लैंगिकतेचा संबंध लिंगभावाशी असतो आणि लिंगभावाचा संबंध भांडवलशाही, धर्मव्यवस्था, जातव्यवस्था आणि पितृसत्ता यांच्याशी असतो. या सर्व व्यवस्थांचे आंतरिक (intersectional) संबंध जोवर आपण एकत्रितपणे पाहत नाही, अभ्यासत नाही तोवर एलजीबीटी चळवळ काय, कोणतीही चळवळ समजण्यास आणि तिची दिशा ठरवण्यास आपण कमी पडू शकतो.
जूनचा महिना हा जगभरात समलिंगी आणि तृतीयपंथी लोकांनी सुरू केलेल्या चळवळीची आठवण आणि तिचा उत्सव या उद्देशाने ‘प्राईड मंथ’ (Pride Month) म्हणून साजरा केला जातो. या महिन्यात जगभरातील विविध देशांमध्ये एलजीबीटीआयक्यूए+ (LGBTIQA+) लोकांची ‘प्राईड मार्च’ म्हणजेच दांडी भरवली जाते. या दांडीमध्ये समलिंगी स्त्री पुरुष (गे, लेस्बियन), ट्रान्सजेंडर / कोती, ट्रान्ससेक्युअल / तृतीयपंथी, इंटरसेक्स, क्विअर, एसेक्स्युअल इत्यादी लोक तर असतातच परंतु, त्यांच्या राजकीय आवाजाला ‘पाठींबा’ देण्यासाठी ‘सहयोगी’ (allies) म्हणून भिन्नलिंगी (heterosexual) स्त्री-पुरुषही सामील होतात.
प्राईड म्हणजे गर्व. गर्व या भावनेचा आत्मसम्मानाशी संबंध असतो. आपल्या अस्तित्वाची पावती दुसऱ्याने द्यावी हे आपल्या असण्यातच अद्यारूत आहे. माणूस हा सामाजिक प्राणी आहे ह्याचा अर्थ तो हाच माणसाच्या अनेक ओळखी (identities) असतात. उदाहरणार्थ धार्मिक, लैंगिक, वर्गीय, जातीय, वैचारिक इत्यादी. त्याच्या काही ओळखींना समाजात आधीपासूनच मान्यता असते. त्या ओळखींना भाषेमध्ये एक नाव असते, समाजात एक स्थान असते, त्यांची एक आर्थिक व सामाजिक सत्ता असते आणि विशिष्ट ओळखींमुळे माणसाला विशिष्ट सवलती मिळत असतात. परंतु, माणसाच्या इतरही अनेक अशा ओळखी असतात (उदाहरणार्थ स्त्री, दलित, समलिंगी, तृतीयपंथी, अपंग इ.) ज्यांच्या आधारावर त्याचे समाजात शोषण होत असते. कित्येकदा या ओळखींना भाषेत नावही नसते (उदाहरणार्थ समलिंगी लोकांना परदेशात ‘क्वियर’ म्हणजे विचित्र असे संबोधले जात असे, पुढे समलिंगी व्यक्तींनी याच नावाचा स्वतःची ओळख म्हणून सकारात्मक वापर करायला सुरुवात केली.) आणि समाजात मान्यताही नसते. कायद्यामध्येही त्यांचा भेदभाव केला जातो आणि म्हणून माणसाच्या मानसिक, सामाजिक आणि आर्थिक विकासाच्या शक्यता त्याच्याकडून हिरावून घेतल्या जातात. समाजाकडून मिळालेल्या अशा वागणुकीमुळे अशा व्यक्तींच्या मनामध्येही एक न्यूनगंड तयार होतो आणि समाजाकडूनही तो तसा तयार केला जातो. त्यामुळे ही सामाजिक समस्या न उरता त्यांच्यासाठी अनेक मानसिक समस्याही उभी करू लागते. म्हणूनच लैंगिक ओळखींच्या चळवळीचा ‘गर्व’ आणि ‘आत्मसम्मान’ यांच्याशी जवळचा संबंध आहे.
परंतु ‘सम्मान’, ‘इज्जत’ या भावनांचा खोलवर अभ्यास केला, तर व्यवस्थेचे त्यामागचे एक भ्रष्ट राजकारण लक्षात येते. हे राजकारण गुलामगिरीचे असते. ज्यामध्ये व्यवस्था ही मालक असते, तर सामान्य माणूस हा ‘गुलाम’ ! मालकाला नेहमी सत्ता हवी असते, नफा हवा असतो. या दोन्हींची कायमस्वरूपी सोय होत राहावी म्हणून तो शोषणाची एक व्यवस्था प्रस्थापित करतो. गुलामांना कायम कामात व्यग्र ठेवायचे असल्यामुळे आणि ते खरे तर शोषित आहेत हे त्यांच्या लक्षात येऊ नये असे वाटत असल्यामुळे मालक त्याच्या गुलामांचे अजून अनेक परस्परविरोधी ओळखींमध्ये विभाजन करतो. त्यांना कामाच्या स्पर्धेमध्ये भाग घ्यायला प्रेरित करतो. स्पर्धेमुळे गुलाम अजून मेहनतीने काम करून अधिक मेहनतीचा मोबदला तर देतोच; परंतु या मेहनतीचा अतिरिक्त ‘सम्मान’ ही करतो. गुलामही वैयक्तिक मालमत्ता (private property) आणि ‘सम्मान’ यांच्या नशेत वेडा होतो आणि अधिक मेहनत करू लागतो. गुलामाला मिळणारी ही सत्ता तो मालकाच्या विरोधात जरी वापरू शकत नसला, तरी ती त्याला इतर गुलामांचे शोषण करायला पुरेशी असते. अशा तऱ्हेने पुरुष मालकाचा गुलाम असतो, तर स्त्री ही त्याचीही गुलाम असल्यामुळे तिला आपण ‘गुलामांची गुलाम’ (slave of slaves) असं म्हणू शकतो. थोडक्यात, मालकाच्या शोषणामुळे आपली गुलाम म्हणून गमावलेली सत्ता आणि आत्मसम्मान आपण पुढे इतर गुलामांना आपले गुलाम करून थोड्या फार प्रमाणात पुन्हा मिळवतो. अशा तऱ्हेने मालकाने सुरू केलेल्या शोषण व्यवस्थेच्या गुलामांच्या जगात असंख्य प्रतिकृती तयार होत राहतात. शेवटी यालाच तर स्पर्धा म्हणायचे! या स्पर्धेमुळे मालकाचा नफा तर वाढत जातोच, पण, स्पर्धेमुळे गुलामही एकमेकांचेच शत्रू होऊन बसतात आणि या दोघांच्या भांडणात मालकाचा म्हणजे तिसऱ्याचा लाभ होत राहतो आणि मुख्य म्हणजे स्पर्धेची आणि शोषणाची ही व्यवस्था चालू ठेवण्यासाठी काही गुलाम स्वतः कळत नकळत मालकाचे ‘एजंट’ बनतात. मालकाकडून मिळालेली थोडीफार सत्ता, समाजात मिळालेले स्थान मिळालेला ‘सम्मान’ या सगळ्याला आपण गुलाम चालवत असलेली मालकाची ‘एजन्सी’ म्हणू शकतो.
हेगेल आणि कार्ल मार्क्स यांनी दिलेले समाज व्यवस्थेचे हे विश्लेषण कोणत्याही चळवळी आणि त्यांची दिशा समजण्यासाठी अत्यंत उपयोगाचे आहे. व्यवस्थेचे हे भयानक रूप लक्षात येऊ नये म्हणून मालक आणि त्याचे एजंट गुलाम एकत्र एक सांस्कृतिक राजकारणही सुरू करतात. स्पर्धा आणि स्पर्धात्मक वृत्ती, मेहनत, विकास, सम्मान, इज्जत, नफा, ‘आत्मनिर्भरता’ अशा शोषण करणाऱ्या अनेक मूल्यांचा भाषा, साहित्य, नाटक, सिनेमा आणि धर्म या माध्यमांतून उदोउदो केला जातो. गुलामांचे विभाजन होत असताना भाषेचा मोठा वापर होत असतो. भाषेतून माणसा माणसांतील विभाजन अधोरेखित करण्यासाठी परस्परविरोधी नावं आणि व्याख्या तयार होतात, ह्या व्याख्या नियम बनतात आणि हे नियम सांस्कृतिक परंपरेतून प्रस्थापित होतात, थोडक्यात, त्यांचे ‘साचे’ तयार होतात. हे साचे संस्कृती आणि धर्माच्या मदतीने सातत्याने आपल्या मनावर बिंबवले जातात. या प्रस्थापित साच्यांना आपलेसे करून, त्यांच्यातून मिळालेल्या व्याख्यांना आपली ‘ओळख’ समजून जगलेले आयुष्य म्हणजे साचेबद्ध किंवा साचेबंद आयुष्य होय. खरे तर एकीकडे आपण मालकाचे एजंट म्हणून या साच्यांचा लाभही घेत असतो.
त्यांच्यामुळे आपल्याला एक विशेष ओळख, विशेषाधिकार (privileges), विशेष सवलती, विशेष सत्ता मिळत राहते. परंतु, दुसरीकडे असे साचेबंद आयुष्य जगत असताना आपली याच साच्यांमध्ये घुसमटही होत असते. ‘मेट्रिक्स’ नावाच्या सिनेमात मालकाच्या एजंट आणि व्यवस्थेचा विरोध करणाऱ्या क्रांतिकारी व्यक्तींमध्ये चालू असलेल्या भांडणात एकदा एका ‘आत्मबोधाच्या’ क्षणी एक एजंट हळवा होतो आणि स्वतःची होणारी घुसमट कबूल करतो.
तर मालकाची ही व्यवस्था विषमतेवर आधारित विभिन्न साच्यांची व्यवस्था आहे. मानव हा जनावर अवस्थेतून ‘वेगळा’ झाला, प्रकृतीपासून वेगळा झाला तसे एकीकडे त्याने प्रकृतीपेक्षा वेगळी अशी स्वतःची व्यवस्था म्हणजे संस्कृती तयार तर केलीच; परंतु प्रकृतीचे अंश, प्रकृतीची आठवण आणि प्रकुतीचा भूतकाळही त्याच्यासोबतच राहिला, तो त्याला कधीही नष्ट करता येणार नाही. म्हणून मानवाच्या मानव बनण्यातच एक विभिन्नता आहे आणि या विभिन्नतेमुळे माणूस हा जन्मतःच दुभंगलेला (split) आहे. या मूलभूत विभाजनाला मानसशास्त्रज्ञ ‘लैंगिक विभाजन’ (sexual split / difference) असं म्हणतात. त्याच्या या प्रकृती आणि संस्कृतीच्या एकत्र येण्यामुळे तयार होणाऱ्या अस्तित्वाला स्लावोय जीझेक आणि आलेन्का झुपांचिक नावाचे तत्त्वचिंतक ‘शॉर्ट सर्किट’ म्हणतात. तर मानवी अस्तित्वात असलेल्या या मूलभूत विभिन्नतेचा वापर करत मालक गुलामांच्या अनेक ओळखी तयार करतो आणि विषमतेची शोषणव्यवस्था उभी करतो.
व्यवस्थेची ही चलाखी आपल्याला लिंग, लिंगभाव आणि लैंगिकता यांच्यावर आधारित विभाजन झालेल्या ओळखींचे राजकारण (identarian politics) पाहताना अधिक जवळून लक्षात येऊ शकते. आपला जन्म होतो तेव्हा सर्वात पहिला साचा ज्यात आपल्याला बसवलं जातं तो म्हणजे ‘लिंग’ (sex) नावाचा साचा. आपल्या जन्माच्यावेळीच आपण ‘पुरुष’ आहोत की ‘स्त्री’ हे ठरवले जाते. हा परंपरेने चालवलेला साच्यांचा, त्यांच्या नावांचा, व्याख्यांचा आणि ओळखींचा नियम असतो. एखादे ‘इंटरसेक्स’ बाळ, ज्याचे लिंग ठरवणे अवघड असते तेव्हा त्याला या ‘स्त्री’ ‘पुरुष’ नियमाचा अपवाद समजले जाते. हा अपवाद नियमाला खोडत नाही, तर नियमालाच पुन्हा अधोरेखित करतो. आपल्या अस्तित्वावर सामाजिक शिक्कामोर्तब करणारी ‘स्त्री’ किंवा ‘पुरुष’ ही नावे’ विशिष्ट समाजमान्य साच्यांची प्रतीके असतात. आपले पुरुष किंवा ‘स्त्री’ असे नामकरण करण्याची प्रक्रिया मूलतः जरी केवळ आपल्या शारीरिक वैशिष्ट्यांवर अवलंबून असली, तरी पुढे मात्र हे ‘नाव’, त्याची ‘प्रतिमा’, त्याचा ‘साचा’ तेवढ्यावरच न थांबता आपल्या संपूर्ण जगण्याची व्याख्या आणि अभिव्यक्ती ठरवत राहतात. तिथे लिंगाचा ‘लिंगभाव’ (gender) होतो.
आपण जसे मोठे होत असतो तसे आपल्या शारीरिक लिंगावर सामाजिक लिंगभावाचे, म्हणजेच पुरुष किंवा स्त्री होण्याचे संस्कार केले जातात. आपण कोणते कपडे घालायचे, कसे चालायचे, वागायचे, बोलायचे, कोणते काम करायचे इथपासून तर आपले जगातले स्थान, आपली सत्ता, आपल्या विकासाच्या शक्यता इथपर्यंत सगळं आपल्याला शिकवलं जातं.
सिमोन दे बुवाँ ही फ्रेंच तत्त्वचिंतक म्हणते ‘आपण बाई नसतो, आपण बाई बनतो. ह्या वक्तव्याचा बरेचदा ‘स्त्री हे कसे एक सामाजिक रचित (social construct) आहे हे दाखवण्यासाठी वापर केला गेला. परंतु, सिमोन दे बुवाँ ‘आपल्याला बाई बनवली जाते असे न म्हणता ‘आपण बाई बनतो’ असे का बरे म्हणत असेल हेही विचारात घेतले पाहिजे. ओळख माणसाला बनवते की, माणूस स्वतःही ओळख बनतो? हे प्रश्न ओळखींच्या मुळाशी असलेल्या ‘बनवाबनवी’ला समजण्यासाठी उपयोगी पडतील.
आपण स्वतः एखादी ओळख का स्वीकारतो त्याआधी मालक आपली लैंगिक ओळख का तयार करतो हे पाहूया. आधीच नमूद केल्याप्रमाणे मालकाची आपल्याकडून ‘आपण काम करत राहावे’ (उत्पादन, production) ही अपेक्षा असते. मालकाला गुलामांमध्ये स्पर्धाही हवी असते, एजंटही हवे असतात. या सगळ्याच्या व्यतिरिक्त मालकाला माणसाकडून प्रजनन हवे असते. प्रजननाचा संबंध कामाशी आहे. कामाचा एक प्रकार म्हणजे प्रत्यक्ष काम करणे आणि वस्तूंचे उत्पादन करणे (production). मालकाच्या काम करण्यासाठी अजून भावी कामगार जन्माला घालणे हा कामाचा दुसरा प्रकार, ज्याला फ्रीडरिश एन्गेल्स पुनरुत्पादन (reproduction) म्हणतो. मालकाच्या दृष्टीने या पुनरुत्पादनाच्या मूल्याला गुलामांच्या जगण्यात प्रस्थापित करण्यासाठी त्याला त्याचे उदात्तीकरण करावे लागेल. म्हणून भिन्नलिंगी प्रेम, लग्न आणि कुटुंब अशी संस्कृती उभी केली पाहिजे, परंपरेने चालवली पाहिजे, इतकी की ती पार माणसाच्या नेणीवेत शिरली पाहिजे. आपल्या नेणीवंत फिट्ट बसलेल्या भिन्नलिंगी प्रेमाच्या कल्पनेमुळेच तर आपल्यातील अनेकांना समलिंगी स्त्री, पुरुष व तृतीयपंथी हे अप्राकृतिक, अनैसर्गिक (unnatural) वाटतात, आजार आणि विकृती वाटतात. जे आपल्या संस्कृतीत बसत नाही ती विकृती असेच आपल्याला वाटत राहते. इथे संस्कृतीसुद्धा खरं तर प्रकृतीवर केलेला कृत्रिम संस्कार आहे हे आपण विसरतो. म्हणून लग्न, कुटुंबव्यवस्था ह्या मुळातच माणसाच्या प्रकृतीवर कृत्रिमपणे लादलेल्या व्यवस्था आहेत.
आपली प्रकृती कित्येकदा या संस्कृतीच्या विरोधात जाऊन ‘चीटिंग’ ही करते, उदाहरणार्थ आपलं अनेकांशी प्रेम जडतं (ही आपण मालकाने शिकवलेल्या एक-पत्नी/पती-धर्माच्या विरोधात केलेली चीटिंग असते!), दुसरं उदाहरण आपण अनेकांसोबत संभोग करतो (मालकाने आपल्या या प्राकृतिक सवयीची सोय करण्यासाठी वेश्याव्यवसाय उभा केलाच आहे, वर पत्नी ही धर्माने आणि कायद्याने तुमची पत्नी असते, पत्नी आणि वेश्या यांच्यामध्ये कायदेशीर फरक आहे. पत्नीकडून होणाऱ्या मुलांना ही कायदेशीर मान्यता आहे, ‘विवाहबाह्य संबंधांतून होणाऱ्या मुलांना नाही. याला सोयच म्हणावं लागेल!) तिसरं उदाहरण भिन्नलिंगी स्त्री-पुरुष लग्न करतात, संभोग करतात तेव्हा त्या संभोगातून नेहमी प्रजनन होईलच याची खात्री देता येत नाही. वर चुंबन, हस्तमैथुन, मुखमैथुन आणि गुदमैथुन यांच्यातून प्रजनन होत नाही तरीही स्त्री पुरुष ह्या लैंगिक कृती करतातच, ही मालकाच्या ‘पुनरुत्पादन’ या मूल्याच्या विरोधात केलेली ‘चीटिंग’च आहे. मालक हे नक्कीच जाणतो, गुलामही हे नक्कीच जाणतात; परंतु स्त्री-पुरुषाच्या भिन्नलिंगी प्रेम, लग्न आणि संभोगातून प्रजाननाची शक्यता असते. केवळ ह्या शक्यतेवर आणि आशेवर मालकाची व्यवस्था उभी आहे.
भारताच्या राजकीय इतिहासात बाबासाहेब आंबेडकर यांनीही जातिव्यवस्था ही लैंगिकतेच्या नियंत्रणामुळे टिकून राहते’ हे दाखवून दिले. बाबासाहेब तर जातीची व्याख्या सांगतानाच हे म्हणतात की “जातिव्यवस्थेच्या गुहेची जात्यंतर्गत विवाह ही गुरुकिल्ली आहे”. जातीची व्यवस्था स्त्रीदास्यातून टिकवली जाते. स्त्रियांच्या लैंगिकतेचे नियंत्रण करूनच ही व्यवस्था चालवली जाते. म्हणून बाबासाहेब पुढे असेही म्हणतात की, स्त्री ही या व्यवस्थेचे प्रवेशद्वार आहे. पुरुष जेव्हा आपल्या जातीबाहेर विवाहबाह्य संबंध ठेवतो आणि त्यातून त्याला मुलेही होतात, तेव्हा त्याच्या मूळ जातीला धक्का लागत नाही. मात्र, आपल्या पत्नीला आणि तिच्यापासून होणाऱ्या मुलांना कुटुंब नावाच्या साच्यात बंदिस्त ठेवून त्याला त्याची जात टिकवता येते. अशा तऱ्हेने पुन्हा पितृसत्ता ही वर्गाचे आणि जातीचे व्यवस्थापन करत असते.
मालकाच्या भांडवलशाहीला वर्ग, वर्ण/जात आणि यांना चालवायला पितृसत्तेची म्हणजेच भिन्नलिंगी प्रेम, लग्न आणि कुटुंब अशा मूल्यांची नितांत गरज असते. पितृसत्ता मालकाच्या बाजूने व्यवस्थापक म्हणून कार्यरत असते. ही गुंतागुंत समजायला धर्मातून येणारे कर्मकांड, सिनेमे, टीव्हीवरील मालिका आणि उत्पादनांच्या अनेक जाहिराती अभ्यासल्या तरी पटकन लक्षात येईल, उदाहरणार्थ धर्म आपल्याला स्त्री-पुरुष आणि त्यांचे नातेसंबंध कसे असावेत हे सांगतो. सिनेमांमधून भिन्नलिंगी प्रेमाचा, कुटुंबाचा आणि कुटुंबाच्या इज्जतीचा उत्सव केलेला दिसतो. ‘डर्टी पिक्चर’ नावाच्या सिनेमात एका उत्तम कथेचे गणित समजावताना एक नायक कथाकाराला म्हणतो, हे बघ, आपल्या कथेतल्या हिरोच्या मर्दानगीला थोडी अजून उंची द्यायची असेल तर त्याला एक चांगल कुटुंब दे, आई दे, एक सुंदर आणि सुशील बहीण दे, त्या बहिणीला ‘इज्जत’ दे, मग व्हिलन येईल आणि ह्या बहिणीचा बलात्कार करून हिरोच्या कुटुंबाची इज्जत लुटेल. आणि जेव्हा तो हिरो या इज्जतीला वाचवण्यासाठी, तिला पुन्हा मिळवण्यासाठी बदला घेईल, व्हिलनचा खून करेल तेव्हा कुठे तो खरा मर्द ठरल.” ऐंशीच्या दशकातील सिनेमांचे हे गणित होते तर आत्ताच्या सिनेमांमध्ये भिन्नलिंगी प्रेम आणि कौटुंबिक नाटक (हम आपके है कौन, दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे किंवा कभी ख़ुशी कभी गम ई.) यांचे गणित राहिले आहे.
आता आपण समलिंगी आणि तृतीयपंथी यांचे ‘ओळखींचे राजकारण’ (identity politics) पाहूया.
मालकाने दिलेल्या घरामध्ये जेव्हा एका इंटरसेक्स बाळाचा जन्म होतो, तेव्हा हे मूल लगेच किंवा काही काळाने घराबाहेर फेकले जाते. हिजडा हा शब्द फारसी भाषेतील ‘हिज्र’ या शब्दातून आला आहे, या शब्दाचा अर्थच मुळी ‘घरातून बाहेर पडलेली व्यक्ती’ असा आहे. आज बहुसंख्येने तृतीयपंथी व्यक्तींच्या ओळखीतला एक अर्थ हा आहे की, ते आपल्या आई-वडीलांपासून दूर जमातीतल्या घरात राहतात. मालकाचे राजकारण समजायला ‘घराचे प्रतीक फार उपयुक्त आहे. का नको असतो आपल्याला आपलाच तृतीयपंथी मुलगा घरात? कारण तो ‘स्त्री’ आणि ‘पुरुष’ हे साचे नाकारतो, वरवर ‘पुरुष’ वाटत असताना बायकांसारखा वागतो, बोलतो, बायकांचे कपडे घालतो आणि कधीकधी तर स्वतःचे पुरुषी लिंगही नको असे म्हणत असतो. मालकाने उभ्या केलेल्या पुनरुत्पादनाच्या दुकानांमध्ये अशा ‘पुरुषाचं काय काम, त्याचा काय उपयोग? कुटुंबाची ‘इज्जत’ जाते. अक्षरशः समाजात, असेच सगळ्यांना वाटते. तसेच समलिंगी स्त्री पुरुषांचे आहे. एकदा का घरात कळले की, आपले मूल समलिंगी लैंगिक इच्छा बाळगते तेव्हा ह्या विकृती’ला मानसोपचाराने किंवा एखाद्या धर्मगुरूच्या मदतीने दुरुस्त करण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू होतात. काही समलिंगी व्यक्तींचे बळजबरीने लग्न लावले जाते आणि काही भीतीपोटी किंवा मालक भिन्नलिंगी आयुष्यासाठी देत असलेल्या सुखसोयींसाठी स्वतःहून लग्न करून मोकळे होतात. अर्थात ,त्यांची समलिंगी प्रेमाची वा संभोगाची इच्छा संपत नाही. म्हणून ते विवाहबाह्य समलिंगी संबंध ठेवतात. काही शिक्षित, काही मध्यमवर्गीय तर उच्चवर्गीय कुटुंबातले समलिंगी स्त्री-पुरुष घरच्यांच्या ‘आधुनिक’ असण्याचा फायदा घेत घरच्यांना आपली समलिंगी ओळख सांगून टाकतात (ज्याला ‘coming out’ म्हणतात.). काहींना समाजाच्या साच्यांच्या विरोधात जाण्यसाठी घरच्यांची साथही मिळते परंतु, हे सगळे भिन्नलिंगी नियमांना पुसून टाकत नाहीत, ते केवळ अपवाद असतात. अनेक समलिंगी व्यक्ती या मानसिक त्रासामुळे स्वतःची आर्थिक प्रगती करण्यात असफल होतात. अनेक तृतीयपंथी व्यक्ती तर घराबाहेर पडून हिजड्यांच्या व्यवस्थेचा भाग बनतात आणि त्या व्यवस्थेतल्या नवीन पितृसत्ताक साच्यांना आपलंसं करतात. ह्या व्यवस्थेतही सत्तेची एक उतरंड असते, त्यात सर्वात वर नायक असतो, त्याच्या खाली गुरू असतात आणि गुरूंचे चेले असतात. ही उतरंड केवळ नावांची नसून आर्थिक सत्ताकारणाचीही असते. चेल्यांनी पैसे कमवायचे, शिक्षण, नोकरी आणि सामाजिक मान्यता नसल्यामुळे रस्त्यांवर भीक (मंगती) मागायची, लग्नसमारंभात नाचायचे-गायचे, वेश्या व्यवसाय करायचा. हे कमावलेले पैसे, त्यातला हिस्सा गुरूला द्यायचा ह्या हिस्स्यातून नंतर काही पैसे नायकाला मिळतात. शेवटी उतरंडीची ही व्यवस्थाही पितृसत्तेचेच अनुकरण करणारी म्हणायची.
जसजसे समलिंगी, तृतीयपंथी लोकांनी आपली एक राजकीय चळवळ उभी केली तिचे मुद्दे कायदेशीर आणि सामाजिक मान्यता, आत्मसम्मान, शिक्षण आणि नोकरीक्षेत्रात आरक्षण, लग्र आणि मूल दत्तक घेण्याचे हक्क इथपर्यंतच मर्यादित राहिली. समता म्हणजे बरोबरी असा चुकीचा अर्थ लावला गेला आहे. कारण, समता म्हणजे बरोबरी असे असेल ,तर आपल्याला मालकाच्या एजंटला जे काही मिळत आहे ते हवे असते, त्यामुळे मानवी जगणे आणि नातेसंबंधांच्या बाबतीत आपण कोणताही नवीन विचार करत नाही, कोणत्याही नवीन समाजाचा विचार करत नाही. हे मुद्दे पाहता ही चळवळ शेवटी मालकाच्या व्यवस्थेतच आपली एक जागा तयार करू पाहत आहे हे लक्षात येते. ह्या लैंगिक ओळखीना कायदेशीर मान्यता देण्याने व्यवस्थेला काही इजा होणार नाहीये हे व्यवस्थेच्याही लक्षात आले आहे. उलटपक्षी ही व्यवस्था किती आधुनिक आणि किती प्रगतीशील आहे. असाच तिचा बोलबाला होणार आहे. आणि खरंच आज एलजीबीटी (LGBT) व्यक्तींना अनेक मंचांवर बोलायला उभे केले जाते, आजकाल राजकीय पक्षही तृतीयपंथी व्यक्तींना पक्षामध्ये एखादे पद देऊन स्वतःचे प्रगतिशील असणे दाखवतात. परंतु, ह्या सगळ्याचा चळवळीसाठी काही फायदा होतो का?
इथे आपल्याला चळवळीचा क्रांतीचा अर्थ नीट समजून घेतला पाहिजे. एखादा क्रांतिकारी आवाज उठतो, एखादी चळवळ उभी राहते तेव्हा हा आवाज नेमके काय करत असतो? हा आवाज व्यवस्थेच्या विरोधात विद्रोह व्यक्त करतो, बंड पुकारतो. व्यवस्थेमुळे अस्तित्वात आलेल्या असमानतेशी लढा देत असतो. व्यवस्थेने तयार केलेल्या साच्यांना आवाहन देत असतो. साच्यांना दिलेले आवाहन आणि त्यांच्याविरोधात केलेला विद्रोह हा चळवळीसाठी दोन शक्यता तयार करतो एक म्हणजे व्यवस्थेतली असमानता मिटवून बरोबरीची समता अस्तित्वात आणणे, व्यवस्थेतले प्रस्थापित साचे मोकळे करणे आणि दुसरी शक्यता असते ह्या साच्यांना नष्ट करून एका अशा समाजाचा विचार मांडणे ज्यामध्ये विषमता आणि असमानता आणणारे साचेच नसतील. काहींना चळवळीतून व्यवस्थेबरोबर केवळ एक तडजोड हवी असते. आम्हालाही व्यवस्थेच्या भाषेमध्ये, संस्कृतीमध्ये, धर्मामध्ये, कायद्यामध्ये, लग्नामध्ये, कुटुंबामध्ये जागा मिळावी ही चळवळीची एक दिशा, जिला मी मवाळ दिशा म्हणतो. आणि मालक-गुलामाची ही गुलामगिरीची व्यवस्थाच नको; गुलामगिरीची ही भाषा ही संस्कृती, हे फायदे, हे साचे, हा समाजच नको ही चळवळीची जहाल दिशा. मवाळ दिशा ही व्यवस्थेशी केवळ तड़जोड़ करते आणि व्यवस्था तशीच टिकून राहते. याचा परिणाम म्हणजे आता भाषेमध्ये संस्कृतीमध्ये माध्यमांमध्ये एलजीबीटी ओळखींचा उत्सव दिसू लागेल, आरक्षणही मिळेल, धोरणात्मक बदल घडून काही सवलतीही मिळतील. परंतु, या व्यवस्थेची पितृसत्ता, भांडवलशाही आणि जातव्यवस्था तशीच टिकून राहील. नुकतेच वृत्तपत्रामध्ये एका ब्राह्मण मुलाच्या आईने आपल्या मुलासाठी वर पाहिजे अशी जाहिरात दिली होती, त्या जाहिरातीत मुलगा जातीने ब्राह्मण पाहिजे, असेही नमूद केले होते.
एलजीबीटी चळवळीची दिशा ठरवताना आपल्याला मार्क्सवाद आणि स्त्रीवादाचा इतिहास जाणणे खूप महत्त्वाचे आहे. समाज ही एक भांडवलशाहीची व्यवस्था आहे. ही व्यवस्था स्वतःच्या स्थापनेसाठी आणि व्यवस्थापनासाठी धर्म, पितृसत्ता, जातव्यवस्था, संस्कृती अशा इतर अनेक व्यवस्थांशी हातमिळवणी करते. कुटुंबव्यवस्थेच्या माध्यमातून भांडवलशाही गुलामांना वैयक्तिक मालमत्तेच्या आमिषाखाली थोडीफार सत्ता, थोड्याफार सुखसोयी थोडेफार विशेषाधिकार देत राहते, म्हणून भांडवलशाहीशी हातमिळवणी केलेली पितृसत्ताही टिकून राहते. ह्यामुळेच जेव्हा आपण स्त्रीवादी दृष्टिकोनातून स्त्रियांच्या शोषणाबद्दल बोलतो किंवा मार्क्सवादी भूमिकेतून कामगारांच्या शोषणाबद्दल बोलतो, तेव्हा ह्या दोन्ही व्यवस्था एकत्र कार्यरत असतात हे विसरून चालणार नाही. परंतु, मार्क्सवादी चळवळीचा इतिहास पाहिला तर लक्षात येते की, या चळवळीतून स्त्रिया बाहेर पडल्या, मार्क्सवादी विचार केवळ दोन वर्गाचे विभाजन मानत आला होता, परंतु चळवळीतल्या स्त्रिया लैंगिक वर्गीकरणाकडे, पितृसत्तेकडे लक्ष वेधत होत्या. पुढे स्त्रीवादी चळवळीतूनही काळ्या स्त्रिया बाहेर पडल्या कारण स्त्रीवादी विचारामध्ये पितृसत्ता ही वर्णव्यवस्थेचेही व्यवस्थापन करत असते, ह्याकडे त्या लक्ष वेधत होत्या. भारतातही दलित स्रीवाद असाच स्त्रीवादापासून वेगळा झाला, तो सवर्ण स्त्रियांना पितृसत्ता ही जातव्यवस्थेचेही व्यवस्थापन करत असते, हे दाखवत होता. चळवळीमध्ये पडलेली ही फूट एलजीबीटी (LGBT) चळवळीची दिशा ठरवताना लक्षात घेतली पाहिजे, तिला दुरुस्त केलं पाहिजे, ती दरी नष्ट केली पाहिजे.
एलजीबीटी चळवळीच्या विचारामध्ये स्त्री-पुरुष साचे मोडण्याची एक जहाल शक्यता असली, तरी ती साच्यांशिवायचा एक नवीन समाज तयार करण्याच्या दिशेने अजून तरी विचार करताना दिसत नाही. नव्या समाजाचा विचार आपण मार्क्स आणि आंबेडकर यांच्या विचारांतून घेऊ शकतो. मार्क्सलाही भांडवलशाही व्यवस्थेच्या विपरीत एक नवा समाज अस्तित्वात यावा असे अभिप्रेत होते. त्याच्या ‘युटोपियन’ (utopian) समाजामध्ये कोणतेही वर्ग नसतील, असा आशावाद होता. मार्क्सवादापासून वेगळे झालेल्या स्त्रीवादाला आपण मार्क्सवादाशी पुन्हा जोडले तर आपण पुढे असे म्हणू शकतो की, या नवीन समाजात कोणतेही वर्ग आणि लिंगभावाचे कोणतेही साचे नसतील. स्त्रीवादापासून वेगळे झालेल्या काळ्या आणि दलित स्त्रियांचा विचार विचारात घेतला तर आपण पुढे असे म्हणू शकतो की, या नवीन समाजात कोणताही वर्ग, कोणताही लिंगभाव, कोणताही वर्ण आणि कोणतीही जात असणार नाही.
मार्क्सवादामधील नवीन समाजाच्या विचाराला धरूनच बाबासाहेब आंबेडकर काही महत्त्वाचे उपाय सुचवतात. मार्क्सने धर्माला फारसे महत्त्व दिले नाही परंतु, बाबासाहेबांनी धर्माचे माणसांच्या जीवनातले स्थान हे बरोबर समजले होते. एकीकडे धर्मामध्येच जातव्यवस्था टिकून असते हे माहीत असताना धर्मातूनच या व्यवस्थेपासून सुटका होऊ शकेल हेही त्यांना समजले होते. धर्म मालकाची व्यवस्था चालवण्यासाठी धर्मशाखांमध्ये, पुराणकथांमध्ये आणि कर्मकांडांमध्ये स्त्री-पुरुष आणि जात हे साचे प्रस्थापित करतो, त्यांचे दैवीकरण करतो आणि ते परंपरेने चालवत राहतो. धर्मामध्ये साचे न उरता ‘आदिमरूप’ (archetypes) बनतात, आदर्श बनतात. असे करत असताना धर्म आपल्याला जगाच्या वास्तवातली विषमता ही देव किंवा ब्रह्म नावाच्या अद्वैताचेच द्वैतामध्ये झालेल रुपांतर आहे, असे म्हणत राहतो. म्हणजे आयुष्यात जरी आपण स्री, पुरुष, ब्राह्मण, दलित, श्रीमंत, गरीब असलो तरी हे वास्तव काही सत्य नाही, हे निमित्तमात्र आहे. ही एक लीला आहे. परमसत्य तर ब्रह्म आहे आणि तिथे आपण सगळे एक आहोत. ‘अहं ब्रह्मास्मी’ या नावाने धर्म आपल्या मनात अद्वैताचा हा विचार बिंबवत राहतो. यामुळे भांडवलशाहीचा आणि पितृसत्तेचा अजून एक फायदा होतो तो म्हणजे लोकांना वास्तवातील होणारा भेदभाव, वास्तवातील द्वैत, विषमता ही नशिबाचा भाग वाटू लागते आणि म्हणून व्यवस्थांच्या विरोधातल्या विद्रोहाची शक्यता कमी होते. म्हणून मार्क्स धर्माला अफूची गोळी म्हणतो. धर्म आपल्या अद्वैताचे स्वप्न दाखवतो आणि त्या नशेत आपण वास्तवातले आपले होणारे शोषण विसरतो आणि तिचा नशीब म्हणून स्वीकार करतो. दुसरे म्हणजे हे अद्वैत आपल्याला मोक्षाच्या रूपाने या जगाच्या या वास्तवाच्या पलीकडे कुठेतरी मिळणार असतं. तिसरं म्हणजे अद्वैताचा विचार हा दोनाकडून एकाकडे जाणारा विचार आहे. त्यामुळे या विषमतेच्या वास्तवातून बाहेर पडण्याचा प्रयत्नही एकट्याने करायचा आहे आणि त्याचे फळही एकाकडे नेणारेच आहे.
बाबासाहेब आंबेडकर या जगात इथेच नवीन समाज उभारण्यासाठी बुद्धाचा धम्म पुढे करतात. बुद्ध देव नाकारतो, ब्रह्मसत्यही नाकारतो. सत्य या जगाच्या या जगण्याच्या पलीकडे आहे. हेही नाकारतो. बुद्धाचा आणि बाबासाहेबांचा माणसाच्या परिवर्तनावर आणि त्यातून होणाऱ्या समाजपरिवर्तनावर अखंड विश्वास आहे. ‘बुद्ध आणि त्याचा धम्म’ वाचताना आपल्याला अप्रत्यक्षपणे मार्क्स भेटतो आणि हेही लक्षात येते की, बुद्ध मार्क्सच्या पुढे जातो. मार्क्सने सुचवलेला मानवी समाज किंवा सामाजिक मानवता’ (human society or social humanity) याला बुद्ध त्याच्या धम्माच्या विचाराने मूर्त रूप देतो. हा धम्म आपल्याला म्हणतो की, सत्य इथे याच जगात आपण शोधायचा आहे आणि त्याला एकनिष्ठ राहून एका नव्या समाजाची स्थापना करायची आहे. हा नवा समाज माणसाच्या प्राकृतिक, स्वाभाविक विभिन्नतेला मान देत विषमता दूर करेल. आपल्याला अद्वैताकडे नाही जायचे आहे. कारण अद्वैतामध्ये निरनिराळ्या ओळखींचा आवाज एकामध्ये नष्ट होईल. मार्क्सवादी तत्त्वचिंतक आला बायू म्हणतो तसे आपल्याला एकाकडे नाही जायचे आहे, आपल्याला आपला नवीन समाज हा ‘दोघांचा’ म्हणून तयार करायचा आहे. असा समाज जिथे माणसांची विभिन्नता एकमध्ये विलीन न होता समाजातील समतेवर कायम पाळत ठेवत राहील (difference as Vigilance). विभिन्नतेवर आधारित सार्वत्रिक माणुसकी (generic humanity of differences) हीच आपल्या जगण्याचे नियम ठरवेल. म्हणून बुद्ध म्हणतात त्याच्या धम्मामध्ये बुद्ध महत्त्वाचा नाही, धम्म महत्त्वाचा आहे आणि हा धम्म काय आहे तर ‘सार्वत्रिक माणुसकी’चा विचार हा अमलात आणताना आपल्याला काळानुसार, विभिन्नतेनुसार नियम बदलत राहावे लागतील. हीच प्रक्रिया धम्मदीक्षा, धम्माचा स्वीकार, परीनिर्वाण या सगळ्यांमध्ये अभिप्रेत आहे.
आज मार्क्सवाद, स्रीवाद आणि एलजीबीटी (LGBT) यांच्या सर्व चळवळींना बाबासाहेबांच्या धम्माची अत्यंत गरज आहे. धम्माचा अभ्यास आणि स्वीकार केल्यावरच शोषणव्यवस्थाचे मूळ स्रोत आपल्याला समजतील, तेव्हाच आपण एकत्र येऊ कारण आपला लढा हा एका व्यवस्थेच्या विरुद्ध नाही तर या सर्व व्यवस्था चालवणाऱ्या एका मोठ्या व्यवस्थेच्या विरुद्ध आहे हे लक्षात येईल आणि तेव्हाच आपली चळवळ एका नवीन समाजाचा जहाल विचार सुरू करेल. हा विचार जिवंत ठेवण्यासाठी जसे ‘स्त्री, कामगार वर्ग (proletariat) आणि दलित ही क्रांतिकारी नावे महत्त्वाची आहेत तसेच एलजीबीटी चळवळीतले ‘स्त्री-पुरुष साचे मोडणारे ‘क्वियर’ (queer) हे नावही आपल्याला दिशा दाखवत राहो हीच आशा.
~ जमीर कांबळे