मुंबई : वंचित बहुजन आघाडी सत्तेत आल्यास दुधाच्या हमीभावासाठी (MSP) कायदा आणू. तसेच, आम्ही महानंदमध्ये खास करुन गोरेगाव आणि वरळीमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करू. जेणेकरून महानंदला स्पर्धात्मक बनवता येईल. हे वंचित बहुजन आघाडीचे आश्वासन असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून म्हटले आहे.
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्रातील दूध उत्पादक आंदोलक शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांना समर्थन देते. गेल्या वर्षी ३७ रुपये प्रतिलिटर दराने सहकारी संस्थांना दूध विकणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना डॅमेज कंट्रोलसाठी जाहीर केलेला प्रतिलिटर पाच रुपये बोनस हा पुरेसा नसल्याचेही आंबेडकर यांनी सांगितले.
ॲड. आंबेडकर म्हणाले की, एकेकाळी नफ्यात असलेली महानंद डेअरी आर्थिक संकटात सापडली असून त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून २३ ते २७ रुपये प्रतिलिटर दराने दूध खरेदी केले जात आहे, जे गेल्या वर्षीच्या तुलनेत खूपच कमी आहे. शिंदे आणि भाजपच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारने जाणीवपूर्वक राज्य सहकारी महानंद दूध डेअरीची हत्या केली आहे आणि गुजरातमधील अमूलला महाराष्ट्रातील महानंदचा बाजार हिस्सा काबीज करण्याची परवानगी दिली आहे, हे अगदी स्पष्ट आहे. अमूलला फायदा व्हावा म्हणून मोदींच्या आदेशावरून हे करण्यात आले.