सत्तेत बसलेल्या श्रीमंत मराठ्यांनी आधी गरीब मराठ्यांना आरक्षणापासून वंचित केले, आता ओबीसींचे आरक्षण घालवत असल्याचा आरोप.
मुंबई – वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसी आरक्षण मुद्द्यावर पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी २३ डिसेंबर रोजी मुंबई विधानभवनावर मोर्चा काढणार असल्याचे जाहीर केले.
सर्वोच्च न्यायालयाने मागितलेली माहिती न दिल्यामुळे सरकारची याचिका फेटाळण्यात आली. यामुळे निवडणुकीत ओबीसींना हक्काच्या २७% जागांपासून वंचित राहावे लागणार आहे. ओबीसींचे राजकीय प्रतिनिधित्व संपवण्यात आले आहे. इतर काही राज्यांतही अशाच प्रकारे ओबीसीचे राजकीय आरक्षण स्थगित करण्यात आलेले आहे.
आताचा निकाल राजकीय आरक्षणावर असला तरी त्याच धर्तीवर शिक्षण व नोकर्यांतील आरक्षण संपवलं जाऊ शकतं, त्यामुळे ओबीसींचे संपूर्ण अरक्षणच धोक्यात आले आहे असे बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितले. यासाठी केंद्र व राज्य दोन्ही सरकारे जबाबदार असल्याचेही त्यांनी सांगितले. केंद्राने त्यांच्याकडे असलेला एमपीरिकल डेटा देण्यास नकार दिला. राज्य सरकारनेही स्वतः एमपीरिकल डेटा गोळा केला नाही. या दोघांच्या ओबीसी विरोधी मानसिकतेमुळे त्यांनी ओबीसींचे आरक्षण रद्द होईल अशीच भूमिका घेतली. सत्तेत बसलेल्या श्रीमंत मराठ्याने आधी गरीब मराठ्यांना आरक्षणापासून वंचित केले, आणी आता ओबीसींना ही अरक्षणापासून वंचित करत असल्याचा आरोप यावेळी बाळासाहेबांनी केला.
सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येताच महाराष्ट्र सरकारने राज्यभर जमावबंदी लागू केली. ओबीसींचा आवाज दाबण्यासाठीच महाराष्ट्र सरकारने हे पाऊल उचलल्याचे त्यांनी सांगितले. कायदा सुव्यवस्था ठीक असल्यामुळे जमावबंदीची काहीच गरज नसल्याचेही त्यांनी सांगितले. तरीही सरकारने जमावबंदी मागे घेतली नाही तर जमावबंदी मोडून ओबीसी आरक्षणाचा मोर्चा निघेल असे त्यांनी जाहीर केले.