‘किमान समान कार्यक्रम’ याला पहिल्यांदा प्राधान्य !
मुंबई : महाविकास आघाडीची इंडिया आघाडी होऊ नये याची दक्षता घेण्याचे आम्ही ठरवलेलं आहे.त्याच्यामुळे, ताक जरी असले तरी फुकून प्यायचे हे मी ठरवलेले आहे.जागावाटप हा दुय्यम विषय आहे, प्रथम विषय हा आहे की, एक ‘किमान समान कार्यक्रम’ हा आम्ही पहिल्यांदा घेतला आहे. त्याची अर्धवट चर्चा झाली आहे, अर्धवट चर्चा सुरू असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकरांनी माध्यमांसमोर सांगितले. काही कामानिमित्त त्यांना पूर्ण वेळ बैठकीत उपस्थित राहता न आल्याने ते बैठक पूर्ण होण्याआधी बाहेर आले तेव्हा त्यांनी ही माहिती दिली.
बैठकीत आम्ही जे मुद्दे मांडले आहेत त्यावर तीनही पक्ष अंतर्गत चर्चा करणार आहेत. त्याच्यामध्ये आणखी मुद्दे जोडायचे असतील, तर ते जोडले जातील आणि नंतर जो मसुदा तयार होईल तो अंतिम असेल.माझ्या दृष्टीने इंडिया आघाडी आता राहिली नाही, अखिलेश आणि काँग्रेस हे मित्रपक्ष राहिले होते. काँग्रेस वेगळी झाली आहे आणि समाजवादी पार्टी वेगळी झाली आहे अशी माझी माहिती आहे. त्यांनी वेगळं होऊ नये ही माझी ईच्छा आहे. पण, हकीकत अशी आहे की, दोघे वेगळे चालले आहेत. या पार्श्वभुमीवर महाराष्ट्रात तसे होऊ नये हे आम्ही पाहत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मुंबई येथील ‘हॉटेल ट्रायडंट’ येथे ही बैठक आयोजित करण्यात आली होती . पुढील चर्चेसाठी वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर आणि राज्य उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर उपस्थित होते.
आधी झालेल्या ‘मविआ’ च्या बैठकीत राज्य उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर हे उपस्थित होते. त्यावेळी महाविकास आघाडीने मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण संदर्भात अधिकृत भूमिका घ्यावी, जागावाटपाचा अधिकृत फॉर्म्युला जाहीर करावा, बाजार समिती कायदा आणि किमान आधारभूत किमती कायद्याबाबत काय भूमिका आहे ? आणि महाविकास आघाडीत आणि इंडिया आघाडीत सहभागी होण्यासाठी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना(UBT) अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी स्वाक्षरी केलेले अधिकृत पत्र वंचित बहुजन आघाडीला मिळावे असे मुद्दे पुंडकर यांनी मांडले होते.