोष्टी बौद्ध धम्मातील अत्यंत महत्त्वाच्या अशा वर्षावास दरम्यान होत आहे.
असे अनेक हल्ले थेटपणे सुरू आहेत. मुंबईतील अनेक विहारांमध्ये आरएसएसचे नकली भिक्खू संघात घुसखोरी करत आहेत. त्या माध्यमातून स्थानिक बुद्ध विहारांवर आपला जम बसवायचा त्यांचा प्रयत्न आहे. त्या माध्यमातून स्थानिक समूहांमध्ये आरएसएसचा अजेंडा पेरणे, राजकीय हेतू साध्य करणे हा अजेंडा आहे. खामगाव (बुलढाणा) येथे एका बौद्ध तरुणाला त्याची जात, धर्म विचारून कथित गोरक्षकांनी बेदम मारहाण केली. मारहाण इतकी भीषण होती की, त्याचा एक डोळा निकामी झाला. तो तरुण सध्या रुग्णालयात मृत्यूशी झुंज देतोय. या सर्व हल्ल्यांविरोधात फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी आणि त्यांचे कार्यकर्ते रस्त्यावर लढतांना दिसत आहेत. या तरुणाची रुग्णालयात भेट घेऊन त्याला धीर दिला.
सावरकरच्या बौद्ध विरोधी नाटकाविरोधात पुणे, मुंबईत आंदोलन केल्यानंतर अनेक जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. बौद्धांना सतर्क राहणे गरजेचे आहे. आणि हे समजणे आवश्यक आहे की, आज परत बौद्ध धम्मावर हल्ला होतोय. व हा हल्ला चारही बाजूने पूर्ण ताकदीने केला जातो. जर आपला बौद्ध धम्म वाचवायचा असेल तर या कट कारस्थानाला समजावे लागेल आणि एकत्र येत या विरोधात लढावे लागेल. आज वंचित बहुजन आघाडीतील कार्यकर्ते या विरोधात उघडपणे लढत आहेत. अनेकांच्या मागे पोलिसांचा ससेमिरा आहे.
गुन्हे दाखल करून सरकार कोणालाही जेलमध्ये टाकू शकते. आता त्यांच्याकडे नवीन जनसुरक्षा कायदा आहेच. त्या आधारे ही मनुवादी पिल्लं बौद्ध धम्म संपवण्यासाठी याचा पुरेपूर वापर करतील. हा हल्ला बौद्धांवर थेट होत आहे, यात आपणही बौद्ध अनुयायी म्हणून सहभागी व्हा ! अन्यथा वेळ आपल्या हातून निघून गेल्यावर काहीच शिल्लक राहणार नाही! ही बुद्धाची भूमी होती, आहे आणि राहील….फक्त एवढं चालणार नाही तर त्यासाठी आपल्याला बौद्ध अनुयायी म्हणून मैदानात उतरावे लागेल आणि आपला धम्म जो नष्ट झाला होता, ज्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुनर्जीवित केले होते तो पुन्हा धोक्यात आहे. त्याला वाचवायची जबाबदारी ही फक्त तुमच्या आमच्या खांद्यावर आहे. या एकत्र या ! या लढ्यात सहभागी व्हा!
– जितरत्न पटाईत