“ओवी ट्रस्ट” ही संस्था महाराष्ट्रातील ग्रामीण भागात आदिवासी आणि भटके-विमुक्तांच्या शैक्षणिक आणि सामाजिक सक्षमीकरणासाठी कार्य करते. वंचित समूहातील मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे व हा समाज मुख्य प्रवाहात यावा हे संस्थेचे उद्दिष्ट आहे. यवतमाळ येथील धनगरवाडी (मेंढला) या गावात स्थलांतरित कुटुंबातील मुलांच्या शिक्षणासाठी ‘बालनगरी’ हे मुक्त शिक्षणकेंद्र ओवी संस्थेमार्फत जुलै २०२० पासून सुरू आहे.
बालनगरीमध्ये मुलांसाठी गोष्टींचं प्रकट वाचन, सहभागी वाचन केलं जातं. मुलांसमोर वेगवेगळ्या आशयाची पुस्तकं वाचली जातात. वाचनानंतर त्या पुस्तकांवर चर्चा होते, तेव्हा मुलंही त्यांच्या भावविश्वातल्या गोष्टी सांगतात.
एक दिवस मी मुलांना ‘पिहू आणि तिचे जादूई मित्र’ हे पुस्तक वाचून दाखवत होते. पुस्तकातली पिहूची जादूई पेटी, त्यात असलेल्या रंगीबेरंगी पेन्सिली, खोडरबर आणि त्यांची जादू; मुलं अगदी रंगून गेली. गोष्टीतली पिहू हवं ते पेन्सिलीनं निर्माण करते आणि नको ते खोडरबरानं नष्ट करते, पुरात वाहून गेलेल्या गावाला नव्यानं वसवते अशी काहीशी ही गोष्ट आहे.
गोष्ट वाचून झाल्यावर मी मुलांना विचारलं, ‘‘तुम्हाला अशी जादूची पेटी मिळाली, तर काय कराल?’’
मुलं एक एक करून सांगू लागली. हर्षा म्हणाला, ‘‘आपल्या बालनगरीमध्ये सर्वांना बसायला पुरेशी जागा नाही. लहान मुलांना सारखं बाहेर, उघड्यावर, उन्हातान्हात बसावं लागतं. त्यांच्यासाठी मी एक रूम (खोली) बांधेन.’’
दीपक म्हणाला, ‘‘मी आपल्या बालनगरीला रंगवून नव्यासारखं बनवेल.’’
अंजना म्हणाली, ‘‘बालनगरीमध्ये लाईट, फॅनची सोय नाही. मी लाईट फॅन काढेल.’’
वैष्णवी म्हणाली. ‘‘ताई-दादा, तुम्ही आमच्यासोबत जमिनीवर बसता. आमच्या शाळेत गुरुजींना टेबल-खुर्ची असते. मी सगळ्यांसाठी टेबल-खुर्ची तयार करेन.’’
सोपान म्हणाला, ‘‘आपले साहित्य आणि खेळणी ठेवायला मी कपाट बनवेन.’’
तर सोनू म्हणाली, ‘‘मी मोठा फळा तयार करेन.’’
कुणी म्हणालं, ‘आपलं गाव नवं करू. पाणी, लाईट, रस्ते, घरं; सगळं छान करू आणि त्यापेक्षाही बालनगरीमध्ये मोठी इमारत, सर्वांना राहण्यासाठी होस्टेल आणि खेळायला ग्राउंड करू.’
मुलं किती बारकाईनं आजूबाजूच्या परिस्थितीकडे बघतात, आपल्या सोबतच्या लहान गटातल्या मुलांबद्दल त्यांना वाटणारी काळजी, परिस्थितीची जाणीव, आपल्या सामुदायिक गरजा, भविष्यवेधी दृष्टी – ह्या सार्यानं मी खूप भारावून गेले. आम्हाला प्रश्न पडला, की या चिमुकल्यांना हे कुणी सांगितलं असेल? आम्ही तर यावर कधी बोललोसुद्धा नाही. मिळेल त्या परिस्थितीमध्ये मुलांना फक्त शिकवत गेलो. त्यांचा सर्वसमावेशक विचार आणि संवेदनशील दृष्टिकोन मला खूप ऊर्जा देऊन गेला.
प्रणाली – धम्मानंद (ओवी ट्रस्ट, यवतमाळ)
मो – ९००४१३५२५०