मुंबई : संपूर्ण महाराष्ट्रात सध्या दिवाळीची धामधूम सुरु आहे. ऐन दिवाळीत महागाईने सर्वसामान्यांना मोठी झळ बसणार आहे. ऐन दिवाळीत सर्व प्रकारची कडधान्य महागली आहेत. किरकोळ बाजारात सुकामेवा, रवा, साखर, गुळ, मैदा, बेसन, पोहे, खोबरे आणि डाळींच्या दर किरकोळ बाजारात 35 ते 40 टक्के वाढले आहे. त्याचबरोबर दिवाळीच्या दरम्यान २० दिवसांपर्यंत एस. टी तिकीट दरात १० टक्के दरवाढ असणार आहे. त्यामुळे पुढील २० दिवसांपर्यंत प्रवाशांना प्रवास करताना नेहमीपेक्षा जास्तीचे दर आकारले जाणार आहेत.अशातच वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून शिंदे – भाजप सरकारवर निशाना साधला आहे.
एकनाथ शिंदे आणि भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारची जनविरोधी धोरणे आणि वाढत्या महागाईमुळे दिवाळीच्या सणाचा उत्साह ओसरला आहे आणि महाराष्ट्रातील लोकांचे, विशेषतः शेतकरी, विद्यार्थी, कंत्राटी कर्मचारी आणि महिलांचे जगणे अत्यंत कठीण झाले आहे. एकनाथ शिंदे आणि भाजपच्या जनविरोधी सरकारने या दिवाळीत महाराष्ट्राला अंधारात ढकलले आहे. असे अॅड.आंबेडकर यांनी म्हटले आहे.