पुणे : मागील काही दिवसांपासून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.प्रकाश आंबेडकर हे ‘घोचू’ या शब्दाचा उल्लेख करत ट्विटरच्या माध्यातून नरेंद्र मोदींवर निशाना साधताना दिसत आहेत. इंडिया आघाडीनेही त्यांना एकत्रितपणे ‘घोचू’ म्हणावे असा सल्लाही त्यांनी एका ट्विटच्या माध्यमातून दिला होता. ॲड. आंबेडकर असे का म्हणत आहेत? याचा खुलासा त्यांनी आज पुन्हा ट्विटरच्या माध्यमातून केला आहे.
सामरिक सागरी भूगोलामुळे भारत-चीन भू-राजकीय संघर्षात मालदीवची महत्त्वाची भूमिका असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
ऑपरेशन कॅक्टस, ज्यामध्ये भारतीय सैन्याने मालदीवमध्ये सत्तापालटाचा प्रयत्न हाणून पाडला, त्यानंतर भारत-मालदीव संबंध अधिक दृढ आणि बहुआयामी झाले. येथे महत्त्वाचा मुद्दा असा होता की मालदीवचे इतर शेजारी – श्रीलंका, पाकिस्तान आणि सिंगापूर – यांनी त्यांच्या सैन्याद्वारे हस्तक्षेप करण्यास नकार दिला होता आणि केवळ भारताने लष्करी हस्तक्षेपाची विनंती मान्य केली होती. भारत – मालदीव संदर्भातला असा इतिहासाचा दाखला ही त्यांनी दिला आहे.
मालदीवच्या संरक्षणासाठी आणि विकासासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यात मागील अनेक सरकारांनी भूमिका बजावली आहे, ज्यामुळे मालदीवच्या समाजात भारतीयांची सकारात्मक प्रतिमा निर्माण झाली असल्याचे त्यांनी सांगितले.
पण, मोदींच्या उद्दामपणामुळे आधीच्या सरकारांनी केलेले काम आणि भारत-मालदीव संबंध धोक्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मालदीव आणि चीन जवळ यावे आणि चीनने मालदीववर आपला प्रभाव वाढवावा यासाठी मोदींचा हा डाव आहे का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
या कारणांमुळे मोदी घोंचू असल्याचे त्यांनी सांगितले आहे.