स्वीय साहाय्यकाने स्वीकारले निवेदन, वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पोलीसांच्या ताब्यात
अकोला – राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशाचा तिरंगा आणि संविधान नाकारत आली आहे. संघाचा अजेंडा हा हिंदू राष्ट्र आहे. अशात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ज्या भारतीय जनता पार्टीला पाठिंबा देतो. त्यांनीही देशात अराजकता निर्माण केलीय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं हिंदू राष्ट्राचा हट्ट सोडत संविधानाच्या आधारावर देशाला पुढे नेण्याचा प्रयत्न करावा, अशी मागणी करणारे निवेदन वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष धैर्यवर्धन पुंडकर यांनी आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांना अकोला येथे दिले. संघाच्या नेत्यांना थेट अशा प्रकारचे निवेदन देण्याची ही पहिलीच घटना असल्यामुळे संघात खळबळ माजली आहे. घाबरलेल्या मोहन भागवत यांनी मी निवेदन स्वीकारत नसल्याचे पोलिसांमार्फत सांगितले.
वंचित बहुजन आघाडीकडून निवेदन देण्यात असल्याची माहिती मिळताच मोहन भागवत यांनी नकार दिला मात्र, त्यांच्या स्वीय साहाय्यकाने ते निवेदन स्वीकारले. या निवेदनात वंचित बहुजन आघाडीकडून थेट आरएसएसवर हल्ला करण्यात आला आहे. संघाची विचारधारा देशाला वाचवणारी नसून भारतीय राज्यघटनेनुसार या देशाला पुढे नेण्याचा प्रयत्न करा, असं सांगण्यात आले आहे.
मोहन भागवत अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यांना निवेदन देणार असल्याचं वंचित बहुजन आघाडीनं शनिवारी रात्रीच जाहीर केलं होतं. वंचित बहुजन आघाडीनं शनिवारी रात्री निवदेन देणार असल्याची घोषणा करताना अकोला जिल्हा पोलिस विभाग कामाला लागला. मोहन भागवत यांना झेड प्लस दर्जाची सशस्त्र सुरक्षा आहेत. त्यामुळं त्यांच्या दौऱ्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, यासाठी पोलिसांनी शनिवारपासूनच वंचितच्या पदाधिकाऱ्यांवर नजर ठेवण्यास सुरुवात केली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वर्तुळातही याबद्दल चर्चा होती.
पोलिसांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, विभागीय अध्यक्ष बालमुकुंड भीरड, पश्चिम अकोल्याचे कार्याध्यक्ष मजहर खान, महासचिव गजानन गवई, जिल्हा परिषद गटनेते ज्ञानेश्वर सुलताने, अॅड. संतोष राहटे, पूर्व अकोल्याचे अध्यक्ष शंकर इंगळे, आदिवासी समाजाच्या नासरी चव्हाण यांना गाठत त्यांना थांबविले व ताब्यात घेतले.