साताऱ्यातून प्रशांत कदम यांना उमेदवारी
मुंबई : वंचित बहुजन आघाडीची लोकसभा उमेदवारांची सहावी यादी जाहीर झाली आहे. यात शिर्डी मतदार संघातून उत्कर्षा रूपवते यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर साताऱ्यातून सैनिक असलेल्या प्रशांत कदम यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या महासचिव, राज्य महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्षा रुपवते यांनी अकोल्यात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत नुकताच वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला होता. त्यामुळे त्यांना शिर्डीतून उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. तर सातारा मतदार संघात प्रशांत रघुनाथ कदम यांना उमेदवारी मिळाली आहे. ते माजी सैनिक असून, सातारा जिल्हा सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळखला जात असल्याने या मतदारसंघात त्यांची उमेदवारी लक्षवेधी ठरण्याची शक्यता आहे. याआधी साताऱ्यातून मारुती जानकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, त्यांनी वैयक्तिक कौटुंबिक समस्येमुळे उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय घेतला. यामुळे वंचितच्या राज्य कार्यकारिणीने त्यांच्या जागी प्रशांत कदम यांना उमेदवारी दिली आहे.
तसेच, वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीने यवतमाळ-वाशिम मतदारसंघातील समनक जनता पार्टीचे उमेदवार अनिल राठोड यांना पाठिंबा देण्याचे जाहीर केले आहे.