संत गाडगेबाबा हे कर्ते समाज सुधारक होते. वारकरी संप्रदायातील अतिशय ताकदीचा संत म्हणून गाडगे बाबांचा नामोल्लेख करावा लागतो. महाराष्ट्रात होऊन गेलेल्या संतांमध्ये गाडगेबाबांचे कार्य पराकोटीचे आहे. बाबांचं शिक्षण म्हणजे अक्षरांची तोंड ओळख नव्हे, तर ते अज्ञानीच ! तरीही या गाडगेबाबांनी उच्च दर्जाचं समाज प्रबोधन केलं. आपल्या कर्तबगारीने आणि भाषा शैलीच्या आधारे लोकांमध्ये असलेली अंधश्रद्धा व धर्माविषयीची भ्रामकता सहजरीतीने लोकांना पटवून देत असत. गाडगेबाबा अज्ञानी असले तरीही डॉक्टर, इंजिनिअर, प्राध्यापक, शिक्षक आणि डॉक्टर झालेल्या सुशिक्षितांना लाजवेल एवढे त्यांचे व्यक्तिमत्त्व प्रगाढ होतं.
संत गाडगेबाबा म्हणजे चालते बोलते विद्यापीठ होते. अज्ञानी माणूस तरीही त्यांच्या बोलण्यातील धाडस वाकबगारपणा, एकनिष्ठता त्यांच्या अंगी दिसून येते. ग्रामीण भागातील लोकांच्या प्रगतीचे मूळ अज्ञान व अंधश्रद्धेत आहे हे त्यांनी प्रथम ओळखले होते. म्हणूनच या देशातील लोकांमध्ये असलेली अंधश्रद्धा, अज्ञान, धर्मभोळेपणा हे दूर करण्यासाठीच आपले सर्वस्वी आयुष्य जनकल्याणार्थ झिजविले. संत गाडगेबाबांनी लोकांमध्ये असलेली अंधश्रद्धा दूर करण्यासाठी गावागावात जाऊन कीर्तनाच्या माध्यमातून जनजागृती करून उदबोधनपर मार्गदर्शन करीत होते. गाडगेबाबा अतिशय लक्षण माणूस! संत परंपरेतील असूनही देव आणि धर्म, व्रत-वैकल्य, नवस बोलणे आणि फेळणे इत्यादी विषयांवर अतिशय प्रखरपणे ते बोलायचे.
ग्रामीण भागातील लोक अंधश्रद्धेच्या विळख्यात अडल्याने त्यांच्या विकासाच्या सर्वच वाटा खुजा झाल्या आहेत हे गाडगेबाबांनी जाणलं होतं. समाज परिवर्तनासाठी व प्रबोधनासाठी गाडगेबाबांनी कीर्तनाचीच निवड केली होती. जनतेचे प्रबोधन करताना किती सहजपणे त्यांच्या अंतर्मनात प्रवेश करतात व तार्किकपणे आपले विचार त्यांच्या गळी उतरवतात याचा उत्कृष्ट पुरावा संत गाडगेबाबांच्या मांडणीत सापडतो. संत गाडगेबाबा जाहीर कीर्तनातून लोकांशी थेट संवाद साधायचे. कालांतराने कीर्तनात तल्लीन झाल्याचे पाहून लोकांना सहज प्रश्न विचारायचे लोकही जाहीरपणे बाबांच्या विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायचे. संत गाडगेबाबांचे अख्खं कीर्तनच एक संवाद असायचा.
गाडगेबाबा किर्तन सुरू असतांनाच लोकांना प्रश्न विचारायचे,
” काऊन रे तुम्ही देवाले मानता का नाही. लोक म्हणायचे, हो जी आम्ही देवाला मानतो.
मंग तुमचा देव कुठे राहयते- गाडगे बाबा विचारायचे आमचा देव देवळात राहते- लोक म्हणायचे अरे वा रे वा ! माझा देव माझ्या मनात राह्यते आणि तुमचा देव देवळात राह्यते अरे देवळात देव नसते. देव माणसाच्या मनात असते. देव दुसऱ्या माणसात असते. भुकेल्याला अन्न द्यावं अनाडयाले शिक्षण द्यावं माणसाला प्रेम द्यावं. रंजल्या गांजलेल्यांवर प्रेम करावं. त्यांच्यात ईश्वर पहावं यालेच देव माननं म्हणते.असं परखडपणे देवाविषयीची संकल्पना लोकांना समजावून सांगीत असतं. संत गाडगेबाबा अनेक विषयांवर ते प्रबोधन करीत असत. नवसापोटी कोंबड्या बकऱ्यांचा बळी दिला जात असे त्या ठिकाणी जाऊन कडाडून विरोध करीत असत त्यांची ही भूमिका अत्यंत प्रामाणिकपणाची होती.
संत गाडगेबाबांच्या प्रबोधनाची पद्धतही फार विलक्षण होती ते तीर्थक्षेत्री उपस्थित जनसमुदायांच्या समोर विचारायचे तुम्ही हे कोंबड कापले आणलं हे कोणाचे लेकरू हाय.
लोक म्हणायचे देवाचे लेकरू व्हय मंग गाडगेबाबा ज्यांचा नवस फेडायला आणलं त्या पोराकडे बोट दाखवून विचारायचे हे पोरगं कुणाचं आहे. बाप होणार म्हणायचा महा व्हय मग तू कोणाचा आहे गाडगेबाबा म्हणायचे माझ्या बापाचा -लोक म्हणायचे तुझा बाप कोणाचा- गाडगेबाबा बापाच्या बापाचा- लोक बापाचा बाप कोणाचा- गाडगेबाबा देवाचा लोक म्हणायचेम्हणजे तू बी देवाचं लेकरू अन् तूहं पोरगं बी देवाचं लेकरू गाडगेबाबा हो,जी – लोकं म्हणायचे अरे वा रे वा ! तूह पोरगं बी देवाचं लेकरू अन् कोंबडं देवाचं लेकरू तू म्हणतं का देवाचं लेकरू कापलं का देव प्रसन्न होते मंग घे काप तूहं पोरगं अन् घे देवाले प्रसन्न करून एवढे मार्मिकपणे देवाच्या संदर्भात बोलणारे संत गाडगेबाबा सुशिक्षितांना का समजले नाहीत? हा प्रश्न खरा चिंतनाचा आहे. देशात ईश्वरोपासना दिवसेंदिवस वाढत आहे. आज अंधश्रद्धेचं स्तोम सुशिक्षितांमध्ये अधिका आढळून येते. अंधश्रद्धेच्या निर्मूलनार्थ ज्यांनी आपली सबंध हयात घालविली त्यात संत गाडगेबाबांचे योगदान राष्ट्रहिताच्या दृष्टीने अतुलनीय आहेत. आपण विज्ञान युगात वावरत असतांना विज्ञानाच्या कितीही गप्पा मारीत असलो तरी कर्मकांड, नवस बोलणे- फेडणे ,व्रत- वैकल्ये देवी- देवता पुजणे, तुळस पुजणे हे कार्य अंगवळणी आजही विद्यमान आहेत. भारताने विज्ञानात कितीही प्रगती केली असली तरी त्याचे श्रेय दैवी चमत्काराकडे लादले जाते. पंतप्रधान, राष्ट्रपती, खासदार आमदार, मंत्री, अभिनेते, अभिनेत्री इत्यादी देवी- देवतेकडे साखळे घालतांना दिसतात हे कशाचे द्योतक समजायचे? शासनाने संत गाडगेबाबा गावागावात पोहोचवला पण त्याचे परिवर्तनशील विचार मात्र जागीच विरलेत. गावागावात ग्रामपंचायतचे प्रवेशद्वार स्वागत करीत आहेत. अमरावती विद्यापीठाला संत गाडगेबाबांचे नाव देण्यात आले म्हणजे त्यांचे विचार कृतीत उतरवले असे होते काय? संत गाडगेबाबांचे विचार आचरणात आणतो की, त्यांच्या विचारांचे धिंडवडे उडवतो असा संभ्रम निर्माण झाला आहे.
संत गाडगेबाबां आपल्या आयुष्यात कधीही देवळात गेले नाहीत बाबांनी मूर्ती पूजेचा वारंवार तीव्र निषेध केला होता. संत गाडगेबाबा पंढरपूरच्या विठोबाच्या दर्शनाला कधीच देवळात गेले नाहीत उलट विठोबाच्या यात्रेला जमलेल्या जनसमुदायासमोर चंद्रभागेच्या वाळवंटात त्यांचं कीर्तन व्हायचं. पंढरीच्या विठोबा सारखे कमरेवर हात ठेवून ते म्हणायचे तुम्ही आपलं गाव सोडून, शेतीचे काम सोडून इतक्या दूर आले या संदर्भात त्यांना मार्गदर्शन करीत असत. गाडगेबाबा कोणत्याही देवाच्या दर्शनाला गेले नाहीत त्यांनी कधीही कोणतंही देवालय बांधलं नाही. पण सर्वसामान्य जनता देवालयात जाते म्हणून त्यांच्या सोयीसाठी अनेक तीर्थस्थानी धर्मशाळा बांधल्या. परंतु आज समाजाचे पुढारी,मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री, खासदार, आमदार, मंत्री देवालय बांधण्यासाठी करोडो रुपयांचा निधी पुरवितात. मूर्ती भेट देतात, शासन अनुदान पूरविते पण पडलेल्या शाळा जागीच जीर्ण होतात आणि विद्यमान जिल्हा परिषदेच्या शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. याकडे मात्र शासन दुर्लक्ष करीत असते याचेच वैषम्य वाटते.
संत गाडगेबाबा सांगायचे या जगात कोणी कोणाचा अवतार नसतो देव कधीच माणसाच्या जन्माला येत नसतो असं सांगणारे संत गाडगेबाबा 20 डिसेंबर 1956 ला दिवंगत झाले. त्यांच्या मृत्यूनंतर ठीक ठिकाणी त्यांची देऊळ बांधल्या गेली. त्यांच्या मूर्ती पुढे आरती केली जाते. स्त्रिया त्यांच्या मूर्ती पुढे नवस बोलतात. नवसाविरुद्ध बोलण्यात त्यांची हयात गेली. संत गाडगेबाबा म्हणतात मग नवसायास पुत्र होती, कशाला करणे लागे पती असे विज्ञानवादी बोलणाऱ्या त्या संत गाडगेबाबांच्या मूर्ती पुढे नवस बोल़ले जाते याचेच सखेद आश्चर्य वाटते. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. मूर्ती पूजेला विरोध झाला पाहिजे. तरच त्यांना श्रद्धांजली वाहिल्यासारखे होईल एवढेच सांगावेसे वाटते. त्यांच्या स्मृती दिनानिमित्य त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली…
- प्रा.डॉ. मदन रामटेके
प्राचार्य
मारीया महाविद्यालय, मूल.
९६७३४५६७०६