राजस्थान : राजस्थानच्या चुरू जिल्ह्यातून एक अत्यंत दुःखद आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. आज भानुदा गावाजवळ भारतीय हवाई दलाचे एक जग्वार लढाऊ विमान कोसळले. या भीषण अपघातात पायलटसह अन्य एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
विमान नेमके कोणत्या कारणांमुळे कोसळले, याबाबतचे गूढ अद्याप कायम आहे, ज्यामुळे अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाशात अचानक एक जोरदार स्फोट झाला आणि त्यानंतर काही क्षणातच विमान शेतात कोसळले. अपघातानंतर विमानाला भीषण आग लागली. स्थानिक नागरिकांनी तात्काळ धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु आगीची तीव्रता जास्त असल्याने ते शक्य झाले नाही. हे विमान एका झाडावर कोसळले होते, ज्यामुळे ते झाडही पूर्णपणे जळून खाक झाले आहे.
हा संपूर्ण भाग वाळवंटी असल्याने आगीचा धोका अधिक वाढला होता.अपघाताची माहिती मिळताच हवाई दलाची बचाव पथके तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी विमानातील दोघांचे मृतदेह बाहेर काढले असून, त्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.जग्वार लढाऊ विमानांच्या सुरक्षिततेचा प्रश्न या घटनेमुळे पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
हे विमान कोणत्या तांत्रिक बिघाडामुळे कोसळले की अन्य काही कारण होते, याचा सखोल तपास हवाई दलाकडून सुरू करण्यात आला आहे. या घटनेने हवाई दलाच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. पुढील तपासातूनच या अपघाताचे खरे कारण समोर येईल अशी अपेक्षा आहे.