अंगणवाडीचा वर्ग चालू असताना कारवाई केल्याने लहान मुले जखमी
सर्व स्तरातून BMC चा निषेध : अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी
मुंबई : वंचित बहुजन आघाडीच्या जनसंपर्क कार्यालयाची बीएमसी एल वॉर्ड विभागाने तोडफोड केल्याची घटना कुर्ला येथे घडली आहे. विशेष म्हणजे अंगणवाडीचा वर्ग सुरू असताना अचानक ही कारवाई करण्यात आल्याने चारपेक्षा अधिक लहान मुले जखमी झाली आहेत. त्यामुळे कोणतीही पूर्वसूचना न देता करण्यात आलेल्या या कारवाईचा सर्व स्तरातून तीव्र निषेध करण्यात येत असून, या तोडफोडीतील अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, जखमी मुलांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
तोडफोड करण्यात आल्याची माहिती मिळताच वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते एल विभाग सहायक आयुक्त कार्यालयाच्या बाहेर जमले होते, तसेच त्याठिकाणी निदर्शने करण्यात आली.
कोणत्याही प्रकारची सूचना अथवा माहिती न देता ही कारवाई करण्यात आल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. या कार्यालयात अंगणवाडीचा वर्ग चालू असतानाच ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती सारिका जवळगेकर यांनी दिली. त्यांनी म्हटले की, कार्यालयातील अंगणवाडीच्या मुलांना जनावरासारखे बाहेर काढण्यात आले. यामध्ये चारहून अधिक मुलांना दुखापत झाल्याने त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ही कारवाई राजकीय सूडबुद्धीतून झाली आहे का? असा सवाल आता उपस्थित होत आहे. कोणत्याही प्रकारची सूचना अथवा माहिती न देता ही कारवाई करण्यामागचा उद्देश काय ? अशीही चर्चा आता सुरू झाली आहे.