ठाणे: बहुजन समाज पार्टी (BSP) ठाणे जिल्हा महासचिव जलालूद्दीन अन्सारी यांच्यासह बसपाच्या अनेक वरिष्ठ पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला.
जलालूद्दीन अन्सारी मागील २० वर्षांपासून बसपामध्ये (BSP) काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. सोबतचे पदाधिकारी, कार्यकर्तेही मोठा काळ बसपात काम करत होते.
बहुजन समाज पार्टीने आंबेडकरवादी, बहुजन विचारधारेशी फारकत घेतली असून पूर्णपणे ब्राम्हणांच्या ताब्यात असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे आंबेडकरी विचारधारेवर चालणाऱ्या वंचित बहुजन आघाडीत आपण प्रवेश केला असल्याचे त्यांनी सांगितले.
येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे अधिकाधिक उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही ते म्हणाले.
वंचित बहुजन आघाडीचे ठाणे जिल्हाध्यक्ष सुनील भगत व इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा संपन्न झाला.