नालासोपारा पूर्वमधून एक धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. वाहनचालना संबंधीच्या तपासणीदरम्यान, लायसन्स नसलेल्या युवकाने आपल्या वडिलांसह थेट वाहतूक पोलिसांवर हल्ला केला. नागीनदास पाडा येथील सीतारा बेकरीजवळ सोमवारी (15 जुलै) सकाळी 10 वाजता ही घटना घडली.
प्राथमिक माहितीनुसार, पोलिसांनी एका युवकाला थांबवून वाहनाचे कागदपत्र आणि लायसन्स विचारले असता, त्याने रागात येऊन वडिलांना बोलावून घेतले. त्यानंतर बापलेकांनी मिळून पोलीस हवालदार हनुमंत सांगळे आणि कॉन्स्टेबल शेषनारायण आठरे यांना अक्षरशः लाथाबुक्यांनी मारहाण केली.
मंगेश नारकर आणि पार्थ नारकर असे आरोपी बापलेकाचे नाव असून, संपूर्ण प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे. घटनास्थळी लोकांची गर्दी झाली आणि गोंधळ उडाला.
सध्या तुलिंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, दोघांवर गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. या प्रकारामुळे वाहतूक पोलिसांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.