मुंबई : मंगळवारी झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीसाठी मुंबईतील ट्रायडेंड हॉटेलमध्ये वंचित बहुजन आघाडीकडून महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर गेले होते. त्यावेळी डॉ. पुंडकर यांनी बैठकीत आपला अजेंडा महाविकास आघाडीसमोर सादर केला. तेव्हा आम्ही चर्चा करून सांगतो असं म्हणून त्यांना १ तास बैठकी बाहेर बसवून ठेवण्यात आले आणि आतमध्ये महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांची बैठक सुरू राहिली.
मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण यावर महाविकास आघाडीने अधिकृत भूमिका घ्यावी, वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत सहभागी करून घ्या त्यासाठी अधिकृत पत्र ज्यावर शरद पवार, उध्दव ठाकरे आणि मल्लिकार्जुन खरगे किंवा महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेनीथाला यांनी द्यावं आणि आम्हाला महाविकास आघाडीत सहभागी केले असे जाहीर करावे अशी मागणी या बैठकीत वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर सरांनी केली.
जागा वाटपाचा फॉर्म्युला त्यांचाच अजून ठरलेला नाही तर आम्ही आमची भूमिका कशी मांडू ? असा सवाल ही त्यांनी उपस्थित केला.
आरएसएस – भाजपला हरवणे हा आमचा अजेंडा आहे. जागा वाटप हा विषय आम्हाला गौण आहे. बाळासाहेब आंबेडकर यांनी हेही स्पष्ट केले आहे. आम्ही जागांसाठी भांडत नाही, तर आम्ही तात्विक मुद्द्यावर भांडत आहोत. तुम्ही कॉमन मिनिमम प्रोग्राम जाहीर करा. नसेल, तर पुन्हा भेटुयात आणि ठरवूयात. असेही त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांना तब्बल एक तास बैठकीचा बाहेर बसवल्याने त्यांनी माध्यमांसमोर जाहीर नाराजी ही व्यक्त केली. ‘मविआ’ने अशी वागणूक द्यायला नको होती असे त्यांनी सांगितले.