मुंबई : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना फक्त मदतीची घोषणा करून सरकारने पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. शेतकऱ्यांवर अन्याय करत शासनाने ऐन दिवाळीत नुकसान भरपाई देण्याच्या नावावर शेतकऱ्यांची भाकर हिसकावली आहे. असे म्हणत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकरांनी ट्विटरच्या माध्यमातून राज्य शासनावर निशाना साधला आहे.
दर हेक्टरी नुकसानग्रस्त जमीनीचे क्षेत्र सरकारने वाढवले व मोबदल्यात पाच हजारांची कपात करत शेतकऱ्यांना हवालदिल केलंय. सरकारने बागायती क्षेत्रासाठी १० हजार रुपयांची कपात केली आहे. आस्मानी आणि सुलतानी संकटाला आता शेतकरी तोंड देतोय. असेही त्यांनी म्हटले आहे.
जून ते ऑक्टोबर या कालावधीत शेतकर्यांचे अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ मदत देण्याची घोषणा राज्य शासनाने केली होती. प्रत्यक्षात दिवाळी झाली तरी मदतीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली नाही. बागायत क्षेत्रासाठी गतवर्षी २७ हजार ५०० रुपयांची मदत देण्यात आली होती. या वर्षी ही मदत केवळ १७ हजार रुपये ठेवण्यात आली आहे. यात हेक्टर मागे १० हजार रुपये कपात करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांनी ट्विट करत सरकारवर निशाना साधला.